मला पंख असते तर निबंध लिहा
Answers
मला आकाश पाहायला खूप आवडते आकाशाची भव्यता आणि सौंदर्य माझ्या मनाला मोहून घेते. आकाशातील स्पष्ट निळा रंग मला खूप आवडतो आणि या आकाशाला व उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून मला वाटते की काश जर माझे सुद्धा पंख असते तर...! किती मजा आली असती. मी सुद्धा पक्षाप्रमाणे हवेला कापत उडालो असतो.
संपूर्ण आकाशाची मी भटकंती केली असती. आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला वाहनांची आवश्यकता असते पण जर माझे पंख फुटले असते तर मला कुठल्याही वाहनाची आवश्यकता राहिली नसती. माझे पंखच मला एक स्थानावरून दुसऱ्या स्थानाला घेऊन गेले असते. पंखांच्या मदतीने मी आकाशात इकडून तिकडे गिरक्या मारल्या असत्या.
आपल्याला कधी पण नातेवाईक किंवा मित्राचा फोन आला की आपण त्यांच्याशी गप्पागोष्टी करतो पण जर मला पंख राहिले असते तर फोनवर गप्पागोष्टी करण्याची गरजच राहिली नसती. पक्ष्यांसारखा आकाशात उडत मी माझे मित्र व नातेवाईकांच्या घरी पोहचून गेलो असतो. मला आकाशात पक्षी आणि पतंगासारखे उडण्यात खूप आनंद झाला असता. कोणत्याही गाडी मोटरीची मला आवश्यकता राहिली नसती.
मला उडायचे आहे आकाशाची सैर करायची आहे. लोक विमानाद्वारे आकाशाची सैर करतात, पण स्वतःच्या पंखाद्वारे आकाशात उडायची गोष्टच वेगळी आहे. पंख मला जर असते तर मी पक्ष्यांप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत गेलो असतो. वेगवेगळ्या झाडांच्या थंड हवा अनुभवल्या असत्या. स्वादिष्ट फळ खाल्ले असते. या फळांसाठी मला पैसेही द्यावे लागले नसते.
जेव्हा मी पंखांच्या मदतीने आकाशात उडत राहिलो असतो, तेव्हा बऱ्याच पक्षांना मी त्यांचा बंधू वाटलो असतो. ते माझ्या सोबत उडाले असते. आम्ही सोबत मिळून जलद उडण्याची शर्यत लावली असती. खरोखरच जर मला पंख राहिले असते तर हे जग माझ्यासाठी अजून सुंदर होऊन गेले असते. काश मला पंख असते तर...!