आमचे शेजारी निबंध essay in marathi
Answers
Answer:
लहानपणी आम्ही गोरेगावला बैठ्या चाळीत रहात असू. तेव्हा चाळीतला शेजारधर्म पाळत चिऊताई सकाळ संध्याकाळ केव्हाही आमच्या घरी येऊन जाऊन असायच्या. कावळेकाका सुद्धा बाहेरून जाता जाता कधी खिडकीवर येऊन चौकशी करून जायचे. पण ह्या दोघांव्यतिरिक्त दुसर्या शेजार्यांची तितकी सवय नव्हती. नाही म्हणायला एखाद्या मत्स्याहाराच्या दिवशी बोकेदादा येऊन जात. किवा फार फार लहानपणी एखादी कोंबडीमावशी आईला धान्य निवडायला मदत करायला यायची. पण त्यांना सहसा आमचा "पाहुणचार" मिळायचा! मग अचानक चिऊताईनी आपला मुक्काम मुंबईतना हलवला कळले आणि आमच्याकडे त्याचे येणेजाणे कमी होत गेले.
एकविसाव्या शतकात आम्ही पण नव्या जगाबरोबर चाळकरी न राहता, फ्लॅटधारी झालो. तसेही शेजारधर्मपालन आमचा पिंड नव्हताच; तश्यात मग फ्लॅट संस्कृती (???) आम्हाला मानवली. चिऊताईनी मुंबई सोडली खरी पण फार काळ त्या मुंबईपासून दूर नाही राहू शकल्या. त्या आल्या परत. पण आता त्यांना जवळ करणाऱ्या चाळी इथे नव्हत्या. फ्लॅट त्यांना तितके आवडले नाहीत. मग त्या दूरदूर झाडातच राहू लागल्या. कावळेकाका एरवी पण खिडकीतूनच चौकशी करायचे. आता कधी चुकून माकून ग्रीलवर येऊन डोकावून जातात, पण काही चौकशीच्या भानगडीत पडत नाहीत.
पण आम्ही कितीही शेजार्यांना थारा दिला नाही तरी शेजारधर्म काही चुकला नाही. नव्या युगात नवे शेजारी आलेच कि हो! आणि शेजारी तरी कसले मेले चहाटळ! अहो मी सध्याचे मुंबईचे प्रथम नागरिक कबुतररावान्बद्दल बोलतेय. एकतर त्यांना घर वगैरे काही बांधायला आवडत नाही. नुसतेच गॅलरीत चार काटक्या टाकल्या कि झाली त्यांची सोय. बरं ह्या कबुतररावांचा लोचटपणा तरी काय सांगावा. काही कामधंदा नाही, दिवसभर आपले सौ. कबुतर यांच्या मागे मागे गुतुर्र गुतुर्र करत घोटाळत राहणे. स्थळ, काळ, वेळ कसलाही विधिनिषेध न बाळगता मेल्यांचं प्रणयाराधन चाललेलं असतं. तोंडात तोंड काय घालणं, गोल गोल चित्रपटातल्या नायक नायिकेसारखं पिंगा काय घालणं, अश्लील स्वरात गुतुर्र गुतुर्र करणं. आणि सगळ्यात कहर म्हणजे आम्ही त्यांना हाकून इतका निषेध व्यक्त करतो पण मेले ऐकतच नाहीत. परत येरे माझ्या मागल्या!
हल्ली आमच्याकडे नव्या शेजारी आल्या आहेत - मैनाबाई साळुंखे. लहानपणी त्यांना कधी पाहिलेले आठवत नाही. कदाचित त्याकाळी वृक्षराजींचा सुकाळ असल्याने त्यांनी आम्हाला खिजगणतीत धरले नव्हते. पण आता दिवस हिरव्या नाही तर करड्या सिमेंटच्या जंगलांचे आहेत. बाईनी नव्या युगाची चाहूल बरोबर ओळखली आणि नाईलाजाने का होईना आम्हा मानवांचा शेजार स्वीकारला आहे. असे असले तरी इतके दिवस त्या चिऊताईसारख्या दूर झाडावरच रहात. पण ह्या वर्षी साळुंखे रावांनी जरा धीर एकवटून आम्हाला साथ देण्याचे ठरवलेय. आमच्या न्हाणीघराच्या बाहेर साळुंखे कुटुंबाचा रैनबसेरा आहे. मैनाबाई नुकत्याच बाळंत झाल्या आहेत. नवजात बाळाचे सारे काही एकहाती सांभाळताना बिचार्या अगदीच मेटाकुटीला आल्या असाव्यात. सकाळसंध्याकाळ तिन्ही त्रिकाळ त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच असतो. बर साळुंखे रावांनी घरतरी जरा नीटसे बांधून द्यावे ना! हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये इमारत सुंदर दिसावी, गळके ओंगळवाणे नळ दृष्टीस पडू नये म्हणून जी बोळकांडी बनवली जातात त्यात, एका नळाच्या आधाराने कसेबसे घर बांधले आहे. बिचार्या मातेला आपल्या बाळांना अश्या प्रदूषित अडचणीच्या जागी वाढवताना किती यातना होत असतील. सकाळी सकाळी अगदी हळुवार स्वरात 'कुर्र कुर्र' (आपल्या मानवांची कुरकुर नाही हा!) बाळाला गोंजारत असते. इतक्यात साळुंखेराव न्याहारी घेऊन येतात. काय घेऊन येतात कोण जाणे?! बाई एकदम खवळून उठतात. मग त्याचं तारसप्तकात वचावचा भांडण सुरु होतं. दिवसभर खेळ चाललेला असतो. खरतर त्यांचे आडनाव साळुंखे ऐवजी वटवटे असायला हवे होते. शहरी जीवनाला नाव ठेवणारे आणि नेहेमी गावाकडच्या गोष्टी सांगणारे कुणी म्हणतात, गावाकडे कसा सकाळी सकाळी पक्ष्यांचा गुंजारव ऐकू येतो! त्यांना म्हणावं एकदा या आमच्याकडे! मस्त गुंजारव ऐकू येईल!!