India Languages, asked by vyom339, 5 months ago

आभ्यासाचे महत्त्व निबंध in Marathi ​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

मुलांना नेहमी शास्त्रज्ञ, उद्योगपती, कुशाग्र बुद्धीमत्तेच्या प्रसिद्ध व्यक्तीच्या निवडक गोष्टी सांगाव्यात व त्याप्रमाणे या मोठ्या पदावर पोहोचण्यास त्या व्यक्तींना काय श्रम करावे लागले, किती अभ्यास करावा लागला, याची माहिती मुलांच्या मनावर परिणामकारकरीत्या रुजेल, असे पहावे. कठोर परिश्रमास पर्याय नाही याबद्दल त्यांच्या मनात संदेह राहू नये.

मुलाच्या मनावर हे बिंबवा की, स्वकर्माची फळे त्याला भोगायची असतात. आता अभ्यास केल्यास त्यालाच त्याचा पुढे सर्वांगीण फायदा होईल. कठोर, प्रामाणिक परिश्रम करणाऱ्यांच्या पाठीशी देव सदैव उभा रहातो, हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.

अभ्यास सोपा करून सांगण्यासाठी वेगवेगळया साधनांची मदत घ्या !

जेवढे मूल वयाने लहान तेवढे निरनिराळया गोष्टी किंवा योग्य ती उदाहरणे देऊन विषय सोपा करून अभ्यासाविषयी आवड निर्माण करणे महत्त्वाचे असते. १० ते १२ वर्षे वयाच्या मुलांमध्ये अमूर्त कल्पनेचा विकास झालेला नसतो व त्यामुळे बीजगणितातील `क्ष’ म्हणजे नेमके काय याचे त्यांना आकलन होत नाही.

२ – ४ गोट्या, पेन्सिली किंवा लाकडी ठोकळयांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. मधून-मधून मुलाला विषयाचे आकलन होत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. गणित, विज्ञान यांसारख्या विषयांचा पाया पक्का करणे पालकांना जमत नसेल, तर त्यासाठी अनुभवी शिक्षकाची मदत घेणे योग्य होय.

जर मूल नापास झाले असेल, तर त्याला वरच्या वर्गात ढकलण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर त्याच्या अभ्यासाचा पायाच जर मुळात कच्चा राहिला असेल, तर वरच्या वर्गाच्या वाढलेल्या अभ्यासात तो आणखीनच मागे पडेल. जर मूल नापास झाले असेल, तर त्याला रागावू नका. वारंवार रागावल्याने मुलाचे अभ्यासातील लक्ष आणखीनच कमी होऊन तो अभ्यास करणे सोडून देईल. त्याला सहानुभूतीने वागवून त्याच्या नापास होण्याची कारणमीमांसा करून त्यात सुधारणा करू शकतो.

घरातील वातावरण अभ्यास करण्यास पुरक ठेवा !

चांगला अभ्यास होण्यासाठी घरातील वातावरण खेळीमेळीचे, विश्वासपूर्ण, शांत व अभ्यास करण्यास उत्तेजक असले पाहिजे. प्राचीन काळी मुलांना विद्या संपादन करण्यासाठी आश्रमांत पाठवले जात असे व असे आश्रम गावापासून दूर एकांतात, शांत, प्रसन्न वातावरणात असत. आताच्या बदललेल्या शिक्षणपद्धतीमुळे पालकांवरील जबाबदारी जास्तच वाढली आहे. म्हणून पालकांनी घरातील वातावरण शांत, खेळीमेळीचे व अभ्यासास उत्तेजन मिळेल अशा प्रकारचे ठेवण्यासाठी जागरूक असले पाहिजे.

मूल अभ्यास करत असतांना रेडिओ किंवा दूरदर्शन लावू नये. मुलांसमोर आई-वडिलांनी एकमेकांशी भांडण करू नये. तसेच हातातले काम सोडून अथवा स्वयंपाक करता करता रस्त्याने जाणारी लग्नाची वरात पहाण्यासाठी धावू नये, कारण तुमच्या पाठोपाठ तुमचे मूलही अभ्यास अर्धवट सोडून तुमच्याप्रमाणेच लग्नाची वरात पहाण्यासाठी धावेल. जर तुम्हाला स्वत:ला वरात पहाण्याचा मोह टाळता येत नसेल, तर तुमच्या मुलाने तोच मोह टाळून अभ्यास करीत बसावे, ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. थोडक्यात म्हणजे मुलाचा अभ्यास चांगला व्हावा, असे वाटत असेल, तर घरातले वातावरण आश्रमासारखेच व्हायला हवे.

मध्येच केव्हातरी मुलाला त्याच्या अभ्यासाविषयी विचारण्यापेक्षा दररोज थोडा वेळ त्याला शिकवावे. जर तुमचा मुलगा महाविद्यालयात जात असेल व त्याचे विषय तुम्हाला शिकवता येत नसतील, तर निदान रात्री मुलगा अभ्यास करीत असतांना मुलाबरोबर काहीतरी उपयोगी असे, उदा. गीता, ज्ञानेश्वरी, संतांची चरित्रे यांसारखे वाचन करावे व त्याची स्वत: टिपणे काढावीत. तुमच्या मुलाला किंवा मुलीला सोबत मिळेल व आई-वडीलही अभ्यास करीत आहेत, याची जाणीव त्याला होईल. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, की मुले ही अनुकरणप्रिय असतात.

एखादा परिच्छेद वाचून मग एक-दोन ओळीत त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहिण्याची सवय मुलांना लावावी व नंतर संपूर्ण धडाच संक्षिप्त करून मुख्य मुद्यांची मांडणी करावी. साधारणत: एखाद्या विषयावर मन एकाग्र करून अभ्यास सतत ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ करणे अवघड असते. त्यामुळे मुलाला थोडा वेळ मध्ये विश्रांती घेऊ द्यावी किंवा विषय बदलण्यास सांगावे.

केवळ जास्त तास अभ्यास करणे हा खरा अभ्यास नव्हे. एकाग्रतेने ३ ते ४ तास वाचन-मनन केले, तर तो खरा अभ्यास होय. काही वेळा मुलांना आवडणाऱ्या देवाचे चित्र त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवल्याने मुलांत आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. मन एकाग्र करण्यास ध्यान धारणेचाही पुष्कळ उपयोग होतो.

Similar questions