निर्वासित या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे
Answers
Answer:
निर्वासित
मातृभूमीतून हाकलले गेल्यामुळे किंवा छळातून मुक्त होण्याकरिता देशाबाहेर पडून, आश्रयाकरिता व सुरक्षिततेकरिता अन्यत्र जाणारे लोक. निर्वासितांना आपले घर, समाज किंवा देश अनिच्छेने व आवाक्याबाहेरच्या परिस्थितीमुळे सोडणे भाग पडते. स्वेच्छेने स्थानांतर करणाऱ्या स्थलांतरितांत व निर्वासितांत फरक करावयास हवा. एक प्रगतीच्या दृष्टीने अधिक अनुकूल परिस्थिती व वातावरण शोधण्याच्या खटपटीत आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून चौकटीच्या बाहेर स्वतः होऊन पडतो, तर दुसऱ्यास प्रतिकूल परिस्थितीमुळे चौकटीच्या बाहेर केवळ आश्रय मिळविण्याकरिता व सुरक्षिततेकरिता जाणे भाग पडते. साधारणतः धार्मिक किंवा राजकीय छळामुळे हे लोक एका देशातून दुसऱ्या देशात जात असलेलेदिसतात.
संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्च आयुक्तांच्या कार्यालयाने संमत केलेल्या १९५१ सालच्या संविधीने निर्वासितांची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे: ‘निर्वासित म्हणजे वंश, धर्म, राष्ट्रीयता, विशिष्ट सामाजिक गटाचे किंवा राजकीय मतप्रणालीचे सभासदत्व या कारणांमुळे छळ होईल अशी साधार भीती वाटल्याने आपल्या देशाबाहेर असलेली व्यक्ती, जिला स्वदेशाचे संरक्षण स्वीकारणे शक्य नाही किंवा वरील प्रकारच्या भीतीमुळे ते स्वीकारण्यासही तयार नाही; अथवा राष्ट्रीयत्व नसलेली व पूर्वी ज्या देशात तिचे नित्य वास्तव्य होते, त्याबाहेर असलेली व्यक्ती, जिला त्या देशात जाणे शक्य नाही किंवा वरील प्रकारच्या भीतीमुळे तेथे परतण्यास ती तयार नाही’. यूरोपीय स्थलांतरितांच्या संदर्भातील आंतरशासकीय समितीने १९५१ मध्ये निर्वासितांची एक व्यापक व्याख्या सादर केली, ती अशी : ‘निर्वासित म्हणजे एखादे युद्ध किंवा आपत्ती यांना बळी पडलेली व्यक्ती, जिची जीवनस्थिती त्या युद्धामुळे वा आपत्तीमुळे गंभीरपणे बिघडली आहे’. इल्फान रीस यांनी आपल्या वुई स्ट्रेंजर्स अँड अफ्रेड(१९५९) या पुस्तकात केलेली व्याख्या अधिक मर्यादित व संक्षिप्त आहे. या व्याख्येनुसार ‘जो कोणी आपल्या घरातून उखडला गेला आहे, ज्याने कृत्रिम किंवा पारंपरिक सीमारेषा ओलांडली आहे व जो पूर्वीपेक्षा निराळ्या सरकारकडे वा प्राधिकरणाकडे संरक्षणार्थ व पालनपोषणार्थ पाहतो, तो निर्वासित’. या व्याख्येत महत्त्वाचे शब्द ‘उखडले जाणे’ आणि ‘सीमा रेषा ओलांडणे’ हे आहेत. हे शब्द केवळ स्थलांतरितापेक्षा निर्वासिताचा असलेला वेगळेपणा दाखवितात. अंतर्गत किंवा राष्ट्रांतर्गत निर्वासितही असू शकतात. त्यांचे प्रश्नही ज्वलंत व महत्त्वाचे असू शकतात. पण त्यांचा प्रकार मुळातच आंतरराष्ट्रीय निर्वासितांपेक्षा निराळ्या प्रकारात मोडतो. आज आंतरराष्ट्रीय निर्वासितांच्या प्रश्नाने जगातील राजकीय पुढाऱ्यांचे व अर्थशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.
निर्वासितांच्या प्रश्नांची निर्मिती : मानवाचा इतिहास बव्हंशी त्याच्या भटकण्याचा इतिहास आहे.शेती ही उपजीविकेचे साधन होईपर्यंत मानवाचा अधिवास स्थिर नव्हता. स्थिर अधिवास झाल्यानंतर लढाया व इतर प्रकारचे संघर्ष इत्यादींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याचा इतिहास आहे. यूरोपमध्ये नवव्या शतकाच्या सुमारास स्थिरस्थावर झाल्यानंतरही प्रबोधनकाळात पश्चिम यूरोपमधून ज्यूंची, प्रॉटेस्टंट पंथीयांची हकालपट्टी झालेली दिसून येते. भारतासारखा देश बव्हंशी सहिष्णू राहिल्यामुळे तेथे ही प्रक्रिया न घडता, आलेल्या लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला. इतर देशांच्या सीमाही परकीयांना खुल्या होत्या. इतकेच नव्हे, तर आलेल्या परकीय लोकांना आश्रय देण्याचे तत्व सामान्यतः सर्वमान्य होते. म्हणून त्या वेळी परकीय लोकांची समस्या अशी निर्माण झाली नाही; पण एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत खुल्या राष्ट्रीय सीमेचा काळ संपला. राष्ट्र-राज्ये अस्तित्वात आली. त्यांच्या सीमा निश्चित व इतरांकरिता बंद करण्यात आल्या. त्यामुळे परकीय लोकांची तसेच निर्वासितांची समस्या उद्भवण्यास सुरवात झाली.