पहाटचे वर्णन निबंध लेखन
Answers
काळा म्हणजे तरी कसा? तान्ह्या बाळासाठी म्हणून मुद्दाम नंदादीपाच्या वातीवर चांदीचा चमचा धरून, त्याची काजळी तुपात खलून आजीनं केलेल्या बाळकाजळाइतका मुलायम. सुगंधी. अंगावर रोमांच उभे करणारा. उन्हाळ्याच्या दिवसांत, रात्री गच्चीवर टिपूर लख्ख चंद्रप्रकाशात फिकट उदास वाटणारा. पण मध्यरात्रीनंतर चंद्र कलायला लागल्यावर त्या चंद्रावरही मायेनं पांघरूण घालणारा. शहरात असताना दिव्यांच्या झोतांमुळे गढूळ झाल्यासारखा वाटणारा भेसळमय अंधार शहराबाहेर गेलं की कसा सलग, घट्ट एकसंध, गुळगुळीत वाटतो. रायगडावर रोपवेमधून जाताना वर आकाश, खाली दूर राहिलेली जमीन आणि त्यांच्यामधल्या पोकळीमध्ये अंधारावरच उभा असलेला तो अधांतरी तंबू कशी अनामिक हुरहूर लावून जातो.
कधीकधी रात्री अचानक जाग येते. डोळे उघडले आहेत की मिटलेले हेही लक्षात येऊ नये असा अंधार सगळीकडे पसरलेला असतो. मधूनच पलिकडच्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक्सचे आवाज वाऱ्यावर तरंगत येतात. अनामिकाची भिती वाटण्याऐवजी त्या अंधाराची सोबत मस्त उबदार वाटायला लागते. अजून बराच वेळ रात्र आहे असं वाटत असतानाच पलिकडे आंब्याच्या झाडावरून कोकिळ ओरडायला लागतो. डोळ्यांपुढे अर्धवट राहिलेलं स्वप्न असतं पण खिडकीबाहेर एक निराळंच जग खुणावत असतं.
अंग चोरून जेरीच्या पांघरुणात झोपलेल्या टॉमने झोपेत हातपाय पसरल्यावर ते पांघरूण त्याला जसं अपुरं पडत जाईल तसं आकाशाने तोंडावरून ओढून घेतलेलं अंधाराचं पांघरूण त्याला अपुरं पडायला लागतं. सर्व बाजूंनी त्या पांघरुणाच्या कडा हळूहळू उलायला लागलेल्या असतात. प्रकाश मांजरासारखाच पावलांचा आवाज न करता क्षितिजाच्या कडेकडेने आभाळाच्या घुमटात झिरपायला लागलेला असतो. झुंजूमुंजू, ब्राह्ममुहूर्त, पंचपंच उषःकाल, भली पहाट या सगळ्या शब्दांनी एकत्रितपणे जिचं वर्णन करता येणार नाही अशी ती साखरझोपेची वेळ फारच गोड असते. पूर्व क्षितिजावर आश्विनौ, उषा , अरुण इ. चिरतरुण मंडळी दर्शन देत असतात. धड अंधार नाही , धड उजेड नाही अशी ती प्रातःसंध्येची वेळ कळेल नकळेल असं काहीतरी अस्फुट सांगून जाते . तिच्या अपूर्णतेच्या गोडीला त्या अस्फुटाची मोठी हृद्य झालर असते. जगाच्या आरंभापासून ती किती माणसांना अशीच जाणवत राहिलेली आहे असा विचार आला की आजवर जन्माला आलेल्या असंख्य अनाम मानवांशी आपलं काहीतरी नातं आहे असं वाटून जातं.
