परिसंस्थेती वनस्पती प्राणथमि भक्षक म्हणतात
Answers
Answer:
पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात.
परिसंस्थेत जे घटक असतात त्यांना एकत्रित राहण्यासाठी सक्षम अशी स्थिती असते आणि तिच्यात स्वयंविकासाची क्षमता असते. कोणत्याही परिसंस्थेत सजीव-सजीव आणि सजीव-पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात. त्यामुळे परिसंस्थेचा विस्तार केवढाही असू शकतो. काही परिसंस्था नैसर्गिक प्रदेशाएवढया विशाल तर काही परिसंस्था नदी, तळे, वने अशा लहान विस्ताराच्या असतात.
परिसंस्थेतील अशा घटकांचे ठळक दोन गट पडतात:
(१) अजैविक, (२) जैविक.
(१) अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या प्रमाणात बदल झाल्यास त्याचा सजीवांच्या गणसंख्येवर विपरीत परिणाम होतो. सजीवाच्या प्रत्येक प्रजातीमध्ये अजैविक घटकांचा परिणाम सहन करण्याची एक मर्यादा असते.
(२) जैविक घटकांत जीवावरणातील वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो. जैविक घटकांच्या अन्न मिळविण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे उत्पादक, भक्षक व अपघटक अशा तीन गटांत वर्गीकरण केले जाते. हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात. उत्पादकांनी तयार केलेल्या अन्नाचे भक्षण करणाऱ्या सजीवांना भक्षक किंवा परपोषी म्हणतात. अन्नभक्षणाच्या पद्धतीनुसार या भक्षकांचे तृणभक्षक, मांसभक्षक व सर्वभक्षक असे प्रकार खालीलप्रमाणे पडतात.
(अ) तृणभक्षक हे उत्पादकांनाच म्हणजे वनस्पती खाऊन आपली उपजीविका करतात. नैसर्गिक पर्यावरणाच्या अन्नसाखळीत त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. हरिण, हत्ती, ससे, गायी, म्हशी इत्यादी प्राथमिक भक्षक आहेत.
(आ) तृणभक्षकांना खाऊन आपली उपजीविका करणाऱ्या सजीवांना मांसभक्षक किंवा द्वितीय भक्षक म्हणतात. या गटात वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, गरूड इत्यादींचा समावेश होतो.
(इ) झुरळ, उंदीर, डुक्कर, मानव इत्यादी प्राणी तृण व मांस दोन्हींचे सेवन करतात. त्यांना सर्वभक्षक म्हणतात.
सूक्ष्मजीव, बुरशी, कवके इत्यादी सजीव मृत सेंद्रिय घटकातील पदार्थांचे असेंद्रिय संयुगात रूपांतर करतात. त्यांना अपघटक म्हणतात.
परिसंस्थेतील विविध घटक परस्परांवर अवलंबून असतात. अन्न, निवारा, प्रजनन अशा उद्देशाने या घटकांत निरंतर आंतरक्रिया होत असते. परिसंस्था व त्यातील आंतरक्रिया कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेचा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचे चक्रीभवन या प्रक्रिया आवश्यक असतात. सूर्य हा सर्व परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचलेल्या ऊर्जेपैकी केवळ एक टक्का ऊर्जा वनस्पतींकडून शोषली जाते आणि तिचे रूपांतर अन्नरूपातील ऊर्जेत केले जाते. ही ऊर्जा परिसंस्थेतील इतर सजीवांपर्यंत पोहोचते. प्रत्येक जिवंत अथवा मृत घटक दुसऱ्या सजीवांचे अन्न असतो.