Aarogyache mahatva in marathi nibhand
Answers
Answer:
आरोग्याची संकल्पना कशी करता येईल? शरीर आणि मन जर पूर्णपणे स्वस्थ असेल, आणि स्वस्थ असल्याची जाणीवही तुम्हाला नसेल तेव्हाच आरोग्य असते, असे समजा. कारण स्वास्थ्य बिघाड असल्यास आपल्याला सतत शरीराची आठवण होत राहते म्हणून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे आवश्यक आहे.
आरोग्य हीच संपत्ती निबंध आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पष्ट होण्यासाठी शालेयदशेत असताना लिहायला लागतो. निबंध लिहताना आरोग्यपूर्ण आयुष्याचे फायदे आणि अनारोग्याचे तोटे स्पष्ट करायचे असतात. चला तर मग पाहूया, कसा लिहाल, सोप्यात सोप्या पद्धतीने आरोग्य हीच संपत्ती हा निबंध !
आजचा काळ हा स्पर्धेचा काळ म्हणावा लागेल, जिथे सर्वजण एका वेगळ्याच धावपळीत गुंग आहेत. अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टींकडे लक्ष असते. परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे लक्ष आपण देत असतो याचा विचार केला पाहिजे. आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे.
आजचे दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो खर्चही सहन करतो. अशातच त्यात जाणारा वेळही खूप असतो. रासायनिक औषधे आपल्याला वरचेवर बरे करतात आणि त्यांचे सेवन जीवनभर करावे लागेल अशी ग्वाही स्वतः डॉक्टरच देतात. म्हणजे एखादी समस्या उद्भवली की कायमचा उपाय करण्यापेक्षा आपण मेडिकल, दवाखाना यांच्याशी बांधले जातो. त्या सर्वांचा असणारा मनःस्तापही मोठा असतो.
अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून आरोग्याचे महत्त्व सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. शारीरिक अवस्था ही नश्वर आहे, स्थायीभाव हा शरीराचा नियम नाही. शरीराची वाढ होणे आणि वृद्ध होऊन मृत्यू होणे हेदेखील सत्यच आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत आपण निरोगी कसे राहू शकतो? याचा संपूर्णतः विचार झाला पाहिजे. या विचारातूनच मग आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असे जाणवेल.
आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीचे आरोग्य अभिप्रेत आहे कारण मानसिक स्थिती जर कणखर नसेल तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. मनात भीती, टेन्शन असेल तर रक्तदाब, डोकेदुखी, हृदय विकार ह्या समस्या उद्भवतात. शरीराची चांगल्या प्रकारे सुव्यवस्था राखायची असेल तर मानसिक आरोग्यही जपले पाहिजे. त्यासाठी आपण योगा, प्राणायाम, मेडिटेशन करू शकतो.
मानसिक आरोग्य सुधारले की तुम्ही आपोआप आनंदी आणि समाधानी राहता. तुमचा विचार करण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. आता मुद्दा राहतो तो म्हणजे शरीर! शरीर हे एक यंत्र आहे. ते सतत चालू राहिले पाहिजे. प्रत्येक अवयव हा कार्यात मग्न असला पाहिजे. हात पाय सतत कामात किंवा व्यायामात उपयोगात आले पाहिजेत. त्या व्यतिरिक्त ताठ बसणे, व्यवस्थित चालणे, एखादा शारीरिक खेळ खेळणे हे शरीरासाठी आरोग्यदायी अशा गोष्टी आहेत.
हाडे, हृदय, रक्त, मज्जा संस्था, पचनसंस्था, मेंदू, इंद्रिये ही सर्व व्यवस्थित निरोगी राहण्यासाठी दिवसातून एकदा तरी घाम येईपर्यंत व्यायाम किंवा शारीरिक कष्ट केले पाहिजेत. शरीरातील विषारी ग्रंथी घामावाटे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरात कोणताच रोग निर्माण होत नाही. त्याव्यतिरिक्त भरपूर पाणी पिणे, नियंत्रित जेवण करणे आवश्यक आहे. पोटभरून जेवण केल्याने सुस्ती आणि आळस निर्माण होतो. आपल्याला जास्त झोप येते.
वारंवार पोटभरून जेवल्याने मग तशीच सवय लागते. अनावश्यक ग्रंथी शरीरातून बाहेर पडत नाहीत आणि रोगांना आमंत्रण मिळते. कुठल्याच व्यक्तीला आजार झाल्याशिवाय आरोग्याचे महत्त्व कळत नाही. नंतर उपचार घेण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी! आज कर्करोग, हृदयविकार या समस्या तर खूप लोकांत आढळतात. त्या लोकांचे उपचार आयुष्यभर चाललेले असतात. स्वतःचा भविष्यातील वेळ दवाखान्यात घालवायचा नसेल तर त्यासाठी दिवसभरातून थोडासा तरी व्यायाम आत्तापासून करायला सुरुवात करा.
आपल्याला सुख आणि समाधान मिळवण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे ही सर्वात प्राथमिक गरज आहे. त्यासाठी शारीरिक कष्टही गरजेचे आहेत. आज शारीरिक कष्ट कमी झाल्याने लोक नुसते लठ्ठ बनत चालले आहेत. रक्तदाब, मधुमेह या समस्या अशा लोकांत मग सहज आढळतात. मृत्यू तर येणारच आहे पण दवाखान्यात मृत्यू येण्याअगोदर सजग व्हा.
आरोग्यदायी आयुष्यात आनंद तर प्राप्त होतोच शिवाय स्वतःचे छंद आणि आवड जोपासण्यासाठी खूप सारा वेळ मिळतो कारण अशा व्यक्ती आळशी नसतात. साहजिकच सकाळी लवकर उठून कामाला लागतात. रात्रीही लवकर झोपतात. आयुष्यात मिळालेल्या गोष्टी भोगण्यासाठी किंवा वापरण्यासाठी तरी आरोग्य व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करा आणि आनंदी व्हा. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने समजेल, आरोग्य हीच संपत्ती !