माझे शालेय जीवन निबंध
Answers
Answer:
"लहानपण देगा देवा" असं बरेचदा कानावर पडतं. पण मला मात्र असं काही वाटत
नाही त्याला कारण माझा शालेय जीवनाचा खडतर काळ असावा. गेल्याच आठवड्यात
आमच्या बॅचचे शाळेत गेट-टुगेदर होते. आमच्या तुकडीचा वर्ग शोधायला गेलो आणि
चमकलोच. वर्गांवर अ,ब,क ऐवजी येलो होऊस, ऑरेंज हाऊस, रेड हाऊस अश्या
पाट्या होत्या. आमच्या वेळी शाळेत असली कुठलीच हौस नव्हती. संपूर्ण शालेय
जीवनात नाही म्हणायला, बालवाडी ते दुसरी त्यातल्या त्यात सुखकर. बालवाडीत
असताना, ब्रेडचे तुकडे करुन देणे, दाणे सोलून व बारीक करुन देणे, भेंडीचे
काप घेऊन त्याचे ठसे कागदावर उमटवणे, कागदावर सुई-दोर्याने शिवणकाम करणे,
जंगलजीम वर खेळणे असा छान छान अभ्यास होता. पुढे प्राथमिक शाळेत गेल्यावरही
नाट्यशिबिर, जादूचे प्रयोग अश्या कितीतरी चांगल्या गोष्टी शाळेने केल्या.
स्नेहसंमेलनात नाच, गणेशोत्सवात मातीचे छोटे गणपती तयार करुन ते रंगवणे.
मातकामाच्या वर्गात चिकण मातीपासून वांगं, मिरची वगैरे तयार करणे,
पालखीच्या दिवशी छोट्या पालख्या तयार करुन वारकर्यांच्या वेशात पालखी
काढणे असे अनेक सुंदर क्षण शाळेने दिले. पण जसजशी ३री ची सहामाही परीक्षा
उलटली तसतसे अभ्यासाला स्पर्धेचे वातावरण येऊ लागले. आणि बाकी कशापेक्षाही
अभ्यासात मिळालेल्या मार्कांना अनन्यसाधारण महत्व येऊ लागले. चौथीत अ
वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी धडपड. पाचवीला चांगल्या हायस्कूलमधे ऐडमिशन
मिळविण्यासाठी चुरस. आमच्या शाळेच्या ग्राऊंडवरच्या झाडावर भुतं राहतात असं
मी कुणाकडून तरी ऐकलं होतं. त्यामुळे मी त्या झाडाच्या आसपास फिरकत सुध्दा
नसे. पण वर्गात नेहमी खाली मान घालून बसणार्या माझ्या मानगुटावर "अभ्यास"
नामक भूत कधी बसलं हे काही समजलंच नाही.
प्राथमिक शाळेत "या
कुन्देन्दुतुषारहार धवला" हा श्लोक आम्ही प्रार्थना म्हणून म्हणत असू.
त्यातलं बाकी सर्व विसरुन "नि:षेश जाड्या पहा" इतकंच काय ते आता माझ्या
लक्षात आहे. आम्ही काही टवाळ मुलं, प्रार्थनेसाठी मिटलेले डोळे हळूच उघडून
"नि:षेश जाड्या पहा" असं म्हणून आमच्या वर्गातल्या जाड्या मुलाकडे बघून
एकमेकांकडे बघून हासत असू.
