पेरीपॅटस हा अनिलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
Answers
Answer:
जीवविज्ञानातील हा एक महत्त्वाचा विषय आहे. आज आपल्याभोवती पसरलेली सजीव सृष्टी पृथ्वीवर आरंभी म्हणजे सु. दोनशे कोटी (काहींच्या मते चारशे कोटी) वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या प्रारंभिक सजीवांपासून क्रमाक्रमाने फरक पडून बनलेली आहे, याबद्दल जीववैज्ञानिकांत दुमत राहिलेले नाही इतकेच नव्हे, तर ज्या ग्रहगोलावर सजीव प्रथम निर्माण झाले, विस्तार पावले व त्यांमध्ये अनेक पिढ्यानुपिढ्या प्रागतिक बदल होत गेले, ती आपली पृथ्वीही पूर्वीपेक्षा इतर कित्येक बाबतींत (हवा, पाणी, तापमान, नद्या, डोंगर व समुद्राच्या आणि खंडांच्या मर्यादा इ. बाबतींत) बदलत आली आहे, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. प्रारंभिक सजीव अत्यंत साधे व सूक्ष्म असून ते क्रमाक्रमाने अधिक मोठे, जटिल (गुंतागुंतीचे) व प्रभेदित (कार्य विभागणीनुसार होणारे रूपांतर) होत जाऊन वर सांगितलेल्या दीर्घकाळात त्यांचा सर्वांगीण विकास झाला आहे, ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. या प्रक्रियेस ‘जैव क्रमविकास’ किंवा ‘जैव उत्क्रांती’ म्हणतात. ही प्रक्रिया संथ पण सतत चालू असल्याने पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतच्या व आजही होत असलेल्या बदलांचा एक सुसूत्र इतिहास म्हणजेच क्रमविकास होय. अत्यंत साध्या सजीवांपासून जटिल संरचना असलेले वंशज निर्माण होणे, हा क्रमविकासाचा दृश्य परिणाम होय असे मानले जाते तसेच सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेत कमी अधिक प्रमाणात साम्याचे दर्शन घडून येते आणि ते समान पूर्वजपरंपरेचे द्योतक आहे, हे क्रमविकासातील महत्त्वाचे तत्त्व आहे. सजीवांतील काही असामान्य नैसर्गिक प्रवृत्ती व त्यांच्या भोवतालची परिस्थिती यांमुळे हा क्रमविकास झाला असावा असे बहुतेकांचे मत आहे.
पृथ्वीचा जन्म सु. ५००–६०० कोटी वर्षांपूर्वी झाला असावा असे मानतात त्यानंतर सु. दोनशे किंवा तीनशे कोटी वर्षे जीवनाचा व अन्नाचा लेशही नव्हता त्यानंतर पहिला सजीव पदार्थ (जीवद्रव्य) बनला असावा तो कोठून व कसा आला व कसा निर्माण झाला असावा हे अद्याप पूर्णपणे न उकललेले गूढच आहे. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या निर्जीव (अकार्बनी) पदार्थांपासून विशिष्ट परिस्थितीत तो रासायनिक अपघातानेच एकदा किंवा त्यानंतर कदाचित अनेकदा निर्माण झाला असावा भविष्यकाळी एखादा जीवरसायनशास्त्रज्ञ कदाचित प्रयोगशाळेत अकार्बनी रासायनिक द्रव्यांपासून सजीव (कार्बनी) पदार्थ बनवीलही पण जीवनिर्मितीच्या आरंभी नेहमी तीच घटना घडली असावी याची खात्री देणे कठीण आहे [→ जीवोत्पत्ति नवजीवजनन].