हळूहळू "मी आहे, मी जागा आहे, मी इथे आहे" असं ओरडत बसायच्या कामाचा खांदेपालट होतो. रातकिड्यांची ड्यूटी संपल्यामुळे ते आनंदाने झोपी जातात आणि ताज्यातवान्या झालेल्या चिमण्या नव्या दमाने ते काम करायला सुरुवात करतात. त्यांच्या आवाजाने वैतागून कावळे उठतात. "काय शिंची कटकटाय, अगं ए पलिकडे जाऊन झोप बघू तू.... " असा काहीसा सूर लावत ते आपली आघाडी उघडतात. सामना उत्तरोत्तर रंगत जातो. मध्येच भारद्वाज मंडळी बुभुःकार करून जातात. दयाळ हजेरी लावतात. शिंपी, शिंजीर, नाचण, बुलबुल, होले इ. मंडळी आपली प्रातःकाळची स्वरमेहनत आटपतात तोवर आभाळातून अंधार हद्दपार झालेला असतो. मोतिया रंगाचा कोवळा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. त्याला अजून तेजाचं रूप मिळालेलं नसतं. चुलीवर ठेवलेलं पातेलं नुक्तं तापायला लागावं आणि पुढे होणाऱ्या तप्त अवस्थेची त्याने उगाचच चुणूक दाखवावी तसा तो बाळप्रकाश सूर्याचं उन्ह लौकरच येणार आहे याचं सूतोवाच करून जातो. फार ऊष्ण नसलेला तो प्रकाश हवाहवासा वाटतो.
खिडकीबाहेर ही लगबग सुरू असतानाच घरोघरी उत्साही मंडळी फिरायला म्हणून बाहेर पडतात. ( अतिउत्साही आजोबा मंडळी एक फेरी संपवून एव्हाना रस्त्याकडेच्या बाकावर विसावलेली असतात). एवढं सगळं झाल्यावर कोंबड्यांना खडबडून जाग येते आणि जणू काही आपण आरवलो म्हणूनच एवढा 'उजेड' पडला अशा थाटात कुक्कुटमंडळी आपली सेवा रुजू करायला लागतात. घरोघरीच्या आकाशवाण्या आपापल्या आवडीप्रमाणे गाऊ लागलेल्या असतात. कुठे लघुलहरींवर 'स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला' चा गजर सुरू असतो तर कुठे एफ्फेम वर आगाऊ आरजे मंडळी पंजाबी गाण्यांचं दळण काल रात्रीची शिळी मिसळ लिंबू पिळून पुन्हा विकायला ठेवावी तशी दळू लागलेली असतात. आणि या गडबडीतच खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आगगाडीचं इंजिन एकदम धडधडत फलाटावर यावं तसा तो बालरवीचा पहिला किरण एकदम जमिनीवर उतरतो....
आणि आत्तापर्यंत मधुर, रमणीय वगैरे वाटणारी सोनेरी सकाळ "हापिसची वेळ झाली " चा गजर करणाऱ्या घड्याळाच्या काट्यांमागे पार नाहीशी होऊन जाते. मखमली वगैरे अंधार, सोनसळी वगैरे सकाळ आणि बालरवी वगैरे मंडळी पुलाखालून वाहून गेलेल्या पाण्यासारखी वाहून गेलेल्या काळच्या पाठ्यपुस्तकांच्या पानांमध्ये लुप्त होतात.
' माइल्स टु गो बिफोर आय स्लीप, प्लेसेस टु गो अँड प्रॉमिसेस टु कीप ' चा विचार मनात येतो आणि ते माइल्स कापून पुन्हा रात्र यायला खरंच युगं लोटणार असं वाटायला लागतं. रात्रीची जादू नाहीशी होते पण जिभेवर रेंगाळणारी पहाटेची गोडी मात्र ती जादू खरंच इथे होती याची ग्वाही देत राहते.
Answer:
मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही.
मला जाग आली, तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो. सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा-सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. काही न बोलता मी आणि अमित चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती.
आम्ही टेकडीवर पोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता; पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होते. या काम
नि पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते. एखादया विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनात जागी झाली
'कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची!' पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य, प्रसन्न पहाट जो अनुभवतो, त्याचे अंतःकरणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून अजूनही मानवतेचे दर्शन घडते!
त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर घरांच्या छोट्या अंगणात तुळशीवृंदावनांपुढे रांगोळ्यांची शोभा दिसली. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून देवळांतील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे 'प्रसन्नता' भरून राहिली होती. शाहीर होनाजीची 'अमर भूपाळी' जणू साकार झाली होती.
पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.
काही विशेष : शालान्त परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत निबंधांबरोबर मुद्दे दिलेले नसतात. परंतु प्रश्नपत्रिकेतून निवडलेला निबंध कोणकोणत्या मुद्दयांना धरून लिहावा, याचा सराव विदयार्थ्यांना असला तर ते सहजतेने निबंध लिहू शकतील. परीक्षेत निबंध लिहिण्यापूर्वी अशी सवय विदयार्थ्यांमध्ये बाणावी, या उद्देशाने या ब्लागवर सर्व निबंधांसाठी योग्य असे मुद्दे देण्यात आले आहेत.
