ऑनलाइन शिक्षणाचे फायदे निबंध मराठी
please
Answers
Answer:
शिक्षणाची ओळख आपल्याला ई-लर्निंग शिक्षणापुरती मर्यादित होती. आणि काहीच लोक त्याच्याशी निगडित होते.आणि शैक्षणिक संस्था सुद्धा यात सहभागी होत्या. आँनलाईन शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान असावे ही साधीसरळ धारणा होती. आणि त्यासंदर्भात प्रशिक्षण आणि इतर गोष्टीची तरतूद करण्याचे प्रयत्न चालू होते. सगळे काही व्यवस्थित चालू होते. शैक्षणिक संस्था आपले कामकाज व्यवस्थित करत होते. मार्च महिना सुरू झाला की लगबग सुरू होते वार्षिक परीक्षेची.कारण आपण पास होऊन पुढच्या इयत्तेत जाणार या कल्पनेने विद्यार्थीवर्ग खूश असतो.हे सगळे सुरळीत चालू असताना अचानक एक कोरोना व्हायरस नावाचा सूक्ष्म जीव येतो आणि सुरळीत चालत असलेल्या या कामात व्यत्यय आणतो. अचानक लाँकडाऊनची घोषणा होते आणि सगळे बंद यातून आमची शाळाही सुटली नाही. तिच्यावर सुद्धा निर्बंध लागले आणि ते निर्बंध आजपर्यंत सुरू आहे.
या कोरोना व्हायरसने व्यापक प्रमाणात मानसिक चिंता आणि अस्तित्वाची अनिश्चितता निर्माण केली आहे. अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर आपण शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरातील लोक आज अयशस्वी ठरलो आहे,कारण या गोंधळलेल्या क्षणी शिक्षणाचा अर्थ आणि नेमका उद्देश याविषयी पुनर्विचार करण्याऐवजी आपण केवळ आँनलाईन अध्यापन पद्धतीसाठी योग्य आणि चांगले अँप कसे वापरायचे जेणेकरुन “सामाजिक अंतराच्या “समस्येवर विजय मिळवता येईल अशा तांत्रिक प्रश्नांना महत्त्व देत आहोत. हे असे करणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीही मुलभूत बदल झाले नाही असे चित्र उभे करण्यासारखे आहे. म्हणून आपण तीच पाठयपुस्तके,तोच अभ्यास, तीच प्रार्थना, त्याच परीक्षा आणि त्याच असाइनमेंट या बरोबर यावेळी “आँनलाईन अध्यापन” या अदभूत तंत्रज्ञानाच्या जोरावर पुढे जाऊ शकतो,असे आपल्याला वाटते.
आजही या आँनलाईन शिक्षण पद्धतीत काही विद्यार्थी आणि शिक्षक या प्रणालीपासून वंचित आहेत, कारण सगळ्या शाळेत आज आँनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते, त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते यात सर्व शिक्षकांचा समावेश असणे आवश्यक आहे परंतु असे असूनही काही शाळांनी आजही काही शिक्षकांना या आँनलाईन शिक्षण पद्धतीत सामील करुन घेतले नाही आहे. जर या शिक्षकांना याचे प्रशिक्षण मिळाले नाही तर ते भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या विद्यार्थ्यांना कसे आँनलाईन शिक्षण देऊ शकतील याचाही शाळेच्या प्रशासनाने विचार करायला हवा, कारण हे शिक्षक सुद्धा शाळेचा अविभाज्य घटक आहेत.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे, त्या विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षण मिळत आहे परंतु ज्या पालकांकडे ही सुविधा उपलब्ध नसेल तर त्याची मुले आजही या शिक्षणापासून वंचित आहे .ही समस्या ग्रामीण आणि आदिवासी भागातात जास्त दिसून येतात. परंतु शहरातील काही भागात सुद्धा अशा समस्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग राहतो, पोटापुरता तो कमवत असतो. त्याची मुले सरकारी शाळेत जात असतात. एकवेळ जेवणाची भ्रांत असलेल्या या लोकांकडे स्मार्टफोन कसा असेल? आणि तो नसल्याने त्याची मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत.
आँनलाईन शिक्षण पद्धत ही जरी काळाची गरज असली तरी शैक्षणिक अभ्यासक्रमात ही पद्धत जास्त काळ प्रभावी ठरणार नाही. कारण या पद्धतीत विद्यार्थ्यांना शिकवलेले नीट समजू शकत नाही. तसेच विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे अवघड जाते.बराच वेळ एका ठिकाणी बसल्याने आणि फोनचा वापर जास्त होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम लवकर दिसून येईल.
जर शिक्षण खरोखरच जीवनदायी आहे तर याने तरुण मनाला बळ दिले पाहिजे, जेणेकरून कोविड-19 ने निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मानसिक आधार मिळेल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर लयबद्ध संवाद साधून त्यांच्या समस्या आणि शंका समजून घेतल्या पाहिजे आणि त्याचे योग्य वेळी निरासन होणे आवश्यक आहे.झूम अँप चांगला आहे की वाईट. त्याचा उपयोग शिक्षणपद्धतीत करणे योग्य आहे का अशी चर्चा करणे,तसेच “योग्यवेळी अभ्यासक्रम पूर्ण करणे”म्हणजेच परिपूर्ण शिक्षणपद्धती नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जेव्हा सारे जग कोसळले असताना या पुस्तकी ज्ञानाची निरर्थकता सिद्ध झाली आहे, अशावेळी जगण्याची सूक्ष्म कला शिकवणारे शिक्षण म्हणजेच अर्थपूर्ण शिक्षण होय.
कोविड 19 ची साथ आणि त्यानंतर जाहीर झालेला लाँकडाऊन यामुळे देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद झाल्या,परिणामी भारतातील शाळा व्यवस्था पारंपरिक वर्गामधून डिजिटल प्तँटफाँर्मवर आलेली दिसत आहे.आँनलाईन शिक्षणाच्या दिशेने घाईत घेतलेल्या निर्णयामुळे “डिजिटल उपलब्धता “नसलेला एक मोठा वर्ग या आभासी वर्गाबाहेर फेकला गेला आहे. आँनलाईन शिक्षण मूठभर विद्यार्थ्यांना मिळत आहे, कारण भारतातील फक्त २४ टक्के कुटुंबाकडे स्मार्टफोन आहे.५ ते १८ या वयोगटातील मुले असलेल्या केवळ ११.५ टक्के घरांमध्ये संगणक आणि इंटरनेट कनेक्शन आहे. मात्र या सर्वांचे आयुष्य एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून घरापुरते संकुचित झाले आहे.
आँनलाईन शिक्षणपद्धतीमध्ये फायदे आणि तोटे दोन्ही आहे. परंतु याचा वापर किती काळ करावा लागेल तेही ठामपणे सांगता येत नाही. जोपर्यंत शाळा व्यवस्थित सुरु होत नाही तोपर्यंत या शिक्षणपद्धतीचा वापर करणे अनिवार्य आहे. परंतु या शिक्षणपद्धतीचा लाभ सगळ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळायला हवा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले पाहिजे. या आँनलाईन पद्धतीमध्ये मोबाईल डाटा मोठ्या प्रमाणावर जात असल्याने शिक्षक आणि पालकांवर अतिरिक्त पैशाच्या रुपात भार पडत आहे. तसेच शिकवताना तांत्रिक अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागत आहे.इतके संकट येऊनही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे.
कोविड-19 चे हे संकट लवकर दूर होईल आणि पुन्हा शैक्षणिक संस्था सुरू होऊन विद्यार्थ्यांची किलबिल पुन्हा एकदा नव्याने ऐकू येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया.