महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख
Answers
Answer:
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी,महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला होता. ते एक थोर समाजसुधारक होते.मुलींच्या शिक्षणासाठी,गरीबांच्या हक्कांसाठी,समाजातील चालू असलेली अस्पृश्यता, जाती व्यवस्था आणि बाल विवाहविरुद्ध ते आयुष्यभर लढले.विधवा पुनर्विवाह या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला.
त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई बरोबर झाला होता.त्यांच्या सामाजिक कार्यांमध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना मनापासून साथ दिली. आपल्या पत्नीसह त्यांनी मुलींसाठी १८४८ मध्ये,पहिली शाळा चालू केली. समाजातील मागासवर्गीय लोकांना शोषण आणि अन्यायापासून वाचवण्यासाठी त्यांनी १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.एक चांगले लेखक असल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनकाळात वेगवेगळे लेख आणि पुस्तके लिहिली.
थोर समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली.त्यांच्या स्मरणार्थ पुणे येथे महात्मा फुले संग्रहालयची स्थापित केले गेले.महाराष्ट्र सरकारने गरीबांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली.
नोव्हेंबर २८,१८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी पुण्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यु झाला.
Explanation:
Answer:
महात्मा जोतीराव फुले हे उच्च कोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मुलमंत्र काया-वाचा-मने जपणाऱ्या, जोतीरावांचा जन्म १८२७ साली माळी समाजातील गोहे यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले. शाळेत घातले.
जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्यांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले. ज्ञान ही एक शक्ती आहे,' अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे-
'विदयेविना मति गेली। मतीविना नीति गेली।
नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।।
इतके अनर्थ एका अविदयेने केले. जोतीराव फुले हे 'कर्ते सुधारक' होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन जोतीरावांनी पत्नीला- सावित्रीबाईंना-सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. जोतीराव व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले. त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतीरावांनी चळवळ उभी केली. 'बालहत्या प्रतिबंधक- गृहा'ची स्थापना केली. स्त्रियांसाठी, तसेच अगदी तळागाळातल्या लोकांसाठीही जोतीरावांनी बहुमोल सेवाकार्य केले. सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांना पाणी भरण्यास मज्जाव केला जात असे. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.
जोतीराव फुले यांनी अनेक मौलिक, विचारप्रवर्तक पुस्तके लिहिली. समाजातील पीडित-श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचा जोतीरावांनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याचे उत्कृष्ट चित्र त्यांनी आपल्या शेतकऱ्याचा असूड' या ग्रंथात रेखाटले आहे.शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काही विधायक उपायही या आपल्या लेखांतून सुचवले आहेत. १०० वर्षांपूर्वी लिहिलेले हे मौलिक विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतात, ही गोष्ट जोतीरावांच्या अलौकिक द्रष्टेपणाची साक्ष देणारी आहे. जोतीरावांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना 'महात्मा' असे यथार्थपणे गौरवले.