खालील एका विषयावर निबंध लिहा (काल्पनिक)
परीक्षा रद्द झाल्या तर...!
परीक्षेचा कंटाळा
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या धडपड पालकांनी दिलेले परीक्षेला महत्त्व
.
परीक्षा आणि जीवन
परीक्षेमुळे होणारे मूल्यमापन
.
परीक्षा रद्द झाल्या तर होणारे दुष्परिणाम
Answers
If the exam is canceled ...
'भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल काय रे ढोपर?'
या बालगीतातल्या ओळी कानावर पडल्या तरी आजही आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. त्यातील एका लहानग्या मुलाने विचारलेला हा अनोखा प्रश्न कित्यांदातरी प्रत्येकाच्या मनात येऊन गेला असेल. कारण, परीक्षेचा बागुलबुवा प्रत्येकाच्याच मनात घर करून असतो. परीक्षेची भिती प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेली असते. त्यामुळे, कोणत्याही परीक्षेच्या आधी 'परीक्षाच नसत्या तर...' असा विचार सगळ्यांच्याच मनात येतो.
पण खरचं...या परीक्षाच रद्द झाल्या तर... काय धम्माल येईल ना? कसलाही अभ्यासाचा ताण नाही. वेळेवर उठा, वेळेवर झोपा याप्रकारचा त्रास नाही. ना आवडते विषय मुद्दाम डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे वाचन नाही. पाठांतराचे टेंशन नाही. दररोज गृहपाठ पूर्ण करावा लागणार नाही. लहान मुलांच्या विश्वात तर आनंदाला तुटवडाच नसेल. लहानपणापासून आपल्याला घाबरवणारा हा बागूलबुवाच नसेल, तर कसली चिंताच आपल्याला सतावणार नाही. मग ना वेळापत्रकाची कसरत, ना अभ्यासक्रमाचे ओझे, ना अभ्यासाचा ताण. फक्त खेळ, फक्त आवडीचे कार्यक्रम पाहणे, फक्त मजा. पोट भरेपर्यंत मित्रांसोबतच्या गप्पा. परीक्षेच्या येण्याआधीपासून घातल्या जाणाऱ्या बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंदीपणे वागायला आपण अगदी मोकळे. परीक्षेपूर्वी रात्ररात्र जागून केलेली घोकंपट्टी नको, की पेपरच्या दिवशी पहाटे पाचला आईने मारलेली हाक नको. परीक्षाच नसेल, तर निकालाच्या दिवशी उडणारी धांदलही नसेल. त्याचबरोबर त्यादिवसाची मनातील धाकधूक ही नाही. परीक्षाच नसेल, तर स्पर्धा कसली? आणि स्पर्धा नसेल, तर शिकवणी कशासाठी? त्यामुळे शाळा नाही. मारूण मुटकून वर्गात बसण नको. तो हुशार, मी मठ्ठ असा प्रश्नच राहणार नाही. सारी मुलं एकाच फांदीवरील पक्षी होतील. गुणांच्या मागे धावण्याचा प्रश्नच उरणार नाही. त्यामुळे, परीक्षेच्या वेळी शिक्षक सरावाचा ताण देणार नाहीत आणि आई-बाबा गुणांवरून धारेवर धरणार नाहीत. प्रत्येक जण आपल्याला हव्या त्या विषयाचा हवा तेवढाच अभ्यास करेल.
पण... परीक्षा झाल्याच नाहीत, तर आम्हां विद्यार्थांचे मूल्यांकन कसे होणार? मी नक्की कोणत्या विषयामध्ये अव्वल आहे हे कसे समजणार. माझ्या मध्ये असणाऱ्या विविध कलागुणांचे कौतुक कसे होणार. आमच्या मध्ये दृढ आत्मविश्वास कसा निर्माण होणार. आम्हांला आमच्या चुका कशा कळणार आणि आम्ही त्या दुरुस्त कशा करणार? परीक्षा होते म्हणून आम्ही मुलं त्या निमित्ताने अभ्यास करतो. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने का होईना, ज्ञानार्जन करतो. त्यामुळे आमच्या बुध्दी विकास होतो. आम्ही प्रभूत्व पातळी पर्यंत पोहचलो आहे की नाही ते कळते. या परीक्षाच आमची बौद्धिक क्षमता मापण्याचे साधन आहे. परीक्षा हे आम्हां मुलांच्या स्व-क्षमतांचा परिचय करून देणारे माध्यम आहे.
परीक्षा गुणवत्ता मोजण्याचे एक साधन आहे. या गुणवत्तेची देशाला आज गरज आहे आणि या परीक्षाच असे गुणवंत विद्यार्थी देशाला मिळवून देतात. असेच विद्यार्थी देशाच्या प्रगतीला कारणीभूत ठरतात. आताच्या परीक्षा या शैक्षणिक प्रगतीबरोबरच मानसिक, सामाजिक, नैतिक विकासाचेही मापन करतात. त्यामुळे शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी देशाच्या विकासास हातभार लावण्यास समर्थ आहे, की नाही याची पोचपावती या परीक्षांचे निकाल देतात. परीक्षा घेतल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी एका एका विषयातील प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास करतात. त्यामुळे आजच्य स्पर्धात्मक युगात तो आपले पाऊल खंबीरपणे ठेऊन उत्कर्षाची शिखरे सहज सर करू शकतो. सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडून देशाला प्रगतीपथावर पोहचवण्यास मोलाचे सहकार्य करतो.
माझ्या मते परीक्षा हव्यातच, फक्त त्यामागे नको त्या अपेक्षांचे ओझे नको. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला हव्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी असायला हवी. परीक्षा फक्त घोकंपट्टीवर अवलंबून न राहता. यशस्वी जीवन जगण्याची कला त्यामधून प्रत्येकामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. परीक्षा ताण देणाऱ्या नसाव्यात, तर प्रत्येकाला स्वतःची क्षमता ओळखून देणाऱ्या असाव्यात. सोन्यासारख्या धातूला चमक येण्यासाठी अग्नीपरीक्षा द्यावीच लागते, पण त्यातून त्याचेच रूप खुलून येत असते. त्याप्रमाणे आपली गुणवत्ता वाढवण्याकरता परीक्षा ह्या हव्यातच, पण या परीक्षांमधून विद्यार्थी नव्हे, तर ज्ञानार्थी निपजावे.