मी पाहिलेले निसर्गरम्य स्थळ प्रसंगलेखन
Answers
Answer:
निसर्ग लहरी आहे; कारण तो एक थोर कलावंत आहे. कलावंत वेडेच असतात. सामान्य लोकांच्या व्यवहारात त्यांना रस वाटत नाही; म्हणनूच जग त्यांना वेडे म्हणते. या सर्व कलावंतांचा गुरू म्हणजे निसर्ग ! मग त्याच्या लहरीपणाचा वाटाही मोठा नसणार का? या इहलोकातील मानवी चित्रकाराला तुम्ही विचारा. त्याच्या चित्रकृतीतील स्फूर्तिस्थाने निसर्गातील असतात. म्हणूनच माणसांनी गजबजलेल्या जागा सोडून दूर एकांतात जाऊन तो बसतो. एखादया भीषण स्थळी जाण्यास तुम्हां-आम्हांला भीती वाटते, परंतु त्या कलावंताला अशीच जागा अधिक प्रिय वाटू शकते. आपल्या कलाकृतींनी अमर झालेले शिल्पकार पाहा! त्यांनाही निसर्ग-सहवास प्रिय होता. अजिंठ्याची लेणी पाहा, एका बाजूला खोल दरी, दुसरीकडे उंच कडे आणि आजूबाजूला हिंस्र श्वापदांचा सुळसुळाट. अशीच जागा त्या शिल्पकारांनी निवडली. शब्दांच्या साह्याने जगाला मुग्ध करणारे शारदेचे पूजक पाहा! आपल्या पवित्र वेदवाणीने परमेश्वराला मंत्रमुग्ध करणारे ऋषिमुनी हिमालयाच्या कुशीतच वास्तव्य करून होते. मेघाला मार्ग दाखवताना निसर्गाची सुंदर चित्रे रंगवणारा कवी कालिदास निसर्गाच्या सहवासातच रमलेला असे. या साऱ्या कलावंतांचा निसर्ग हा गुरू, त्याला वंदन करूनच ते आपल्या कलोपासनेला आरंभ करतात आणि त्याच्या भव्यतेमुळेच कलावंतांच्या प्रतिभेला रोज नवनवे अंकुर फुटतात.
कितीही थोर कलावंत घ्या, तो निसर्गाची थोरवी मान्य केल्याशिवाय राहणार नाही, मानवी कुंचल्याने कितीही करामत केली तरी निसर्गातील सूक्ष्म रंगछटा त्यात येऊ शकत नाहीत. बागेत जा, विविध रंगांची फुले पाहा... एकाची छटा दुसऱ्यात नाही. एकाच फांदीवर तीन-चार फुले फुललेली असतील; पण त्यांतही रंगांच्या छटांत फरक. विविध फुलांचे गंध विविध, फुलण्याची वेळ वेगवेगळी. प्रत्येक वृक्षाकडे पाहा. त्याची पानेसुद्धा वेगवेगळी. एकच हिरवा रंग; पण त्याच्या छटा किती विविध ! वेगवेगळ्या ऋतूंत येणाऱ्या वेगवेगळ्या फळांचा स्वाद किती निराळा !
झाडांवरून बागडणारी फुलपाखरे पाहा! प्रत्येकाचा रंग वेगळा. पंखांवरील ठिपके वेगळे. आकार वेगळा. वृक्षांवरील विविध पाखरांचे आकार, रंगरूप पाहा ! केवढी विविधता ! प्रत्येकाचे 'कूजन' वेगळे. ही विविधता निर्माण करणारा कलावंत थोर नव्हे का? या गर्द वनराजीत शिरा ! पाहा ती विविध श्वापदे. हरणांचाच कळप, पण त्यांतील हरणांचा रंग आणि ठिपके निरनिराळे. प्रत्येकाच्या डोळ्यांची लकाकी वेगळी. वनराज सिंहाचा तो सुवर्ण रंग आणि वाघाच्या अंगावरील पट्ट्यांची करामत. सारेच अजब ! विलोभनीय ! या थोर कलावंताचा हा नभपट तर पाहा. त्याच्या पार्श्वभूमीवरील रंगसंगती देखील किती बदलती ! हा निसर्गरूपी कलावंत कधीही थकत नाही. त्याचा अदृश्य कुंचला सतत फिरत असतो. बदलत्या ऋतूत बदलती चित्रे ! कुठे विविध रंगांनी चमकणारी वाळवंटे तर कुठे
बनि वेढलेले हिमाच्छादित प्रदेश ! या कलावंताच्या कलेची थोरवी पाहावयाची असेल तर भूलोकावरील मानवाकडे पाहा.
कोणाचा वर्ण शुभ्र, तर कोणाचा आरक्त. कोणाचा वर्ण पीत, तर काहींचा कृष्णवर्ण. डोळ्यांच्या छटा विविध. तोंडवळ्यांत फरक. प्रत्येकाची ठेवण वेगळी. आहे ना हा निसर्ग थोर व लहरी कलावंत !