कोरोना- मानव जातीवर आलेलं संकट. निंबध मराठी
Answers
सध्या देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटाने जीवनातील सर्वच क्षेत्रांबाबत नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. समाजातील सर्वच स्तरातील, सर्वच व्यवसायातील लोकांसमोर या संकटाने नवे प्रश्न निर्माण केले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील पीढीसमोर देश स्वतंत्र करण्याचे ध्येय होते. वैद्यकीय सुविधा अद्ययावत नसल्याने अनेक रोगांच्या साथी त्या काळात फैलावत. देश-विदेशातही आरोग्य सेवेबाबत अशीच परिस्थिती होती. त्यानंतर देश स्वतंत्र झाला, हळुहळू देशाने मोठी प्रगती केली. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत महामारी किंवा महासंकट म्हणावे असे प्रसंग देशावर आले नाहीत. अपवाद, पाकिस्तान आणि चीन युद्धांचा आणि दुष्काळाचा, पण त्यावर देशातील जनतेने संयमाने, धैर्याने मात केली. मात्र, आज उद्भवलेल्या कोरोना नामक विषाणूच्या भयाने संपूर्ण जगालाच वेठीस धरले असल्याचे चित्र आहे. त्यातही शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे शिक्षणक्षेत्रात कोरोनामुळे काय बदल घडले, काय बदल घडू शकतात, विद्यार्थ्यांनी या संकटाच्या घडीला धैर्याने सामोरे कसे जावे, पालकांनी व विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, शालेय आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबाबत काही सूचना करण्याचा हा प्रयत्न.कुठल्याही संकटावर धैर्याने आणि संयमाने, धीर खचू न देता कशी मात करावी, याची गुरुकिल्ली सुदैवाने आपल्याला आपल्या देशातील महामानवांच्या आयुष्यातून सहज मिळते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे वाचन केले, तर शिवरायांच्या आयुष्यात जणू संकटांची मालिकाच पाहायला मिळते. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून ते अगदी महाप्रयाणापर्यंत छत्रपती शिवरायांनी अनंत संकटांना आपल्या समयसूचकतेने, धैर्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने परतवून लावल्याचे दिसते. तसेच, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनाही ब्रिटिशांनी राजद्रोहाच्या आरोपावरून मंडाले येथे सहा वर्षे तुरुंगवास ठोठावला होता. मात्र, लोकमान्यांनी या काळाचा सदुपयोग करीत ‘गीतारहस्य’ हा मौलिक ग्रंथ लिहिला. इतरही अनेक ग्रंथ त्यांनी याच काळात लिहिले. दुसरे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. ब्रिटिशांनी त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा एकाच वेळी दिल्या. याच कालावधीत स्वा. सावरकरांनी कमला नावाचे महाकाव्य याच काळकोठडीत रचले आणि सुटका झाल्यानंतर ते त्यांनी लिहून काढले. तिसरे उदाहरण द्यायचे झाले, तर भौमर्षी विनोबा भावे यांचे देता येईल. १९३२ सालच्या जानेवारी ते जुलै या कालखंडात विनोबा भावे यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, तेथील इतर कैद्यांच्या आग्रहावरून दर रविवारी विनोबांनी श्रीमद्भागवद्गीतेवर जी प्रवचने दिली, त्याचे पुढे ‘गीता प्रवचने’ हे अजरामर पुस्तक छापले गेले.सांगायचा मुद्दा असा की, कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या, त्यांना सक्तीने घरात राहावयास लागत आहे, घरी करमत नाही अशी तक्रार विद्यार्थीच नव्हे, तर सर्वच वयोगटातील लोक करीत आहेत. त्यांना मला असे सांगावेसे वाटते की, वरील महापुरुषांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा तुरुंगवास भोगला. कुठल्याही भौतिक सुविधा नसताना आणि जीवघेणे कष्ट करीत या महापुरुषांनी हा तुरुंगवास नुसता भोगलाच नाही, तर त्या दरम्यान त्यांनी आपल्या अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या. आज आपल्यासमोर सर्वच भौतिक सुखे हात जोडून उभी आहेत, आपण आपल्याच घरात आहोत, आहार-विहाराची उत्तम सोय आपल्याला उपलब्ध आहे आणि कुठल्या संकटाच्या कारणाने का होईना, तब्बल तीन-चार आठवड्यांची सक्तीची सुटी आपल्याला मिळाली आहे. या महापुरुषांच्या जीवनाचा विचार करता आपण कितीतरी पट सुखात आहोत. विद्यार्थ्यांनी या काळाचा सदुपयोग करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे मला यानिमित्ताने सांगावेसे वाटते.
jay Maharashtra !!! ❤️