Science, asked by sslobo33, 4 months ago

amchi sahal essay in marathi

Answers

Answered by yashwantnewastha
6

Answer:

दर वर्षी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी आमच्या शाळेची सहल निघते. सहलीची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहात असतो. नेहमीप्रमाणे ट्रीपला जाण्याचा दिवस उजाडला. एस.टी. भल्या सकाळीच आली. जेवणाचा डबा, पाणी घेऊन, दंगामस्ती करीत रांगेनं आम्ही गाडीत चढलो. नागमोडी वळणे घेत सह्याद्रीच्या रांगांमधून एस.टी. सुसाट पळत होती. जणू तिलाही आम्हाला लवकरात लवकर माळशेज घाटात घेऊन जायचे होते. दोनच तासांत आम्ही पोहोचलोही.

त्या दिवशी खरं तर पावसाचा मागमूसही नव्हता, तरी आभाळ भरून आले. विजा चमकू लागल्या. वारे आडवे-तिडवे वाहू लागले. घाटमाथ्यावरचं नी खोलखोल दरीतलं चित्र क्षणात बदललं. काळ्या ढगांच्या झुंडी पर्वतांवर झेपावू लागल्या. एक थेंब, दोन थेंब करीत टपटप पाऊस पडू लागला. पावसाची सर आम्हीही अंगाखांद्यावर खेळवली. ताजेतवाने वाट लागले. पाऊस वाढला, तसे तेथील शंकराच्या देवळाचा दाटीवाटीने आसरा घेतला. तासाभराने देवळातून बाहेर आलो तर...

अहाहा! काय सुंदर नि रम्य दृश्य होते ते! उंच डोंगरांवरून पाण्याचे धबधबे पडत होते. मंजूळ गाणी म्हणत झरे ओसंडून वाहत होते. नद्या तर जणू 'चहा'च्याच बनल्या होत्या. कडेकपारीतून सुंदर रंगीबेरंगी रानफुलं उमलली होती. केळीची रोपं तरारून उभी होती. रान रंगागंधानं धुंद, जडावलं होतं. जमिनीवर नजर पोहोचेल तिथे हिरव्या रंगानं दाटीवाटी केली होती. 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे' हे वर्णन किती खरं आहे, याची प्रचिती येत होती.

'श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे। क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे।'

असा सृष्टीचा ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. जमिनीवरून लाल-काळ्या मंग्या, मंगळे रांगेत चालले होते. पक्षी किलबिलाट करीत सारं आकाश त्यांच्याच मालकीचं असल्याच्या आविर्भावात उडत होते. आम्हाला आता कडकडून भूक लागली होती. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली डबे उघडून सारे गोल करून बसलो. अंगत-पंगत सजली. पदार्थांची देवाणघेवाण झाली. 'वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे' असे म्हणत जेवायला सुरुवात झाली. खरंच सहभोजनाने मैत्री नक्कीच पक्की होते.

जेवल्यानंतर आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य बघत आम्ही सारे सरांबरोबर घाटामध्ये पायी चालू लागलो. एक सपाट गोलाकार जागा सापडताच तेथे रूमालपाणी, उभा खो खोचा डावही टाकला. खूप खेळलो. एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती. पक्षी घरट्यात परतू लागले. गाई-गुरं घरांकडे, गोठ्यांकडे धावू लागल्या. आम्ही परत एस.टी.त बसून शाळेकडे परतू लागलो. डोंगरापलीकडून सूर्याचा लाल गोळाही दिवसभराची ड्युटी संपवून घरी निघाला होता. गुलाबी-केशरी रंगाच्या छटा आकाशात उमटल्या. जणू पऱ्या रंगपंचमी खेळत होत्या. सृष्टीवर गुलाल उधळत होत्या.

सगळे गाडीत बसलो. गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या. मुलींचा व मुलांचा असे दोन गट पडले. दमलो होतो, तरी मोठ्या आवाजात नवी-जुनी गाणी म्हणत, एकमेकांवर भेंड्या चढवीत, गाडी शाळेपुढे कधी येऊन थांबली हे कळलेदेखील नाही. जड मनाने मित्रांचा निरोप घेत आई-बाबांबरोबर घरी पोहचलो. डोळे मिटले, तरी निसर्गाचा तो सुंदर देखावा डोळ्यांसमोरून हलायला तयार नव्हता. त्या ग्रेट कलावंताला मी त्रिवार मुजरा केला.

Similar questions