India Languages, asked by vedantkathole, 3 months ago

निबंध लेखन मी अनुभवलेला भूकंप

Answers

Answered by jyosiljaykrishnan
5

कायम लक्षात राहणारी सहल म्हणजे फार दूरची किंवा खर्चिक असायला हवी असं नव्हे. एखाद्या दिवसाची पिकनिकसुद्धा एखाद्या वेगळ्या अनुभवामुळे कायमची स्मरणात राहते. साधारण ५० वर्षांपूर्वीचा काळ होता. १९६७ चा डिसेंबर महिना. मी कॉलेजला होतो. आम्ही सहा मित्रांनी रत्नागिरीजवळच्या गणपतीपुळ्याला सहलीला जायचं ठरवलं. एक टेम्पो भाड्यानं घेतला. १० डिसेंबरला सतरंज्या, चटया, जादा कपडे, भरपूर खाण्याचे पदार्थ असं सगळं घेऊन भल्या पहाटे रत्नागिरीहून निघालो. लगेचच ९ वाजता गणपतीपुळ्याला पोहोचलो. देवदर्शन घेतलं. समुद्रकिनाऱ्यावर भटकलो, पाण्यात पोहलो. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली. देवळात विश्रांती घेतली. दुपारी मालगुंडला जाऊन आलो. संध्याकाळी पुन्हा समुद्रात पोहलो. रात्री तिथेच घरगुती जेवण जेऊन १० वाजता परतीच्या प्रवासाला लागलो. तेव्हा आजच्या सारखा पक्का रस्ता नव्हताच. आमच्याखेरीज एकही वाहन नाही. भयाण, निर्जन रस्ता. आमच्या ग्रूपमध्ये मी सोडलो तर बाकीचे भूताखेतांवर विश्वास ठेवणारे. मी मात्र शूरवीरासारखा वाटेतील पडक्या विहीरी, जुनी वाडी, पिंपळांची झाडे, घळ्या, पऱ्हे या ठिकाणी गाडी थांबवून भूतं दिसतात का पाहत होतो. साधारण रात्री १ वाजता सर्वानुमते असं ठरलं की, या अवेळी घरी पोहोचून सर्वांना त्रास देणं बरं नाही. तेव्हा इथेच कुठेतरी उघड्यावर झोपावं आणि पहाटे ७ वाजता निघावं. चांगला सपाट लांब रूंद कातळ शोधून आम्ही आमच्या पथाऱ्या पसरल्या आणि आकाशातील तारे पाहत बोलत बोलत झोपलो.

गाढ झोप लागली असताना एकाएकी जमिनीखालून जातं दळल्यासारखा किंवा प‌ठिाच्या गिरणीचा येतो तसा आवाज येवू लागला. जमिन घसरू लागली आणि आम्ही सर्वजण खडबडून जागे झालो. आकाश फिरल्यासारखं वाटत होतं, जवळची झाडं हलत होती. आकाशात कावळे, चिमण्या, गिधाडे आदी पक्षी जोरजोरात ओरडत घिरट्या घालीत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. जवळच्या गावातून गाई-म्हशी हंबरत होत्या. रानात कोल्हे कुई ऐकू येत होती. आम्हा सर्वांची वाचाच बसली. भयंकर घाबरलो. काय होतंय काही कळत नव्हतं. साधारण एक/दोन मिनिटात जमिन हादरायची थांबली. मधून मधून बारीक बारीक कंप जाणवत होते. आम्ही सर्वजण १०/१५ मिनिटे शांतपणे पडून होतो. नंतर उठलो आमचा टेम्पो जागेवरून १५/२० फूट दूर जावून वेडावाकडा थांबला होता. भयानक भूकंप झाला होता.

आता आम्हाला रत्नागिरीमधील आमच्या घरच्यांची काळजी वाटायला लागली. ते घरात होते आम्ही उघड्यावर होतो. अर्ध्या तासात आम्ही आपापल्या घरी पोहोचलो. रत्नागिरीच्या शिवाजीनगर भागात लोक घराबाहेर रस्त्यावर, अंगणात, झाडाखाली जमा झाले होते. सुदैवाने आमच्याइथे कुठे घरं कोसळली नव्हती. साडेचार वाजले होते. आम्ही सहा वाजेपर्यंत तसेच बसून होतो. सकाळी आकाशवाणीच्या बातम्या लावल्या आणि कोयना नगरला भयंकर भूकंप झाल्याची बातमी समजली. ११ डिसेंबर १९६७ ची ती भीषण पहाट. रिश्टर स्केरलवर ७.६ ग्रेडचा कोयना नगरला झालेला तो भयंकर भूकंप. कोयना नगर पोफळी, पाटण, चिपळूण आदी भागात झालेली प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी. आम्ही भूकंपाच्या केंद्रापासून सरळ रेषेत ४०/५० किमी दूर उघड्यावर काळ्या कातळावर आकाशाच्या छपराखाली पहुडलेले असल्याने त्याचा हादरा विशेष जाणवला. रानांतील ते नैसर्गिक भीषण नाट्यही आम्ही अनुभवलं. त्या भयंकर अनुभवामुळे आमची ती एक दिवसाची साधीसुधी सहल आयुष्यभर स्मरणात राहिली.

Similar questions