'चला खेड्याकडे' या विषयावर निबंध लिहा
Answers
Answer:
pls mark me brainlist
Explanation:
महात्मा गांधीजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन दिग्गजांनी त्यांच्या विचार आणि कृतीतून आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जाण्यात समाजाचे मोठे हित आहे.
मात्र, बहुतेकांचा भर वितंडवादावर असतो. त्यामुळे थोरांच्या प्रबोधनातील आशयाकडे त्यांचे दुर्लक्ष होत े. खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी ‘खेड्याकडे चला,’ अशी हाक दिली; तर डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला. या दोन्ही गोष्टींच्या मुळाशी समजोन्नतीचा हेतू आहे. त्यामुळे, त्या जाणून घेऊन पावले टाकल्यास आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
कृषिप्रधान भारतातील बहुसंख्य खेडी एकेकाळी स्वयंपूर्ण होती. ती प्रामुख्याने बलुतेदारी पद्धतीमुळे आली होती. सरंजामदारांकडून बलुतेदारांचे शोषण होत असले, तरी ही व्यवस्था गावची गरज भागवत असे.
विविध बलुतेदार गावकऱ्यांना हवी ती कामे करून देत असत. त्यामुळे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. वयोवृद्धांना मान दिला जात असे. दारी आलेल्या बैराग्यांना, साधूंना विन्मुख पाठविले जात नसे. मुलांच्या व्यायामासाठी तालिम, मंदिर, धर्मशाळा असत. गावात मंदिरापुढे भजनं, कीर्तनं, सप्ताह होत. दशावतारी नाटकांत सर्व जातीधर्माचे कलाकार भाग घेत. त्या काळात कोणाच्या फारशा अपेक्षा नसल्याने साधेपणाही होता. आपापली कामे करावी आणि भजन-कीर्तनात रममाण व्हावे, अशी धारणा होती. माझ्या बालपणी मी हे सारे अनुभवले आहे.
मात्र, त्या काळात खेड्यांत शिक्षणाचे प्रमाण नगण्य होते. त्यामुळे श्रद्धा-अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर होत्या. जात-पातही पाळले जात असे. कर्मकांडही मोठ्या प्रमाणावर होते. या साऱ्यांच्या विरोधात प्रथम संतांनी प्रबोधन केले आणि नंतर महात्मा फुले यांच्यापासून गांधीजींपर्यंत अनेकांनी आवाज उठविला.
स्वातंत्र्याची चळवळ आणि समाजसुधारणेची चळवळ यांमुळे खेड्यांमधील जागरुकता येत गेली. सामाजिक प्रश्नांची चर्चा होत गेली. मागासवर्गीय, उपेक्षित, वंचित समाजाच्या प्रश्नांना वाचा फुटली. शिक्षणाचा प्रसारही होत गेला.
स्वातंत्र्य मिळाले. राज्यघटना कार्यान्वित झाली. डॉ. आंबेडकरांनी दलित वंचितांना घटनात्मक हक्क मिळवून दिले. त्यांना राखीव जागांवर शिक्षण व नोकऱ्यांची संधी मिळाली. दलित आणि स्त्रिया मोठ्या संख्येने शिक्षण घेऊ लागले. आपली प्रगती करू लागले.
शिक्षण आणि नोकऱ्यांमुळे शहरांकडील ओघ वाढला. खेडी ओस पडू लागली. बलुतेदारीची कालसुसंगताही संपली. मात्र, आधुनिक काळानुसार खेड्यांत म्हणावे तसे बदल झाले नाहीत. तिथे शाळा निघाल्या. थोड्याशा मोठ्या ठिकाणी महाविद्यालयेही सुरू झाली. मात्र, अन्य पूरक उद्योग सुरू झाले नाहीत. शेतीचे स्वरूपही फारसे बदलले नाही. शेती खंडित होत गेली. शेती मुळातच निसर्गाधीन. त्यात आपल्याकडे शेतीमालाबाबत पोषक स्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत गेल्या. त्यामुळे नैराश्य वाढले. काहींनी मृत्यूलाही कवटाळवले. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याची संवेदनाही नाहीशी होत गेली. विशेषतः शहरी मानसिकता त्या विरोधात जाऊ लागली. अशा स्थितीत ‘खेड्यांकडे चला,’ या गांधीजींच्या वक्तव्याकडे कोण लक्ष देणार?
मात्र, खेड्याकडे जाण्याची खरी गरज आता भासते आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
आता खेड्यांचा शहराकडील ओघ थांबवायचा असेल, तर सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा. त्यांना समजून घेऊन त्यांचे जगणे सुसह्य करायला हवे.
शहरांप्रमाणे खेड्यांतही अद्यायावत शिक्षणसंस्था आणि उद्योगव्यवसाय सरकारने सुरू करायला हवेत. बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणाची सोय करायला हवी. सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण व सक्तीचे शिक्षण द्यायला हवे. खेड्यांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्यात यश मिळवलेले अनेक जण
आहेत; अण्णा हजारेंपासून पोपटराव पवारांपर्यंत. त्यांच्या कार्यापासून बोध घेत खेड्यांमध्ये परिवर्तन करण्याला प्राधान्य द्यायला हवे.
आपल्या प्रगतीला मानवी चेहरा द्यायचा असेल, तर याशिवाय पर्याय नाही. अन्यथा समाजाचे मनःस्वास्थ्य धोक्यात येईल.