शास्त्रीय दृष्टिकोनातून क्रमविकासाचा सांगोपांग अभ्यास हा जरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून होत असला, तरी ही कल्पना मात्र फार पुरातन आहे. तत्त्वज्ञानी व शास्त्रज्ञ यांचे या कल्पनेबद्दलचे दृष्टिकोनही वेगवेगळे आहेत. प्राच्य-भारतीय तत्त्वज्ञानानुसार ईश्वरी कार्यासाठी व त्याचाच अंश म्हणून अंतःक्रमविकासाने माणसाचा जन्म झाला उद्दिष्टापासून विचलित झाल्याने कर्मफलानुसार विविध प्रकारचे जन्म अस्तित्वात आले. पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे मत याहून भिन्न होते. थेल्स, एंपेडोक्लीझ, ॲरिस्टॉटल वगैरे ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या मते जीवांची, विशेषतः प्राण्यांची उत्पत्ती काहीशा वेगळ्या पद्धतीने झाली. ती ‘विशिष्ट निर्मिती’ किंवा ‘स्वयंजनन’ यामुळे झाली असावी असे मांडले गेले. यांपैकी पहिल्या उपपत्तीप्रमाणे जीवांचा प्रत्येक प्रकार (जाती) स्वतंत्रपणे पूर्वी एकदाच निर्माण झाला असावा व आजपावेतो त्याच स्वरूपात (बदल न होता) तो आढळतो दुसऱ्या उपपत्तीप्रमाणे निर्जीव वस्तूंतून उस्फूर्तपणे नवीन जीवांची उत्पत्ती होत असावी, असे मानले जात होते. कालांतराने पृथ्वीच्या जुन्या खडकांच्या थरांत प्राणी व वनस्पती यांचे रूपांतरित अवशेष[→ जीवाश्म] सापडू लागले आणि त्यांचा अभ्यास होऊ लागला, तेव्हा वरील तत्त्वप्रणालीस बाध येऊ लागला, म्हणून ‘विपत्ती’ची उपपत्ती मांडली गेली तीमध्ये असे प्रतिपादन केले गेले की, पृथ्वीच्या इतिहासात हिमअवधाव (पर्वताच्या उतारावरून एकदम घसरणारी बर्फाची प्रचंड राशी), प्रलय ह्या व तत्सम इतर आपत्तींमुळे अनेकदा जीवांचा संपूर्ण नाश व त्यानंतर पुनर्निर्मिती झाली असावी या पुनर्निर्मितीत जीवाच्या आकार-प्रकारांत जे फरक पडले त्यामुळे विविधता आली. याउलट, शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेल्या उपपत्तीत जीवांतील किमान लक्षणांचे सातत्य व त्यांचा क्रमशः विकास ही मूळ कल्पना आहे. हे घडून येण्यास (१) परिस्थितीचा प्रभाव, (२) संयोगी परिवर्तन (भेद), उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांत होणारा एकाएकी बदल), (३) नैसर्गिक निवड (ज्या नैसर्गिक प्रक्रियेने योग्यतम किंवा बलिष्ठ प्राणी टिकाव धरून राहतो आणि परिस्थितीशी ज्याचे योग्य प्रकारे अनुकूलन झालेले नसेल तो नाश पावतो ती प्रक्रिया) इ. कारणे जबाबदार असतात. ही सर्व क्रमविकास स्वतंत्रपणे घडवून आणतात की संयुक्तपणे, तसेच क्रमविकास ही प्रक्रिया संचयी आहे किंवा कशी यांबद्दल भिन्न मतप्रवाह आहेत. क्रमविकासाला जीवांतील नैसर्गिक शक्तीच कारणीभूत होते असे काही मानतात. असे विविध विचारप्रवाह असले, तरी जीवविज्ञानातील विविध पुरावे आणि सांख्यिकीय आधार यांवरून परिवर्तन, उत्परिवर्तन, परिस्थिती आणि नैसर्गिक निवड या तत्त्वांवर आधारलेला शास्त्रीय दृष्टिकोन क्रमविकासाच्या सिद्धांताला बळकटी आणतो.
क्रमविकासाचा खरेपणा जीवविज्ञानाच्या विविध शाखांमधून मिळणाऱ्या पुराव्यांवरून चांगला समजू शकतो त्यावरून समान पूर्वज, जीवांतील किमान लक्षणांचे सातत्य, विविधतेतील साम्याची बैठक व जीवात क्रमशः घडून येणारे बदल या गोष्टी शाबीत होत असल्याने क्रमविकासाच्या शास्त्रीय दृष्टिकोनास पुष्टी मिळते हे भिन्न पुरावे व त्यांची नमुन्यादाखल घेतलेली काही उदाहरणे खाली दिली आहेत.