शनिवारी सकाळी लवकर उठून शाळेला येऊन भीमरुपी
म्हणताना कोटिच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे ऐवजी "झोपावे उत्तरेकडे"
हे अगदी मनापासून वाटत असे. त्या वयात मी खूप हुंदडायचो. संध्याकाळी खेळून
दमून आल्यावर, ग्रुहपाठ करायला बसलो की, कंटाळा करायचो. आई नेहमी
म्हणायची, दिवस गेला उठारेठी अन् चांदण्यांखाली कापूस वेची. त्या वयात
देखिल "छडी लागे छमछम विद्या येई घमघम" हे गाणं मला कधीही आवडलं नाही
तुम्हाला सांगतो. अहो छडीच्या तालावर खेळ करुन दाखवला आम्ही काय
सर्कशीतले प्राणी होतो का
मी कितीही लपवलं तरी माझ्या नावावरुन मी
माझ्या हुशार भावाचा धाकटा भाऊ आहे हे सर्व शिक्षक ओळखायचे. तोही त्याच
शाळेचा विद्यार्थी. तो हुशार, कायम पहिला येणारा आणि मी त्याचा धाकटा भाऊ
मात्र सामान्य बुध्दीचा. या कारणास्तव मी शिक्षकांचा खूप मार आणि मानसिक छळ
सहन केलाय. माझ्या बुध्दीनुसार उत्तम मार्क मिळवूनही माझे कधीही कुणी
कौतुक केल्याचे मला स्मरत नाही. ५वीत असताना माझा वर्गात सहावा नंबर आला
होता. इयत्तेतला आमचा सर्वांत हुशार वर्ग. त्यामुळे वर्गात सहावा नंबर येणं
ही माझ्यासाठी खूप मोठं यश होतं. पण आमच्या तत्कालीन वर्गप्रमुख बाईंनी
मला स्टाफ रुम मधे बोलावून तुझ्याकडून पहिला नंबर येण्याची अपेक्षा होती हे
सांगून मला चांगलेच झाडले होते. त्यातून आमच्या वर्गातल्या एका हुशार
मुलाने माझा सहावा नंबर मेहनत हुशारीने नसून मला चित्रकलेत मिळालेले भरपूर
मार्क आहेत हे सांगितले. तू चित्रकलेच्या जोरावर अत्ता चांगले मार्क
मिळवशील, पण सातवी पर्यंतच चित्रकला हा विषय असतो. त्यानंतर त्याचा काहीच
उपयोग नाही; हे सांगितले. यानंतर घरी नातेवाईक व ओळखीच्या मंडळींकडूनही
बोलणीच खावी लागली. या घटनेचा माझ्या मनावर कुठेतरी खोलवर परिणाम झाला
असावा. त्यानंतर त्यापेक्षा अव्वल नंबर शालेय जीवनात मी कधीच मिळवू शकल
नाही. पण याच बाईंनी वर्गातले मागचे फळे व वर्गाबाहेरचा फळा बरेचदा
माझ्याकडून लिहून घेतलाय. अक्षर व चित्रकला दोन्ही चांगले असल्याने फक्त
हस्तलिखितांच्या वेळी त्यांना माझी बरोबर आठवण यायची.
अभ्यासात तसा
मी इतकाही काही वाईट नव्हतो. कधी कुठल्या विषयात नापास झालोय असेही नाही.
वास्तविक मी "ढ मुलगा" या कॅटॅगरीत मोडणारा मुलगाच नव्हतो. पण तसा आव आणून
कित्येक शिक्षकांनी शब्दश: नसला तरी माझा आत्मविश्वास मोडून काढला होता.
तसा मी १० वीत ८० टक्क्यांच्या वर मार्क काढलेला मुलगा. पण ते सारे काही
घाबरुन मिळवलेले मार्क. मनापासून मिळवलेले नव्हे. चित्रकला सोडून तसा
कमीअधिक प्रमाणात मी सगळ्याच विषयांना घाबरायचो. गणितात जॉमेट्री ची
ड्रॉईंगशी जवळीक वाटत असल्याने तो अल्जेब्रा च्या मानाने जरा सोपा वाटे.
सायन्स मधला आक्रुत्यांचा भाग मला फार आवडत असे. पण शिक्षण मंडळ काय कुणाला
आनंद मिळू देणार. आक्रुत्यांचा आनंद घालवण्यासाठी आक्रुत्या काढून नावे
लिहावी लागत. आक्रुती कितीही चांगली काढली तरी नावांमुळे आमचा त्रिफळा
उडायचाच. इंग्रजी विषयात "टू बी चे प्रत्यय" ही नक्की काय भानगड आहे हे
बरेच वर्षं मला ठाऊक नव्हतं. त्यातून ड्रॉईंग च्या 2B ची पेन्सिल शी असणारी
माझी जवळीक माझा घोळ वाढवत असे. पुढे कित्येक वर्षांनी to be or not to be
मधलं हे टू बी आहे, हे कळल्यावर मी थंडच पडलो. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि
स्पेलिंग; इंग्रजीतल्या या स्पेलिंगना मी त्रुतीय पंथियांपेक्षा जास्त
घाबरत आलो आहे. त्यामानाने उच्चाराला तितके महत्व नव्ह्ते. आमच्या
इंग्रजीच्या पुस्तकात "ए डब्ल्यू ई एसोएमी" असा एक शब्द होता. बर्याच
वर्षांनी तो awesome असा उच्चारतात हे समजले. आमचे इंग्रजी हे इतके awesome
होते.