Essay On Pahat In Marathi -रम्य पहाट मराठी निबंध
श्रावणातल्या पावसानंतरची पहाट 'श्रावणात घननिळा' याचाच अनुभव ती रात्र देत होती. काळ्या मेघांनी सारे नभ आक्रमिले होते. नेहमी दिमाखाने चमचमणाऱ्या लक्षावधी चांदण्याही आज आकाशात कोठे दिसत नव्हत्या. चादण्याच काय पण त्यांचा तो तारकानाथही गगनाच्या प्रांगणात कोठेच दिसत नव्हता.
त्या रात्री एकच गोष्ट फक्त मूर्त स्वरूपात प्रतीत होत होती आणि ती म्हणजे कोसळणारा पाऊस. बराच वेळ मी तो पाऊस ऐकत होते-हो ऐकतच होते
कारण बाहेरच्या मिट्ट काळोखात काहीच दिसत नव्हते. पण मध्येच मोठ्या चपळाईने ती चपला चमकून गेली आणि त्या निमिषार्धच मला त्या पावसाचे रौद्र स्वरूप दिसले. खिडकी बंद करून मी डोक्यावरून पांघरूण घेतले. त्या क्षणी मनात आले, श्रावणातील अशाच एका रौद्र रात्री भगवंतांनी कृष्णावतारात या इहलोकात आगमन केले होते. नाही!
ती रात्र आणि तो पाऊस केव्हा संपला माहीत नाही. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा खिडकीच्या काचेचे रूप मला आगळेच भासले. क्षणात उठून मी बाहेर आले. रात्रीचा तो काळ्या ढगांचा बुरखा गगनाने केव्हाच फेकला होता. भगवान सूर्याचे आगमन अदयापि व्हायचे होते, पण आकाशात विविध रंगांची उधळण झालेली दिसत होती. कुणा बालिकेने रंगावली रेखाटण्याऐवजी स्वतःजवळचे सारे रंगच उधळले आहेत की काय, असे वाटत होते. हेच का ते कालचे काळेकुट्ट आकाश म्हणून मी कुतूहलाने पाहू लागले.
रात्रीचा पाऊस आता नव्हता, पण त्या पावसाच्या खुणा मात्र सर्वत्र दिसत होत्या. सारा आसमत धुऊन निघाला होता. झाडांची पाने अजूनही ओलीचिब दिसत होती. ओल्या ओल्या पानांतून जाई, जुईसारखी पांढरी फुले त्या नुकत्याच न्हाऊन निघालेल्या आसमंताला गंधित करीत होती. हळूहळू वर येणाऱ्या भास्कराने या साऱ्या दृश्यावर सोनेरी किरणांचा मुकुट चढविला; आणि जणू त्या सोनेरी किरणांतून भोवतालच्या वातावरणावर चैतन्याचा शिडकावा केला.
श्रावणातील प्रत्येक पहाट आपल्याबरोबर चैतन्याची कुपीच घेऊन येते. कधी ते चैतन्य शिवाला बेल, शिवामूठ वाहणाऱ्या भक्तांच्या रूपाने भेटते; तर कधी मंगळागौरीसाठी पत्री-फूले गोळा करणाऱ्या परड्यात दिसते. विविध रंगांचा नाजूक तेरडाही जिवतीच्या व्रतासाठीच सकाळी हसत असतो. तर कुठे शनिवारची कहाणी शनीच्या पूजेची आठवण देते.
अशा या श्रावणातील निसर्गदर्शन घेण्यास निघावे तर सरसर आवाज करीत सर कोसळते आणि आडोसा शोधावा तर पुन्हा हा खट्याळ श्रावण आपले हास्य पिवळ्या उन्हातून ओसंडून देतो. पावसानंतरची ही पहाट तप्त मनाला दिलासा देते व आपूलकीच्या ओलाव्याने खुलविते. अशाप्रकारे essay on pahat in marathi -रम्य पहाट मराठी निबंध हा निबंध वरील प्रमाणे वर्णन करता येईल . आपले रम्य पहाट विषयी काय मत हे कमेंट करून कळवा, तुमची प्रतिक्रीया आमच्यासाठी अमुल्य आहे. धन्यवाद
वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते