जेव्हा मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला
Nibandh in Marathi
Answers
Answer:
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे पहिले भाषण मराठी निबंध बघणार आहोत. आज एवढ्या मोठ्या समारंभात हजारो प्रेक्षकांसमोर एका नामांकित साहित्यिकाकडून माझा गौरव करण्यात आला. मला पारितोषिकासोबत मिळालेले ते संदर प्रशस्तिपत्रक आताही माझ्या समोर आहे. त्या समारंभात मिळालेल्या पुष्पगुच्छातील फुलांच्या परिमलाने माझी अभ्यासिका अजूनही दरवळते आहे. साऱ्या महाराष्ट्रात विख्यात असलेल्या 'रानडे वक्तृत्वस्पर्धे'त मी पहिला क्रमांक मिळवून पाचशे रुपयांचे बक्षीस मिळविले होते.
त्यासाठी हा सत्कारसमारंभ झाला होता. त्यामुळे आता माझ्या डोळ्यांसमोर प्रसंग उभा होता तो 'माझ्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा'. या पहिल्या भाषणाच्या वेळी मी मनात जो संकल्प सोडला होता, तोच आज पूर्ण झाला होता. आजवर विविध वक्तृत्वस्पर्धांत मी अनेक बक्षिसे मिळविली होती. पण हे बक्षीस पटकावून मी एका त-हेने उच्चांक गाठला आहे. याचसाठी मी अट्टाहास केला होता. माझे पहिले भाषणही मी केले होते, ते असेच आव्हान पत्करूनच.
मला आठवते की, त्यावेळी मी नुकताच हायस्कूलात जाऊ लागलो होतो. घरातील शेंडेफळ म्हणून मी जरा अधिकच लाडात वाढलो होतो. त्यामुळे पाचवीत पोहोचलो तरी बोबडे बोल माझ्या तोंडून काही सुटले नव्हते. इतकेच नव्हे तर कित्येकदा बोलताना मी अडखळतही असे. माझ्यातील या वैगुण्यामुळे माझे वर्गमित्र माझी नेहमीच चेष्टा करीत असत. त्यामुळे वक्तृत्वस्पर्धेत भाग, घेण्याबाबत गुरुजींनी विचारले असता मी जेव्हा माझे नाव देण्यासाठी उभा राहिलो, तेव्हा संपूर्ण वर्गात हशा पिकला.
गुरुजींनीही माझी चेष्टा करून मला स्पर्धेत भाग घेण्यापासून वंचित केले. त्या दिवशी मी रडत रडतच घरी आलो. मी फार दुखावलो होतो; पण माझे मन जाणले ते माझ्या आईने! ती गुरुजींना भेटली आणि आपण तयारी करून घेत असल्याचे त्यांना आश्वासन दिले. बस्स! त्या दिवसापासून माझ्या पहिल्या भाषणाच्या तयारीला निश्चयाने सुरुवात झाली. मला आठवते, माझे ते भाषण महाकवी रवींद्रनाथ टागोरांविषयी होते.
त्या स्पर्धेच्या वेळी तिघे नामांकित वक्ते परीक्षक म्हणून समोर बसले होते. संपूर्ण हॉल विदयार्थ्यांनी गच्च भरला होता. एकापाठोपाठ एक विदयार्थी व्यासपीठावर येऊन भाषण करून जात होते. आणि माझ्या डोळ्यांसमोर गेल्या महिन्यातील सारी धडपड उभी राहिली होती.
या भाषणासाठी माझी सारी तयारी आईने करवून घेतली होती. भाषणही तिनेच लिहिले होते. रोज सकाळी ती मला लवकर उठवत असे. भाषणातील प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारला जावा यावर तिचा कटाक्ष होता. भाषणाची अखेर टागोरांच्या 'गीतांजली'तील पंक्तीनेच केली होती. मी या विचारात गुरफटलो असतानाच माझे नाव पुकारले गेले आणि मी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर जाऊन उभा राहिलो.
श्रोत्यांनी भरलेला हॉल प्रथमच पाहिला आणि क्षणभर माझे डोळे दिपले. भाषणातील काही आठवेना. इतक्यात आईचे शब्द आठवले, “हे बघ, आपल्याला हसणाऱ्यांचे हसे करावयाचे आहे बरं का!" आणि मी आवेशाने भाषणाला सुरुवात केली. टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा मला कळले की, आपले भाषण संपले. व्यासपीठावरून उतरताना अनेकांनी जवळ बोलावून माझी पाठ थोपटली तेव्हाच स्पर्धेचा निकाल जणू जाहीर झाला होता. हसणाऱ्यांचे हसे झाले होते. त्यांची तोंडे बंद झाली होती आणि तेव्हापासून वक्तृत्वस्पर्धा म्हटली म्हणजे सर्वांच्या डोळ्यांसमोर मीच उभा राहतो.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद