CBSE BOARD X, asked by vibhavpotential4950, 1 year ago

।।माझे आई ।। essay on this topic.

Answers

Answered by shraddhaverma004
1

Answer:

Explanation:

प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रूपं बघतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण गुरुला साक्षात परब्रह्म मानले आहे. तसा गुरु मला माझ्या आईमध्ये मिळाला.

माझा पहिला आणि कायमचा गुरु माझी आई. तिनं मला नुसतंच श्री ग णे शा किंवा अ आ इ ई शिकवलं नाही तर माझ्या आयुष्याचा श्रीगणेशाच तिनं केला. तिनं मला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, लिहायला शिकवलं, वागायला शिकवलं. खरं म्हणजे तिनं माझ्यावर चांगले संस्कार करून जगण्याची एक दृष्टीच मला दिलीय. पुढे शाळेत शिकवलेल्या पुस्तकी शिक्षणापेक्षाही महत्त्वाचं शिक्षण तिनं मला दिलेय. एक माणूस म्हणून जगण्याचं.

तिनं मला केवळ उपदेशाचे डोस पाजून, धाक दाखवून, मारून मुटकून नाही शिकवलं, तर तिच्या संस्कारांतून, तिच्या वागण्या-बोलण्यांतून, तिच्या कृतितून, तिच्या संयमातून मी एकेक गोष्टी शिकत गेले; घडत गेले. तिनं दिलेल्या शिकवणीचं, तिनं केलेल्या संस्काराचं बोट धरून न अडखळता चालतेच आहे अजूनपर्यंत!

माझी आई खरंच सौंदर्यवान होती. पण त्याहूनही तिनं केलेले संस्कार जास्त सुंदर होते. अतिशय सुंदर, शांत, सात्त्विक, सोज्वळ चेहरा आणि तेवढीच साधी स्वच्छ, निर्मळ राहणी. रूप आणि गुण हे दोन्ही आईच्या ठिकाणी विशेषत्वाने एकवटलेले. त्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसायचं. चेहर्‍यावर त्रागा, नाराजी इतकंच काय पण कधी एक आठीसुद्धा आम्ही बघितली नाही. आरोग्याचं तर तिला जणू वरदानच मिळालं होतं. शेवटपर्यंत म्हणजे अगदी वयाच्या ९३ व्या वर्षिसुद्धा स्वत:ची कामं ती स्वत:च करत असे. तिला कधीही विचारा, ‘‘आई, कशी आहेस?’’ की एका शब्दात उत्तर मिळायचं – ठणठणीत! स्वावलंबन आणि चेहरा कायम हसतमुख ठेवणं, हे मी तिच्याचकडून शिकलेय.

आलेल्या संकटांवर, अडचणींवर धैर्याने, शांतपणे, मनाचा तोल ढळू न देता, संयमाने कशी मात करायची हे कृतितून तिनं आम्हाला शिकवलं. एकदा माझ्या वडिलांना मुदतीचा ताप (टायफॉइड) आला होता. त्या काळी ह्या तापावर फारशी औषधं नव्हती. त्यांतून माणूस क्वचितच वाचत असे. आम्ही मुलं तेव्हा लहान होतो. ४२ दिवसांचा ताप उलटला, पण आई डगमगली नाही. नंतर एकदा माझे वडिल ज्या कंपनीत कामाला होते ती कंपनीच बंद पडली. वडिलांचा पगार थांबला. घरात मिळवणारं आणखी कोणीच नव्हतं. त्याही प्रसंगाला तिनं तितक्याच धैर्यानं आणि शांतपणे तोंड दिलं. माझी सख्खी आत्या दोन वर्षे अंथरूणाला खिळून होती. तिचंही सगळं आईनेच केलं. माझ्या काकूची शेवटची दोन वर्षे तिनंच सेवा केली. १९६१ मध्ये पुण्यात पानशेत धरण फुटलं. प्रचंड पूर आला. अनेकांची घरे जमिनदोस्त झाली. वीज ठप्प झाली. माझ्या आतेबहिणीच्या घरातील सर्व सामान वाहून गेलं. १० माणसांच तिचं अख्ख कुटुंब आमच्याकडे राहायला आलं. त्यांचही आईनंच केलं. पण कधी तक्रार नाही, कुरकुर नाही की कधी कपाळावर आठी नाही.

नात्यांतल्या प्रत्येकाचं तिला कौतुक होतं. कोणाच्याही दुर्गुणांचा पाढा तिनं कधी वाचला नाही. ती म्हणायची प्रत्येकांतले चांगले गुण तेव्हढेच आपण बघावेत, बाकी सर्व सोडून द्यावे. आपल्या बोलण्यांतून, वागण्यातून कळत नकळतसुद्धा दुसर्‍याचं मन कधी दुखवू नये. हा संस्कार तिनं आपल्या नातवंडांपर्यंत रुजवला आहे. ‘‘अरेला कारे’’ म्हणून काहीही साध्य होत नाही. मनं मात्र दुखावतात. वादाचे विषयच टाळले तर आयुष्य खूप सुखकारक होऊ शकतं हा तिचा संदेश. परिस्थिती बेताची असूनसुद्धा मनातली चलबिचल तिनं कधी प्रदर्शित केली नाही. ‘दु:ख पोटाच्या आत आणि सुख ओठाच्या बाहेर’ असावे असं ती नेहमी आम्हांला सांगायची. आई तर ती आमची होतीच; पण प्रत्येक नातं तिनं प्रेमाने, जिवापाड जपलं होतं. सगळ्याच नात्यांना तिनं आपल्या परीने योग्य न्याय दिला होता. त्यामुळे सगळ्यांनाच ती हवी हवीशी वाटायची. सगळ्यांनाच तिचा आधार वाटायचा.

जुन्या पिढीबरोबर त्यांच्या विचाराने आणि नवीन पिढीबरोबर त्यांच्या विचाराने ती रमत गेली. गरीब मुलांना शोधून कधी फीसाठी, कधी वह्या-पुस्तकांसाठी, कधी चप्पलांसाठी, कधी कपड्यांसाठी ती जमेल तेव्हढी मदत करायची. त्यातच तिनं आपला देवधर्म मानला, आपली व्रतवैकल्य मानली. दुसर्‍याला मदत करणं हा तिचा धर्मच होता. तिची देवावर श्रद्धा होती पण कर्मकांडावर नव्हती. मी आणि माझा दादा जेव्हा काही सामाजिक काम करायला जायचो तेव्हा ती म्हणायची, ‘‘चालले लष्कराच्या भाकरी भाजायला.’’ पण हा वारसा तर तिनंच आम्हांला दिला होता. हे संस्कार तर तिनंच आमच्यावर केले आहेत. दासबोध, ज्ञानेश्‍वरी तिनं वाचले नाहीत. पण ते ग्रंथ ती जगली हे तर खरंच.

माणसं तीन प्रवृत्तीनं जगतात. विकृती, प्रकृती आणि संस्कृती. विकृती म्हणजे जे माझं आहे ते माझंच; पण दुसर्‍याचंही ओरबाडून घ्यायचं. स्वत:च्या पोळीवर तूप घ्यायचंच पण दुसर्‍याची पोळी तूपासकट आपल्या पानांत ओढून घ्यायची. प्रकृति म्हणजे माझे आहे ते मला पुरे. दुसर्‍याचं मला नको. मला माझी पोळी तूप मिळाली, पुरे झालं. पण संस्कृती म्हणजे मला कमी पडले तरी चालेल पण दुसर्‍याची गरज आधी भागवायची. आपण पोळी-तूप खात असताना, दुसरा आला तर त्याला तूपासकट आपल्यांतली अर्धी पोळी द्यायची. त्याची गरज आधी भागवायची. याच संस्कृतीत ती जगली. ही संस्कृती तिनं शेवटपर्यंत जपली. ना त्यांत काय किंवा शेजारी काय, कोणाची कसली अडचण असली तर आई तिथे जाणारच. आमच्या नातलगांपैकी कितीतरी नातलगांची लग्नं, बाळंतपणं, मंगळागौरी, आमच्या घरी झाल्येत. नाही म्हटलं ती आर्थिक झळ तिला बसली असेलच ना? पण कधी तक्रार नाही. आमच्या घरी पाहुणा नाही असा एक दिवसही गेला नाही. सगळ्यांच ती आनंदानं करायची. पाहुण्यांच्या पानांत तूप वाढायचेच. मग आठ दिवस आपण तूप न खाता कसर भरून काढायची. पण घराचा आब राखणं महत्त्वाचं.

Answered by ItsShree44
0

Answer:

रामायणात महर्षी वाल्मीकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ।' खरोखर किती अचूक वर्णन आहे हे ! आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, "इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे 'प्रसादपट' हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही.

माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच मला मिळाले आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेल्या मजकुरातील हस्ताक्षर पसंत पडले नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले. मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला शालाबाह्य अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.'

माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. ती स्वतः एम्. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वत: करत होती.

याबाबत ती कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही

चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती कष्ट उपसत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा. आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातील दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे समाजविघातक गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच प्रत्येकाने आपल्या मातेच्या शिकवणुकीचा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील.

आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, लहानपणापासून आईचा विरह ज्याच्या वाट्याला आला असेल, त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'

Similar questions