१) ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया
Answers
नागरी समाज : नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय. समाजातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी बिगरशेती अगर बिगरप्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असणे, समाजाची लोकसंख्या मोठी असणे आणि लोकवस्तीची दाटी अधिक असणे, ही तिन्ही वैशिष्ट्ये एकत्रित असल्यास त्याला नागरी समाज म्हणता येईल. यांतील एखादेच वैशिष्ट्य दिसून आले, तर त्याला नागरी समाज म्हणता येणार नाही.
उपभोग्य वस्तूंची प्राप्ती नैसर्गिक रीतीने करून घेणे अगर बिनकसबी मजुरीतून सेवा उपलब्ध करून देणे, हे प्राथमिक व्यवसाय होत. शेती, खाणकाम, गुरे चारणे, मेंढ्या हाकणे, जंगलातून काटक्याकुटक्या, डिंक, मध गोळा करणे इ. हेही प्राथमिक व्यवसाय होत. या कामांचे स्वरूपच असे आहे, की त्यांतील माणसांच्या मानाने कामाची जागा मोठी असते. ग्रामीण समाजात अशा व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांची संख्या अधिक असते. बिगरप्राथमिक व्यवसायांमध्ये यंत्रोपकरणे, हत्यारे यांच्या साह्याने बुद्धिकौशल्य अगर कारागिरी वापरून उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करणे अगर सेवास्वरूपी कामे करणे, हे प्रकार येतात. भिन्नभिन्न क्षेत्रांतील व्यवस्थापनाचा व्यवहार सांभाळणारा अधिकारी वर्ग, प्रत्यक्ष उत्पादनात गुंतलेले लोक आणि अनेक तऱ्हेची सेवा करणारे लोक यांत येतात. नगरांमध्ये अशा लोकांची संख्या अधिक असते. यांच्या कार्याच्या मानाने त्यांना दैनंदिन व्यवहारांकरिता जागा कमी लागते. ग्रामीण आणि नागरी व्यवसायांमधला हा फरक सर्वकालीन नागरी समाजांच्या संदर्भात दिसून येतो; परंतु औद्योगिकीकरणपूर्व नागरी समाजात वस्तूंचे उत्पादन हे बव्हंशी अगर संपूर्णतया माणसांच्या हस्तकौशल्यावर अगर अंगमेहनतीवर अवलंबून असे. बैल, घोडा अशा जनावरांचा उपयोग जरी करून घेतला, तरी त्यांबरोबर माणसांनाही खपावे लागत असे.