कोरोनावायरस निबंध मराठी
Answers
कोरोनानंतरचे जग आणि मराठी
1 May 2020
नीलेश बने
कोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे, तसाच भाषाव्यवहारही बदलणार आहे. या बदलाची तयारी ज्या भाषा करतील त्याच भविष्यात टिकणार आहेत.
Coronavirus,कोरोना,भाषाकारण,म,मराठी,मातृभाषा,राष्ट्रवेध,विश्ववेध,शिवसेना
भाषेसारख्या गोष्टीचा आणि तो देखील मराठीसारख्या स्थानिक भाषेचा कोरोनाशी काय संबंध? असा प्रश्न लेखाचे शीर्षक वाचल्यावर कोणाच्या मनात येऊ शकतो. त्यासाठी लेखाच्या सुरुवातीलाच याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे असणार आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. जगभरातील कंपन्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी या नव्या जगाचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. माणसामाणसातील नात्यांपासून, देशादेशांमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत अनेक समीकरणे कोरोनानंतरच्या जगात हळहळू बदलत जातील, असे संकेत मिळू लागले आहे. त्याबद्दल सर्वत्र लिहिले जाऊ लागले आहे. या सगळ्या बदलत्या जगाचा व्यवहार ज्या भाषेत चालणार, त्या भाषेबद्दलचा विचारही म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.
हे अधिक स्पष्ट व्हावे यासाठी आपण एक सोप्यात सोपे उदाहरण घेऊ. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कोरोनामुळे दिसलेला प्रमुख दृश्य बदल आहे. आजवर कधीही केले गेले नाही, अशी घरून काम करण्याची वेळ आज अनेकांवर आली आहे. पण, हा बदल तात्पुरता नसून, आता हीच कार्यपद्धती कायमची करता येईल का, याचा जागतिक पातळीवर विचार होतो आहे. टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्विस) सारख्या कंपन्यांनी २०२५ पर्यंत आपली ७५ टक्के कर्मचारी घरून कसे काम करतील, या दिशेने कामही सुरू केले. जगभरात हे होत आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांनी ‘लर्न फ्रॉम होम’ सारख्या घोषणा करत शिक्षणही ऑनलाइन करायला सुरुवात केली आहे.
याचाच अर्थ माणसे अधिकाधिक वेळ घरी राहणार आहेत. घरी असलेली माणसे घरातील लोकांशी प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जगाशी अप्रत्यक्षरित्या संवाद साधणार आहेत. त्यांच्या या घरातील आणि जागतिक संवादाची भाषा कदाचित वेगवेगळ्या असू शकतील. ‘मातृभाषा या स्वयंपाकघरात बोलण्याच्या भाषा उरतील’ असे भाष्य ज्येष्ठ कानडी लेखक शिवराम कारंथ म्हणत असत. पण त्यांचे हे भाष्य अशा संदर्भात प्रत्यक्षात येईल याची कदाचित त्यांनाही कल्पना करता आली नसेल. त्यामुळे माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदलणार आहे, तसाच हा भाषाव्यवहारही बदलणार आहे, याची तयारी सर्वांना करावी लागेल. किंबहुना ज्या भाषा ही तयारी करतील त्याच टिकतील, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
समजा, जर भविष्यातील शाळांमधील वर्गामध्ये शिकविले जाणारे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने होऊ लागले. त्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाइन साहित्य निर्माण करावे लागेल. फक्त पाठ्यपुस्तके पीडीएफ करून हे काम होणार नाही. त्यासाठी डिजिटल माध्यमांसाठी मातृभाषेतील मजकूर (कंटेट) तयार करावा लागेल. तो मजकूर फक्त शब्दस्वरूपात नसेल, तर तो मल्टिमीडिया, खेळ (गेम्स) या स्वरूपात असेल. हा मजकूर जी भाषा तयार करू शकेल, तीच या ऑनलाइन माध्यमात लोकप्रिय ठरेल. जी लोकप्रिय ठरेल तिच्यातून आपल्या मुलांना शिकविण्याचा कल वाढेल. म्हणूनच मराठीसारख्या भाषांनी या नव्या माध्यमांपासून लांब न पळता, या माध्यमाच्या गरजा समजून त्या दिशेने काम करायला हवे.
आजवर मराठी भाषेच्या आणि एकंदरीतच भारतीय भाषांच्या भवितव्याविषयी प्रचंड लेखन झाले आहे. काय करायला हवे, याबद्दल भाषणे, परिसंवाद आणि वाद-विवादही झाले आहेत. पण आता या पलिकडे जाऊन भाषेचे माध्यम बळकट करण्यासाठी काम करावे लागणार आहे. फक्त मराठी शाळा, मराठी पुस्तके यापलिकडे जाऊन भाषा ही सर्वांगीण आयुष्यातील संवादाचे माध्यम आहे. ते अधिकाधिक समर्थ कसे करता येईल, त्या दिशेने पावले उचलायला हवीत. प्रामुख्याने सरकार म्हणून राज्य सरकारांची ती जबाबदारी मोठी आहे. पण त्याच बरोबर विविध संस्था आणि वैयक्तिक पातळीवर तुम्ही आम्ही या सर्वांनी आपापला वाटा उचलायला हवा. हे काम करण्यासाठी आपल्या आसपास नक्की काय बदलते आहे, हे आधी समजून घ्यायला हवे.