मराठी दिन उत्साहात कसा साजरा झाला याची बातमी तयार करा.
Answers
Answer:
डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आगवन-शिशुपाडा या शाळेत जागतिक मराठी भाषा दिन उत्साहाने साजारा करण्यात आला. मराठी भाषेचा विकास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातून शिक्षिका वरुणाक्षी आंद्रे यांच्या संकल्पनेतून यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मराठमोळ्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठी शब्दकोशांचे पूजन केले. भाषासमृद्धीची प्रातिज्ञा घेण्यात आली. वाघ, आंद्रे, जमादार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. यानंतर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना आजच्या पूर्वनियोजित स्पर्धेच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार म्हणी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक् प्रचार यावर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या.
गोदावरी परुळेकर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन
तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग, ग्रंथालय व माहितीशास्त्र आणि सांस्कृतिक विभागा अंतर्गत वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे या हेतूने मराठी राजभाषा दिन साजरा व्हावा या हेतूने महाविद्यालयात या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होते. निरनिराळ्या विषयावरील विविध पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ. आर. एन. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रा. डॉ. अर्जुन होन यांनी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे जीवनचरित्र व त्यांची वाङ्मय आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविली. यावेळी विद्यार्थ्यानी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले.
स. तु कदम विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
पालघर येथील जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयात कुसुमाग्रजांच्या जंयतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी कविता, मोबाइलच्या दुष्परिणामांवर आधारीत नाटिका तसेच कथेचे सुंदर सादरीकरण केले. तसेच 'कवितेवरून चित्र रेखाटणे' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुसुमाग्रजांच्या कवितांनी काचफलक सजविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी उपमुख्याध्यापक अजय राऊत, सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र नाईक, जीवन विकास कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गणेश प्रधान, समन्वय समिती सदस्य, शिक्षक वृंद उपस्थित होते.