मराठी भाशाची आजची स्तिथि
Answers
भाषा हे माणसाच्या जीवनात वावरताना परस्पर संवाद साधून व्यक्तींचे समाजात अस्तित्व टिकवण्याचे साधन आहे. व्यवहार वाढला की भाषा हळूहळू व्यावहारिक बुद्धीचे आणि सांस्कृतिक प्रगतीचे साधन बनते. भाषा ही वस्तू नसून ते एक साधन आहे. ती सर्वत्र चांगल्याप्रकारे वापरून आपले जीवन सार्थ करता येईल.
कोणत्याही राज्याचा नागरिक हा ज्या राज्यात वर्षानुवर्षे राहतो त्याला त्या राज्याची मातृभाषा शिकणे – बोलणे अनिवार्य असायलाच पाहिजे. कारण प्रत्येक राज्याचा कारभार हा त्या त्या राज्याच्या भाषेत चालतो. परंतु महाराष्ट्रात मराठीचा द्वेष असणाऱयांनी या गोष्टीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठीबाबत आग्रही भूमिका घेतली नाही.
साडे पाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते, परंतु तेवढी समज असलेले नेतृत्व महाराष्ट्राला लाभले नाही. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा यांच्याशी जणू काही देणेघेणे नाही. जर मराठी भाषेबद्दल आस्था असती तर आज राज्यात मराठी भाषेची वाईट अवस्था झाली नसती असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण पं. बंगाल, तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी आग्रही भूमिका घेऊन तेथील स्थानिक मातृभाषेला व तिथल्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले. इतके की दाक्षिणात्य राज्यांत इंग्रजी शाळांना तेथील मातृभाषेतच शिक्षण द्यावे लागते.
आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी भाषा एक समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. शिवाय मराठी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व कायम आहे. महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञान सर्व समाजांपर्यंत पोहचावे या हेतूने ज्ञानेश्वरांच्या काळात मराठीचा वापर केला गेला. तरीसुद्धा या भाषेची उपेक्षा होत आहे. मराठी भाषेची आज जी काही अवनती झाली आहे त्याला मराठी माणसाची ही दांभिक वृत्तीच कारणीभूत आहे.
अलीकडे इंग्रजी शिकणे महत्त्वाचे वाटते. इंग्रजी शिकण्याबद्दल काही म्हणणे नाही. कारण मराठीसाठी लढणाऱया कुसुमाग्रजांनी इंग्रजी तसेच इतर भाषांचा द्वेष केला नाही. उलट त्यांचे इंग्रजीवर मनापासून पेम होते. कारण भूतकाळात रुतलेल्या या समाजाला आधुनिकतेपर्यंत नेण्याचे काम इंग्रजी भाषेने केले आहे. इंग्रजी ही जागतिक पातळीवरची ज्ञानभाषा आहे आणि बाजारपेठेची भाषा आहे. तेव्हा कामानिमित्त किंवा सोयीकरिता हिंदी, इंग्रजीचा वापर जरूर करावा पण जिथे शक्य असेल तिथे आपली मराठी भाषाही नेली पाहिजे, बोलली पाहिजे. मराठी ही मायबोली असणाऱयांसाठी हा ठेवा आहे. तेव्हा ‘मराठी भाषेचे भवितव्य काय?’ या विषयावर फक्त चर्चा करून चालणार नाही. मराठी भाषेपुढे आव्हाने काय आहेत हे महत्त्वाचे आहे. मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्नशीलता आणि प्रयोगशीलता दाखवायला हवी. यासाठी प्रत्येकाकडे वेगवेगळे उपाय असू शकतात. प्रत्येकाने कल्पनाशक्ती वापरून ती टिकविण्याचे आणि समृद्ध करण्याचे प्रयत्न करायला हवेत. कारण आपल्या भाषेचा विकास करणे आणि तिला उत्तम दर्जा प्राप्त करून देऊन उच्चपदी नेणे हे आपल्या सर्व मराठी माणसांचे कर्तव्य आहे.