(आ) 'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
Answers
Answer:
माणसाला देवाने दिलेली एक अप्रतिम देणगी म्हणजे त्याचे शरीर.माणसाचे शरीर म्हणजे आजवर माणसाला न उलगडलेले कोडेच म्हणावे लागेल.कारण माणसाने त्याच्या शरीरातील अनेक वर-वर दिसणाऱ्या गोष्टींचा शोध लावला असला तरीही काही गोष्टी कशा काम करतात हे अजून त्याला समजलेले नाही.उदाहरण घ्यायचेच झाले तर अशा गोष्टीत सर्वात प्रथम क्रमांक लागतो तो माणसाच्या मेंदूचा.माणसाच्या मेंदूमधील अनेक गोष्टींचे कोडे सोडवण्यात माणूस अजून यशस्वी झालेला नाही.माणसाच्या जन्म-मृत्यूचे अतिशय विलक्षण असे धागेदोरे उलगडण्यात सुद्धा माणसाला अजून तरी यश आलेले नाही.असो.या गोष्टीचा शोध जेव्हा लागायचा तेव्हा नक्की लागेल पण आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल येथे चर्चा करणार अहोत ती म्हणजे संवाद.
या सृष्टीमधील प्रत्येक जीव तयार करताना परमेश्वराने एक अत्यंत सुंदर असे काम केले ते म्हणजे त्याने प्रत्येक जीवाला संवादाची शक्ती दिली.आज या सृष्टीतील कुठलाही जीव कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या जातीतील संबद्धीत जीवाशी संवाद करतच असतो फक्त त्याची संवाद करण्याची शैली निराळी असू शकते.परमेश्वराने निर्माण केलेला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव.मानव सुद्धा आपल्या जातीतील प्रत्येकाशी बोलून संवाद साधतो.बोलण्याची एक वेगळीच शक्ती देवाने माणसाला दिलेली आहे.पृथ्वीवरील कुठल्याही प्राण्याला बोलण्याची विशिष्टता अजूनतरी कुठल्या दुसऱ्या प्राण्यामध्ये दिसून आलेली नाही.माणूस आपले विचार,आपल्या डोक्यातील अनेक शंकाकुशंका,एखाद्याचे कौतुक इत्यादी बोलूनच स्पष्ट करतो आणि,मित्रांनो,यालाच आपण संवाद असे म्हणतो.हां,हा संवादाचा एक प्रकार झाला तो म्हणजे थेट संवाद.या संवादाचे आणखीही काही प्रकार असतात.ते मी येथे स्पष्ट करणार नाही कारण तशी जागा आणि वेळ सुद्धा आपल्याकडे नाही.पण त्यामुळे संवादाचे महत्त्व कमी होत नाही.
विचार करा माणूस जर आपली दैनंदिन कामे न बोलता अगदी चिडीचूपपणे करत असता तर काय प्रॉब्लेम झाला असता खूप शांतता निर्माण झाली असती खरी परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट त्याप्रमाणे हेही वाइटच झाले असते.माणसाला आणि त्याच्यासोबत या पृथ्वीवर वास करणाऱ्या प्रत्येक जीवाला आपल्या मनातील गोष्टी आपल्या व्यक्तीजवळ मुक्तपणाने बोलून दाखवायची नितांत आवश्यकता असते.या त्याच्या परिस्थितीत त्याला एका माध्यमाची गरज असते आणि हेच माध्यम संवादाने प्राप्त होते.अनेक मोठमोठ्या गोष्टी निव्वळ चर्चा करून म्हणजेच शेवटी संवादानेच साध्य करून घेता येतात आणि करून घेतल्या सुद्धा आहेत.म्हणजेच संवादाचा उपयोग आपण शस्त्रापेक्षा सुद्धा तीक्ष्णतेने करता येतो हे सिद्ध होते.संवादाचे आणखीन एक गुणवैशिष्ट्य म्हणजे एकमेकांशी संवाद साधताना तोंडच हवं असा काहीच नाही.नाहीतर मुकी लोक तर कधी संवाद साधू शकलीच नसती पण येथेच संवादाचे महत्त्व समजते कारण प्राणी आणि पक्ष्यांना सुद्धा आपल्या एका वेगळ्या शैलीत संवाद साधताच येतो आणि अनेक मुक्या लोकांना यातूनच प्रेरणा मिळून केवळ हातांनी संकेत करून या लोकांनी आपल्या त्या गोष्टीवरही मात केलेली आहे.
संवादाचा एकच अवगुण होता तो म्हणजे आतापर्यंत संवाद फार पसरलेला नव्हता म्हणजे खूप कमी अंतरावरूनच संवाद करणे शक्य होते.परतू आधुनिक संवादाने त्यावर सुद्धा मात केलेली आहे.दूरध्वनी,भ्रमणध्वनी,आंतरजाल इत्यादी गोष्टींमुळे तर आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यापर्यंत कसाही संवाद साधता येतो.या असल्या गोष्टी संवादाच्या महत्तेत भरच घालत असतात.
तर संवादाचे महत्त्व असे आहे.माणसाला जर सुखात या पृथ्वीवर वास करायचा असेल तर संवाद साधल्याशिवाय तो जिवंत राहूच शकत नाही.आणि म्हणूनच संवाद म्हणजे परमेश्वराने माणसाला दिलेली एक विलक्षण देणगीच आहे,नाही का मित्रांनो….…