मनोरंजनाची आधुनिक साधने या विषयावर भाषण
Answers
Answer:
प्रत्येक व्यक्तीस सामान्यतः आपल्या दैनंदिन जीवनातील काही ठराविक वेळ उदरनिर्वाह आणि कौटुंबिक जबाबदा-या यांच्या अनुषंगाने विशिष्ट कामकाजामध्ये व्यतीत करावा लागतो. सर्वसाधारणपणे पुरूषास नोकरी वा व्यवसाय, गृहिणीस घरकाम, मुलांना शाळा-अभ्यास यांसाठी दिवसाचा ठराविक वेळ द्यावा लागतो. तद्वतच निद्रा-आहारादी दैनंदिन बाबीमध्येही काही वेळ जातच असतो. या व्यक्तिरिक्त व्यक्तीच्या वाट्याला काही फुरसतीचा वा फावला वेळ येतो. तो वेळ ती व्यक्ती आपल्या आवडीनिवडीच्या अशा गोष्टींमध्ये स्वेच्छेने घालवू शकते, की ज्यायोगे मनास विरंगुळा वा आनंद लाभेल. अशा प्रकारे श्रमपरिहार, मौज किंवा आत्मप्रकटीकरण यांसारख्या सुप्त प्रेरणांनी केल्या जाणाऱ्याव फावल्या वेळातील कृतीची गणना मनोरंजन या सदराखाली करता येईल.त्यात निरनिराळे छंद, खेळ, नाटक-चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन-वाचनाही सवयी इत्यादींचा अंतर्भाव होतो.
उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन हे व्यक्तीच्या शारीर-मानसिक स्वास्थास पोषक असते. रोजच्या धकाधकीच्या आणि चाकोरीब्ध जीवनातील शिणवठा व कंटाळा दूर करून मनाला नवचैतन्य व ताजेपणा आणि शरीराला जोम व कार्यशक्ती मिळवून देण्याचे प्रयोजन उत्तम मनोरंजनाद्वारे विनासायास साधले जाते. या दृष्टीने मनोरंजनाच्या कोणत्या प्रकारमध्ये व्यक्ती रममाण होते, ह्यालाही महत्व आहे. निरनिराळे छंद वा खेळ यांची जोपासना केल्याने व्यक्तीच्या सुप्त गुणांना वाव मिळून व्यक्तीमत्वाचा विकास साधला जातो. अशा प्रकारे समाजातील बहुसंख्य व्यक्तींना आपापल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासण्यास पुरेसा अवसर व संधी मिळून त्यांची अभिरूची संपन्न होत गेल्यास त्यायोगे एकूण समाजाचाच सांस्कृतिक स्तर उंचवण्यास मदत होते.
तसेच मनोरंजनातून प्रायः व्यक्तीच्या मनाचे आरोग्य सांभाळले जात असल्याने पऱ्यायाने समाजातील गुन्हेगारीला काहीसा आळा बसू शकतो. सार्वजनिक ठिकाणी मनोविनोदनार्थ अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यातून त्यांच्यामध्ये खेळीमेळीचे परस्परसंबंध जोपासले जातात व निकोप, स्वास्थ्यकारक समाजजीवनाच्या दृष्टीने ते लाभदायक ठरते. आधुनिक काळात तर मनोरंजनाची गरज वाढत्या प्रमाणावर प्रकर्षाने जाणवू लागली आहे. विसाव्या शतकातील गतिमान व यंत्रबध्द अशा आधुनिक जीवनातील ताण-तणावांचे विसर्जन, कार्यपध्दतीतील विशेषीकरण-यांत्रिकीकरण आणि त्यामुळे कामाचे तास कमी होत गेल्याने उपलब्ध होत असलेला जादा फावला वेळ इ. कारणांमुळे व्यक्तीगत व सामाजिक पातळीवर मनोरंजनाच्या गरजा प्रत्यही वाढत चालल्या असून त्या प्रमाणात रंज्जनपर साधन-सुविधा मध्येही भर पडत चालल्याचे दिसून येते.
