Essay on माझी ताई in marathi
Answers
Answer:
hey here is your answer
फूलों का तारों का सबका केहना है,
एक हजारों मे मेरी बेहना है,
सारी उमर हमे संग रहना है
लतादीदी व किशोर कुमार यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं बहीण-भावाच्या गोड नात्यावर प्रकाश टाकणारं हे गाणं. हे गाणं ऐकल्यावर बहिणीला भावाची आणि भावाला बहिणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक पालकांना आपल्या घरात बहीण-भावाची जोडी असावी असं वाटतं. कारण हे नातंच काही वेगळं आहे. बहीण-भाऊ दोघे प्रेमाने राहतात असं आपण क्वचितच कधी ऐकलं असेल.
नेहमी दोघे एकमेकांशी या-ना त्या कारणाने सतत भांडत असतात. पण या भांडणामुळेच नात्यातलं प्रेम वाढत असते. आमच्या घरात मी आणि माझी बहीण दीपाली अशी आम्ही दोघचं भावंडं. माझ्यापेक्षा बहीण मोठी असताना, सगळ्यांना आम्हा भावंडात मी मोठा वाटायचो. ती माझ्यापेक्षा वयाने नाहीतर, किर्तीनेही मोठी आहे. शेवटी बहीण! एक ‘स्त्री’चं रूप. आणि स्त्री ही आपल्या परिवारासाठी काहीही करू शकते. यात काही शंकाच नाही. माझ्या बहिणीने प्रत्येक वेळी माझा विचार पहिला केला आहे.
माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आई-वडिलांपेक्षा ताईला सर्वात जास्त आनंद झाला. कारण तिला कोणीतरी हक्कानं ‘ताई’ म्हणणारं घरी आलं होतं. त्यामुळे तिचा माझ्यावर लहानपणापासूनच जीव होता. मला सायकलवर बसवून फिरवायची, चॉकलेट आधी मला खाऊ घालायची आणि मग ती खायची आणि मी शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा ती मला वर्गात सोडायची आणि मगच ती आपल्या वर्गात जायची. मधल्या सुट्टीत माझी विचारपूस करायची आणि शाळा सुटल्यावर घरी जाताना माझा भार हलका करण्यासाठी स्वत:च्या दप्तराबरोबर माझंही दप्तर घ्यायची आणि एका हाताने माझा हात धरून मला व्यवस्थित घरी आणायची.
माझी शाळा संपली आणि ताईची बारावी झाली. आणि मग तिने नोकरी करायला सुरुवात केली. कारण माझं कॉलेजचं शिक्षण आणि घरचा व्यवहार सांभाळण्यासाठी तिने हा निर्णय घेतला. शाळा संपल्यावर माझा प्रवेश महाविद्यालयात झाला. कॉलेजमध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं याचे धडे ती मला द्यायला लागली. इतकंच नाही तर कपडे कसे घालायचे हेदेखील तिनेच शिकवलं. इतकंच नाही तर चांगले कपडेही आणून दिले. बारावीपर्यंतच शिक्षण आई-वडिलांनी दिलं. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढचं शिक्षण घेण्याजोगी परिस्थिती नव्हती. तेव्हा मात्र ताईने आपल्या जमा केलेल्या सेव्हिंगमधून माझं पुढचं शिक्षण सुरू ठेवलं. हा निर्णय तिने स्वत:हून घेतला. ‘तू तुझ्या आवडत्या क्षेत्रात अॅडमिशन घेऊन पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण कर. उगीचंच नोकरीच्या फंदात पडू नकोस!’ असं तिने मला ठणकावून सांगितलं.
आज ताईमुळे मी उच्च शिक्षण घेऊ शकलो आणि माझ्या आवडत्या क्षेत्रात जाऊ शकलो. तिने त्यावेळेस मदत केली नसती, तर आज माझं शिक्षण अर्धवट राहिलं असतं आणि मलाही माझ्या मित्राप्रमाणे एखादा पार्टटाइम जॉब करून कॉलेज करावं लागलं असतं. माझं आणि तिचं भांडण रोज ठरलेलं असायचं, पण कधीही या भांडणात तिने मला टोमणा मारला नाही किंवा कधीही बोलून दाखवलं नाही. शिक्षण संपल्यावर मला हवी तशी नोकरी मिळावी, असं तिला नेहमी वाटायचं. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला माझ्या क्षेत्रातच नोकरी मिळाली आणि हे ताईला मी सांगितलं तेव्हा ती भलतीच खूष झाली.
माझ्या जडणघडणीत जितका आई-वडिलांचा हात असेल तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त माझ्या ताईचा हातभार आहे आणि या सगळय़ांमुळे मी तिचं खूप देणं लागतो. त्यामुळे भविष्यात मी तिला कधीच विसरणार नाही आणि तिच्यासाठी माझ्या हातून जितकं मला करता येईल त्यापेक्षाही जास्त मी करण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येक भावाला अशी बहीण व प्रत्येक बहिणीला असा भाऊ भेटला तर बहीण-भावाचं नातं पिढय़ान् पिढय़ा आणखी खुलत जाईल. अशी शांत, प्रेमळ व दिलदार स्वभावाची बहीण मला जन्मोजन्मी मिळावी.