History, asked by gauravghosalkar1, 7 months ago

खेला चे महत्व इन मराठी निबंध लेखन ​

Answers

Answered by ssalunkhe93
2

Answer:

"अरे किती खेळतोयस! अभ्यास करायचाय की नाही? चल आधी घरी." ही वाक्ये प्रत्येक आईबाबांच्या तोंडी असतात. सगळ्या मोठ्या माणसांना असेच वाटत असते की, खेळ म्हणजे केवळ गंमतजंमत. खेळ म्हणजे फक्त वेळ घालवणे, म्हणून निरर्थक, मला हे मात्र अजिबात मान्य नाही. खेळात मुख्यत्वे मनोरंजन घडते. खूप मजा येते. मनसोक्त आनंद लुटता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोठी माणसे दम दयायला तिथे नसतात, आमचे आम्हीच राजे असतो. त्यामुळे मुक्तपणे खेळायला मिळते. याचा आनंद मिळतोच. पण त्यात वाईट काय?

खेळात फक्त मनोरंजन असते, हे मात्र मला अजिबात मान्य नाही. मैदानात आम्ही मनसोक्त धावतो, उड्या मारतो. यामुळे चपळता येत नाही का? त्यामुळे आपोआप व्यायाम घडतो त्याचे काय? खेळून घरी जातो तेव्हा किती भूक लागते! हा फायदाही लक्षात घेतला पाहिजे.

खेळाबद्दल मी शांतपणे विचार करू लागलो, तेव्हा मला त्याचे खूपच फायदे दिसू लागले. आपल्याला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करावे लागतात. मैदानात जिंकण्यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करतो. प्रत्येकजण जिंकण्यासाठी धडपडतो. जिंकायचे, अधिक पुढे जायचे, अधिक प्रगती करायची ही प्रेरणा किती चांगली आहे? याच प्रेरणेमुळे माणूस प्रगती करतो ना? खेळामुळे ही प्रेरणा रुजत नाही काय? आम्ही जिंकण्यासाठी धडपडतो; आटोकाट प्रयत्न करतो. पण जिंकणारा शेवटी एकच असतो. आपण जिंकू किंवा हरू. यांतले काहीही होऊ शकते. हे सर्व आम्हांला समजते. हरल्यावर वाईट वाटते, हे खरे. पण जिंकलेल्यांचे मन:पूर्वक अभिनंदनही करतोच ना? नंतर आम्ही हसतखेळत पुन्हा खेळायला तयार होतोच की नाही? जीवनात देखील हारजीत हसतखेळत स्वीकारली पाहिजे, ही शिकवण आपल्याला खेळाच्या मैदानावरच मिळते.

खेळाचा आणखी एक फायदा आहे. जेव्हा आम्ही संघातर्फे खेळतो, तेव्हा संघाचा विजय व्हावा म्हणून जिवापाड प्रयत्न करतो. आपल्याला पडायला होईल, मार लागेल, जखमी होऊ, अशी कसलीच भीती त्यावेळी मनात नसते. आपला संघ जिंकला पाहिजे, हीच एक इच्छा आपल्या मनात असते. सगळेच जण संघासाठी धडपडत असतात. त्यावेळी कोणाच्याच मनात व्यक्तिगत स्वार्थ नसतो. या वेळी प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेला, भावनेला बाजूला ठेवतो. फक्त संघाचाच विचार करतो. किती महत्त्वाचा संस्कार आहे हा!

शिवाय, आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. सगळेच काय वर्गात, अभ्यासात हुशार नसतात. अशांच्या मनात, आपले जीवन व्यर्थ आहे, असा न्यूनगंड निर्माण होतो. ते आत्मविश्वास गमावून बसतात. यांच्यापैकी कित्येकजण मैदानात विलक्षण कर्तबगारी दाखवतात. सचिन तेंडुलकर कुठे कॉलेजात अभ्यासात चमकला होता? म्हणजे आपली कर्तबगारी सिद्ध करायला मैदानात वाव मिळतो, हा केवढा मोठा फायदा आहे ! खेळाचे असे कितीतरी फायदे मला आठवू लागले आणि शालेय जीवनात खेळाला अभ्यासाइतकेच महत्त्वाचे स्थान आहे, हे अधिकाधिक पटू लागले.

Similar questions