मनाला आनंद देणारी कोणतीही कृती रंजनाच्या सदराखाली येऊ शकते. मात्र त्यात सक्ती, निर्बंध वा अपरिहार्य कार्यपूर्ती असा कोणताही बाहेरून लादलेला भाग नसून ती केवळ ऐच्छिक असावी, हे अभिप्रेत असते. तीत व्यक्तीच्या स्वतःच्या आवडीनिवडीला संपूर्ण वाव असतो. मनोरंजनपर छंद वा कृती यांचा मूळ व प्रमुख उद्देश जरी मनाची निर्भेळ करमणूक हा असला तरी, त्या त्या विशिष्ट छंद वा क्रिडा प्रकारात नियोजनबध्द परिश्रम करून व्यक्तीस खास कौशल्य संपादन करता येते. शिवाय स्वतःच्या आवडीच्या प्रकारात मनःपूर्वककाम करत राहिल्याने वेगळे परिश्रम असे जाणवत नाहीतच.रंजनाद्वारे व्यक्तीमत्व विकासाच्या सर्वोच्च संधी अशा प्रकारे उपलब्ध होत असतात.
व्यक्तीला तिच्या छदांतून किंवा रंजन प्रकारांतून जास्तीत जास्त लाभ उठवायचा असेल तर तिने रंजनाच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये जास्तीत जास्त सामील झाले पाहीजे, हे उघडच आहे.रंजनप्रकाराची निवड करताना कित्येकदा दैनंदिन कामकाजापेक्षा वेगळा असा छंदाचा वा रंजनपर कृतीचा प्रकार निवडणे जास्त फायद्याचे ठरते. कामातील बदल म्हणजेच विश्रांती किंवा नवचैतन्य प्राप्तीचे साधन असे आपण म्हणू शकतो, ते ह्या अर्थाने उदा. दररोज ऑफिसमध्ये बसून बैठे काम करणाऱ्या व्यक्तीने फावल्या वेळात एखाद्या खेळात भाग घेणे हे त्या व्यक्तीस जास्त रंजक व लाभदायक ठरू शकते. तद्वतच कारखान्यात ठराविक प्रकारचे यांत्रिक व साचेबध्द काम करणाऱ्याकामगाराने आपला फावला वेळ, एखाद्या कारागिरांच्या प्रकारात घालवल्यास त्यातून तो जास्त सर्जनशील आनंद मिळवू शकतो.
अनेक व्यक्तींना –विशेषत: किशोरवयीन मुले आणि तारूण्याच्या उंबरठ्यावरील युवक यांना –फावल्या वेळाचे योग्य प्रकारे नियोजन कसे करावे, यासंबंधी मार्गदर्शनाची गरज असते, हे या संदर्भांत केलेल्या सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. अशा प्रकारचे मार्गदर्शन हे घर, शाळा, तसेच अन्य सार्वजनिक आणि सामाजिक संस्था यांच्या द्वारा मिळू शकते.परंतु गरीब कुटूंबातील अनेक मुलांना मनोरंजनाची योग्य साधने वा संधी उपलब्ध होऊ शकत नाहीत. जर मुलांना खेळायला मैदान नसेल तर रस्ता हेच त्यांचे मैदान होणे स्वाभाविकच होय. तिथे त्यांना त्यांच्यासारखे इतर मुले भेटतात आणि अशा मुलांच्या टोळ्या तयार होतात. अशा टोळ्यांतील मुले त्यांच्यातील चैतन्यशक्तीला व अभिरूचीला योग्य तो अवसर न मिळाल्याने वाममार्गाला लागतात. त्यांची रंजनाची गरज ते वेड्यावाकड्या व कित्येकदा समाजविघातक मार्गांनी भागवतात. चोर्या, घरफोड्या, मारामार्या अशांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीही त्यातून वाढीस लागण्याची शक्यता असते.
मनोरंजानात्मक साधनसुविधांची तरतूद खाजगी संस्था व मंडळे, शासकीय संघटना वगैरेंद्वारा केली जाते. उद्याने – क्रीडांगणे इत्यादींची गरज विशेषत: आर्थिकद्दष्टया मागासलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खेड्यापाड्यातून असते. बहुतेक सर्व शहरांतून नगरपालिकांमार्फत अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, पोहण्यासाठी तलाव, सहलींसाठी निसर्गरम्य व प्रेक्षणीय स्थळे इ. सुविधांचा त्यात अंतर्भाव होतो. नाटक-चित्रपटगृहे, सभागृहे, वाचनालये, व्यायामशाळा, संग्रहालये इत्यादींची तरतूदही सार्वजनिक मनोरंजनाच्या गरजा मोठ्या प्रमाणावर भागवण्यास पोषक ठरते. मोठमोठ्या शहरांतून प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, क्रीडागारे (स्टेडियम), संगीतसभागृहे इत्यादींचा अंतर्भाव असतो.