भारतीय समाज आणि संस्कृती यावर वसाहतवादी दृष्टीकोनाची वैशिष्ट्ये
Answers
कोशकार, भाषांतरकार, लेखक, भाषाविज्ञ असं अनेकांगी व्यक्तिमत्त्व असलेले अविनाश बिनीवाले यांना मराठी भाषा दिनानिमित्त गेल्याच महिन्यात महाराष्ट्र सरकारने डॉ. अशोक केळकर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. गेली पन्नास वर्षे बिनिवाले यांनी भाषेच्या क्षेत्रात अथकपणे काम केलं आहे. त्यांनी आजपर्यंत ७० पुस्तकांची निर्मिती केली आहे. बहुतेक सर्व भारतीय भाषा जाणणारे, जर्मन, रशियन आणि हिंदी या भाषा गेली अनेक वर्षे शिकवणारे आणि जर्मन भाषेचे हिंदी, गुजराती व मराठी भाषांमध्ये शब्दकोश तयार करणारे म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. सध्या ते जपानी भाषा सहजपणे शिकता यावी याकरिता पुस्तकानिर्मितीच्या कामात व्यग्र आहेत.
अविनाश बिनीवाले यांच्याशी नूपुर देसाई यांनी साधलेला हा संवाद –
महाराष्ट्र सरकारचा अशोक केळकर पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. आपण विविध भाषात आणि भाषांवर गेली काही दशके काम करत आहात. आपल्या या भाषेच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगू शकाल काय? ही आवड कशी निर्माण झाली आणि कशी घडत गेली?
मी भाषा पद्धतशीरपणे शिकलो. त्या पिक्ड अप नाहीयेत. लहानपणापासून मला भाषांमध्ये रस होता. माझे वडील बराच काळ फ्रान्समध्ये होते आणि माझी आत्या पंधरा एक वर्षे फ्रान्समध्ये होती. मग आत्या परत आल्यानंतर माझे वडील आणि आत्या बऱ्याचदा फ्रेंचमध्ये बोलत असत. आणि मग मला कुतुहल वाटायचं की हे काय बोलतायत? म्हणजे आपल्या घरात कुणीतरी काहीतरी बोलतंय आणि आपल्याला कळत नाही असं सहसा होत नाही. हे न कळणारं बोलणं होतं त्यामुळे मला त्यात रूची तयार झाली. मी शाळेमध्ये असतानाच सुरूवातीला फ्रेंच शिकलो होतो. पुढे पद्धतशीरपणे पुणे विद्यापीठामध्ये फ्रेंचही शिकलो. डॉ. दलरी हे माझे पहिले गुरू होते. दलरी हे पहिले असे गुरू मला भेटले ज्यांनी आपल्या शिकवण्यातून असं सांगितलं, म्हणजे व्याख्यान देऊन नव्हे, की भाषा आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. त्या हातात हात घालून जात असतात. भाषा ही संस्कृतीशी जोडलेली आहे हे मला पहिल्यांदा कळलं ते दलरींमुळे. दलरी आणि लेदर्ले हे दोघंही माझे गुरू होते. पुढे मला अशी संधी होती..म्हणजे मला नाणी जमवायचा छंद होता. त्या नाण्यांवर फारसीमध्ये लिहिलेलं असलं की कळायचं नाही. त्यावेळी डावीकडून उजवीकडच्या बऱ्याचशा लिप्या मला येत होत्या पण उजवीकडून डावीकडच्या लिपी येत नव्हत्या. तेव्हा इतिहास संशोधक मंडळात ग. ह. खरे होते. मी दरवेळी त्यांच्याकडे जायचो की हे नाणं कुठलं आहे, महत्त्वाचं आहे की नाही. मग एकदा खरे मला म्हणाले की तू दरवेळी धावत पळत माझ्याकडे येतोस त्यापेक्षा तू स्वतःच वाचायला शीक.