मी तुमचे दप्तर बोलतोय......!
Answers
Explanation:
मी दुकानातच छान होतो, तुमच्या पाठीवर आलो आणि माझ्यावरचा ताण वाढला,’ ‘मलाही छान टापटिप रहायला आवडते, पण शाळेतून कंटाळून आलो या कारणापोटी मला कसेही कोपऱ्यात फेकून देता ते मला अजिबात आवडत नाही’, दप्तर आहे म्हणून तुमच्या वह्यापुस्तके नीट राहतात, मग माझ्या पोटात पुस्तके व्यवस्थित भरा, मला माझा रंग निवडण्याचे स्वातंत्र्य तरी द्या’...या भावना आहेत दप्तराच्या. त्या दप्तरानेच जर मुलांकडे मन मोकळे केले तर काय होईल? या भन्नाट कल्पनेवर विद्यार्थ्यांना एका शिबिराच्या माध्यमातून लिहिते केले आणि दप्तराच्या मनातील भावनांना या मुलांनी त्यांच्या शब्दात बांधले. या अनोख्या शिबिराच्या निमित्ताने मुलांच्या मनातील दप्तराविषयीची भावना आणि दप्तराच्या मनातील खदखद मुलांच्या लेखनातून व्यक्त झाली.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जाडजूड दप्तराला कोणता पर्याय काढता येईल यावर विचारही सुरू आहे. पण हे सगळं शैक्षणिक आणि राजकीय स्तरावर. शालेय जीवनात मुलांच्या भावविश्वाशी जोडलेल्या दप्तरासोबत मुलांचे एक वेगळेच भावबंध असतात. दप्तर आणि विद्यार्थी हे नाते आयुष्यातील दहा वर्षे घट्ट जुळलेले असते. याच अनुषंगाने नाट्यलेखक दिग्दर्शक संजय हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज येथील हरळी गावातील सिम्बॉयसीस स्कूलमधील मुलांसाठी नाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा या हेतूने शिबिरात लेखन कार्यशाळा घेण्याचे ठरले. ‘दप्तराचे वाढते ओझे,’ या विषयावर लिहायला आवडेल असे मुलांमधूनच सुचवले आणि ‘दप्तर बोलू लागले तर’ हा विषय निश्चित झाला. अगदी १५ ते २० ओळीत या विषयावर लिहायचे असे ठरले आणि मुले दप्तराच्या मनाचा कप्पा गाठला. काही वेळातच मुलांची दप्तरे त्यांच्या शब्दांतून बोलू लागली. मुलांच्या कल्पनाशक्तीला वेगळाच बहर आला. अगदी दप्तराचे ओझे होण्याच्या तक्रारीपासून, दप्तराचा रंग, आकार, नीटनेटकेपणा, इतकेच नव्हे तर एखादी वही विसरली असे शिक्षकांना सांगितल्यानंतर जेव्हा दप्तर तपासून पाहिले जाते तेव्हा साक्षीदार बनणारे दप्तर असे कितीतरी संवाद मुलांनी कागदावर उमटवले.
विद्यार्थ्यांनी दप्तराचे विविध मनोगत मांडली आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांची नेहमी सोबत करणाऱ्या दप्तराला काय वाटत असेल? याचा विचार मुले किती मनापासून करतात हे अधोरेखित झाले आहे. मुलांना दप्तराविषयी वाटणारी आत्मीयता अधिक ठळक करणारा हा उपक्रम आहे.