भूजल पातळी खालावत जात आहे निरीक्षण
Answers
Answer:
औरंगाबाद : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 71 तालुक्यांतील पाणी खोल गेले आहे. यासाठी 875 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पाण्याची पातळी सर्वाधिक कमी म्हणजे मागील पाच वर्षांच्या तुलनेत 6.14 मीटरने घटली आहे. नुकत्याच केलेल्या भूजल सर्वेक्षणात ही स्थिती समोर आली आहे.
मागील तुलनेत वेगाने पाणीपातळी खोल जात असल्याचे भीषण वास्तव पुढे आल्याने आता भूगर्भ पाण्याने कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी पाणी शोधण्याची वेळ मराठवाड्यातील 35 लाख 64 हजार 467 ग्रामस्थांवर आली आहे. पावसाचे घटते प्रमाण आणि खोलवर जात असलेली भूजल पातळी हे मोठे संकट उभे होत असल्याचे सूतोवाच करत आहेत. मराठवाड्यातील प्रमुख असलेल्या गोदावरी, पूर्णा, मांजरा, सीना, भीमा, पैनगंगा या नदीपात्रांची अवस्थादेखील वाईट आहे. 2 हजार 295 गाव-वाड्यांवर 2 हजार 304 टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरकारी यंत्रणा सोडवू शकली नाही, त्यामुळे सिंचनासाठी काय काम होत असेल, याचा अंदाज लावता येतो.
मराठवाड्यातील या संकटास निसर्ग, सरकारी यंत्रणा; तसेच लोकप्रतिनिधींचे याकडे झालेले दुर्लक्षच कारणीभूत ठरत आहे, असा आरोप आता शेतकऱ्यांमधून केला जात आहे. आतापर्यंत किमान पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न का सुटू शकला नाही, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
पाच वर्षांच्या तुलनेत जिल्हानिहाय सर्वाधिक भूजलात घट झालेले तालुके (आकडे मीटरमध्ये)
जिल्हा... तालुका - घट
औरंगाबाद - सोयगाव - 3.36
जालना - बदनापूर - 3.37
परभणी - सेलू - 3.59
हिंगोली - औंढा नागनाथ - 1.35
नांदेड - मुखेड - 1.63
लातूर - लातूर - 2.99
उस्मानाबाद - वाशी - 6.14
बीड - गेवराई - 3.80
या तालुक्यांत झाली वाढ
मराठवाड्यातील 76 तालुक्यांपैकी परभणी जिल्ह्यातील पाथरी, तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हादगाव, नायगाव व कंधार अशा केवळ पाच तालुक्यांत सरासरी भूजल पातळीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.