हमालाचे आत्मकथन निबंध लिहा.
Answers
दुष्काळाच्या छायेतील जामखेड आणि आष्टी परिसरात असलेलं भाळवणी हे अप्पांचं जन्मगाव. जन्म साधारण 1936 चा. मधुकर गहिनीनाथ कोरपे हे त्यांचं पूर्ण नाव. घरात अठराविश्वे दारिद्र्य. बापाच्या तुटपुंज्या मजुरीवर कुटुंब चालायचं. खाणारी पाच तोंडं. कधी गुरे वळण्याचं, कधी भुसार दुकान चालवण्याचं काम करून अप्पा नगरला येऊन हमाली करू लागले. लिहिता-वाचता न येणारे अप्पा धडाडी व प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे हमालांचे नेते बनले. महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी डॉ. बाबा आढावांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. हमालांच्या रास्त हक्कांसाठी लढे उभारले. हमालांच्या बैठकांमध्ये बोलताना अप्पा आपल्या आयुष्यातील अनुभव सांगायचे. आपण हमाल म्हणून काम करण्यास कशी सुरुवात केली, याबाबत त्यांच्या शब्दांत ‘‘....आता काय करायचंं म्हणल्याबरोबर मुंबई-नगर एसटी गाडी आली अन् पटांगणामध्ये उभी राहिली. तवा काही रिक्षावाले नव्हतेच. टांग्यावाले राह्यचे. ते आपले आले सगळे. टांगेवाल्यांनी गराडा घातला. एसटीतून काही लोक खाली उतरले. मुंबईचे मोठे-मोठे साहेबबी उतरले. मी म्हटलं, च्यायला गर्दी का जमली एसटीपाशी, म्हणूनशनी बघायला जावं. बघायला गेल्याबरोबर कोणी म्हणत की, टांग्यात बसायचं काय? तुमचं सामान किती आहे? अशी त्यांची सगळी गर्दी चाललेली. आपण कधी गर्दी बघितलेली नाही. फाटकं डोकं घेऊनशनी मी तिथं उभा राहिलो.
तोच एक साहेब खाली उतरला. त्यानं ती मोठी दांडगी बॅग खाली ओढली.
‘‘च्यायला’’ म्हणला, ‘‘हमाल कोणी सापडंना’’
मी आपला जवळच उभा होतो. म्हणला ‘‘तू हमाल आहे का?’’ म्हणलो ‘‘हा’’.
म्हणला, ‘‘उचल नालेगावात जायचं, किती पैसे घेणार?’’
नालेगाव कुठं कुणाला माहिती. आम्हाला एसटी स्टँडच माहीत नव्हतं, मग नगरचं कुठं काय आहे? ते काय माहीत असणार? ‘‘मी नाही सांगू शकत, तुम्ही काय देताल ते घेईन’’ माझ्या वडिलांच आठवलं त्या वक्ताला. ते म्हणायचे ,‘‘काय देतील ते घे.’’
आता तो म्हणतोय ओझं घेऊन चल, तर ओझं न्यायची आपली ताकद आहे. तवापासून मी हमाल झालो, असं म्हणायला काही हरकत नाही. तवा त्याने ओझं दिलं माझ्या डोक्यावर. एक पेटी अन् वळकटी इतकं सामान होतं. आता बघा, ही श्रीमंत लोकं किती हुशार असतात. एवढं ओझं माझ्या बोकांडी देऊन नुसती एक पिशवी त्याला जड होती का? ती पिशवीही माझ्या हातात दिली. नुसती साहेबी टोपी गोलगरगरीत व्हती. ती बगलेत मारली अन् झपाझपा चालायला लागला. मी आपला वाकत वाकत मागं चाललो. आता किती लांब आहे नी किती नाही. पेटी इतकी जड होती की, माझ्या मानेचा काटा न् काटा बसून गेला; पण इलाज नाही. त्या सायबाला काही बोलायची माझी ताकद नव्हती. साहेब कोणत्या दर्जाचा आहे तेबी माहीत नव्हतं. बरं, रागीट का शांत आहे हीबी कल्पना नव्हती.
साहेब, मला ओझं जात नाही, असं म्हणल्यावर भडव्या तू कशाला हमाल झालास असं म्हणतोय की काय कुणास ठाऊक. पुढे रोज ओझे व्हायचो. थोडं बहुत मिळायचं. त्यातून एक वेडंवाकडं बारा आण्याचं धोतर घेतलं कोमट्याच्या इथून. आता कोमट्याच्या इथून धोतर घेतलं ते जुनं धोतर. श्रीमंत लोक कुणाला तरी कोमट्याला भांड्यावर विकतात ते, अन् एक सदरा घेतला. टोपीबी घेतली. म्हणजे आमच्याकडे कसे तरी झाले एकदाचे कपडे.
- ‘मी तो हमाल’ पुस्तकातून साभार