आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा.
Answers
हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. उतारवयातकाही आजारात, आणि चुन्याच्या अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते. अपघातामध्ये वेडावाकडा मार लागून हाडे मोडण्याचा संभव असतो. हाड मोडणे म्हणजेच'अस्थिभंग'. अस्थिभंगाचे विविध प्रकार आहेत.
अस्थिभंगाचे विविध प्रकार
लहान मुलांची हाडे लवचीक असतात. त्यामुळे ती पूर्ण न मोडता हिरवट फांद्याप्रमाणे केवळ एक बाजूला मोडतात. पूर्ण ताटातूट न झाल्यामुळे तुकडे एकमेकांबरोबर राहतात. असा अस्थिभंग केवळ क्ष-किरणांनी दिसतो व लवकर जुळून येतो. नंतरच्या वयात मात्र हाडे कडक असतात आणि वाळलेल्या काठीप्रमाणे काडकन तुकडे होतात.
काहीवेळा ज्या अस्थिभंगामध्ये त्वचेला जखम न होता अस्थिभंग आतल्या आत राहतो. याला केवळ अस्थिभंग असे म्हणावे. ज्यामध्ये हाड तर मोडतेच पण वरच्या त्वचेला व मऊ भागांनाही जखम होते अशा अस्थिभंगास अवघड किंवावाईट अस्थिभंग असे म्हणावे. हा अवघड अशासाठी, की जखमेत सूक्ष्मजंतू मिसळून पू होणे, सूज येणे, ताप येणे, जखम चरत जाणे वगैरे समस्या निर्माण होतात.
ज्या अस्थिभंगात हाडाचे तुकडे खूप होतात त्याला चुरा अस्थिभंग म्हणावे.
अस्थिभंगाची लक्षणे व निदान
वेदना : अस्थिभंगामुळे असह्य वेदना होते. ही वेदना अस्थिभंगाच्या जागी होते. वेदनेच्या जागेवरून अस्थिभंग कोठे आहे हे शोधता येते. हालचालीने वेदना वाढते.
हालचालीवर बंधने : अस्थिभंगामुळे त्या भागाची हालचाल कमी होते किंवा बंद पडते. हाड तुटल्यामुळे पुढची हालचाल होत नाही. हालचालीमुळे वेदना होत असल्याने ती व्यक्ती तो भाग हालवायला तयार नसते.
त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा विचित्र दिसणे : अस्थिभंग होऊन हाडाचे तुकडे वेगवेगळे झाले असतील तर त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा दिसतो. सूज जास्त असेल तर मात्र हा विचित्र आकार लपून जातो.
सूज : अस्थिभंगाने अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे तो भाग सुजतो.
आवाज : अस्थिभंगाच्या जागी हाताने थोडे दाबून पाहिल्यास हाडांचे तुकडे एकमेकांवर घासल्याचा (कडकड वाजल्याचा ) अनुभव येईल.