(
५)
प..] खालील दिलेल्या मुद्यांच्या आधारे १००-१५० शब्दात निबंध लिहा.
वीज बंद पडली तर... !
वीज बंद पडल्याने होणारे
नुकसान
विजेची गरज
ऑफिसमध्ये विजेची
आवश्यकता
महत्त्व
उद्योगधंदे
→ कारखाने
→ विजेची बचत
Answers
Answer:
Mark me as Brainliest plz
Step-by-step explanation:
कॉलेज, क्लासेस आटपून मी संध्याकाळी ६ वाजता घरी पोहचलो. चहा, नाश्ता आटपत नाही; तोपर्यंत आईने अभ्यासाला बस, अशी भुणभुण सुरू केली. तसे आईचे हे वागणे रोजचेच. माझ्यामागे अभ्यासाचा तगादा लावल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नाही, यावर माझा ठाम विश्वास बसलाय. थोडावेळ टंगळमंगळ केली. मग मात्र आईचा आवाज चढू लागल्याचे ध्यानात आले. आईने रुद्रावतार धारण करण्याआधी आपण अभ्यासाला बसावे या विचाराने, जरा नाईलाजानेच मी पुस्तक उघडले. बाहेर चांगलेच अंधारून आले होते. आता जर वीज गेली तर अभ्यासाला सुट्टी मिळेल हा विचार मनात आला आणि काय योगायोग, वीज खरंच गेली !
मी आनंदाने उडीच मारली. घरभर मेणबत्त्या लावून उजेड केला. मनातील आनंद चेहऱ्यावर न दाखवता चुपचाप खिडकीत बसून राहिलो. बाहेर बघितल्यावर लक्षात आले की, सगळीकडेच वीज गेली होती. बाहेरच्या छोट्याश्या मैदानात काही मुले चंद्रचांदण्यांच्या प्रकाशात खेळत होती. त्यांचा खेळ बघण्यात माझा तासभर कसा गेला मलाच कळले नाही. मग मात्र हळूहळू उकाडा जाणवू लागला. घरात लक्ष गेले तर घरच्यांची, सगळ्यांचीच अवस्था तशीच होती. सगळे अस्वस्थ झाले होते. आजी उगाच कोपऱ्यात बसून जपमाळ ओढत होती. आजोबा घामाने डबडबले होते. बाबा घरभर अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. आईचा स्वयंपाक खोळंबला होता. वीज महावितरण मंडळात फोन केल्यानंतर असे कळले की, काही मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे रात्रभर वीज येणार नाही. सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला.
खरंच ही वीज कायमचीच नसती तर ? विचारानेच मनात धस्स झाला. रात्रीचा अंधार दूर करणारे दिवेच लागले नसते. रस्त्यावर, घराघरात अंधाराचेच साम्राज्य व्यापून राहिले असते. मेणबत्ती, कंदील, निरांजन, समई यांचा वापर बंधनकारक झाला असता. रस्ते, महागडी हॉटेल्स यांमध्ये घडणारी रोजची दिवाळी, अर्थात रोषणाई शक्यच झाली नसती. लग्न, साखरपुडा असे आनंदाचे प्रसंग कंदीलांच्या उजेडातच साजरे करावे लागले असते.
मानवाच्या आयुष्यात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकाल प्रत्येक कामात विजेची जोड आवश्यक झाली आहे. घरच्या गृहिणीला स्वयंपाकापासून ते घर आवरण्यापर्यंत वीज लागते. अन्न साठवून ठेवणारा, पाणी थंड करणारा फ्रीज असो, की घर स्वच्छ करणारा व्हॅक्यूम क्लिनर विजेशिवाय त्यांची किंमत शून्य ! मिक्सर, ग्राईडर, मायक्रोव्हेव, इंडक्शन, वॉशिंग मशिन अशा सगळ्या गोष्टी विजेच्या आधारावरच चालतात. उकाड्यापासून । सुटका देणारा पंखा, ए.सी., कूलर, घरातील दिवे, जगभरातल्या बातम्या घरबसल्या देणारा टि.व्ही.., ज्ञानभांडार उधळणारा संगणक विजेशिवाय अपूर्णच ठरतो. दैनंदिन जीवनात अत्यावश्यक ठरू लागलेला मोबाईल चार्जिंगच्या आधारेच तर चालतो. थोडक्यात विजेशिवाय माणसाचे पानही हलू शकत नाही.
औदयोगिक क्षेत्रात घडणाऱ्या क्रांतीचा मोठा वाटा विजेकडे जातो. आजच्या यंत्रयुगातली विविध आधुनिक यंत्रे देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. या यंत्राचे खरे मूल्य ठरते, ते त्यांना विजेची जोड मिळाल्यानंतरच . दळणवळणाचे मुख्य साधन मानली जाणारी रेल्वे व्यवस्था एकाचवेळी हजारो शहरांना जोडते ती उच्च दाबाच्या विजेच्या तारांमुळे या रेल्वेमुळेच राज्याला अधिक महसूल प्राप्त होतो.
हॉस्पिटल्स, दवाखाने यांना वीज लागतेच. वैदयकिय क्षेत्राने खूप प्रगती साधली आहे. शल्यविशारदाला शस्त्रक्रिया करण्यासाठी विजेची आवश्यकता असते . विजेवर चालणाऱ्या आधुनिक उपकरणांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. शिक्षणक्षेत्रातही विजेला स्थान आहे. केवळ दिवे, पंखेच नाहीत, तर ई-लर्निंग, स्मार्ट बोर्ड अशा आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यासाठीही विजेची गरज आहे. विज्ञान क्षेत्रातील मोठी झेप या विजेमुळेच घेणे देशाला शक्य झाले आहे; पण ही वीजच नसेल तर माणसाला पाणी मिळणेही दुर्लभ होईल. पाण्याचे पंप न चालल्याने पाण्यासाठी रांगा लागतील. एकंदरितच सगळ्या क्षेत्रांना आवश्यक असणारी ही वीज नसल्यास बिकट परिस्थिती निर्माण होईल.
थोडक्यात काय तर विजेशिवाय माणूस असहाय होतो असे म्हटल्यास ते अयोग्य ठरू नये. माणसाच्या प्रगतीला मदत करणारी वीज प्राणघातकही ठरू शकते. विजेच्या उपकरणांचा अयोग्य वापर त्यांची अयोग्य हाताळणी यामुळे विजेचा धक्का लागून मृत्युही ओढवू शकतो. शॉर्टसर्किटमुळे होणारी हानी पहाता 'वीज' एक धोकादायक शोध वाटू लागतो. म्हणूनच विजेचे महत्त्व लक्षात घेता तिचा सुयोग्य व सुनियोजीत वापर गरजेचा आहे.