Environmental Sciences, asked by ajumnagiri, 3 months ago

परिस्ंथा म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती लिहा​

Answers

Answered by borhaderamchandra
0

Answer:

परिसंस्था

पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात.

परिसंस्थेतील अशा घटकांचे ठळक दोन गट पडतात:

(१) अजैविक, (२) जैविक.

(१) अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो.

(२) जैविक घटकांत जीवावरणातील वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो. जैविक घटकांच्या अन्न मिळविण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे उत्पादक, भक्षक व अपघटक अशा तीन गटांत वर्गीकरण केले जाते. हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात. उत्पादकांनी तयार केलेल्या अन्नाचे भक्षण करणाऱ्या सजीवांना भक्षक किंवा परपोषी म्हणतात. अन्नभक्षणाच्या पद्धतीनुसार या भक्षकांचे तृणभक्षक, मांसभक्षक व सर्वभक्षक असे प्रकार खालीलप्रमाणे पडतात.

(अ) तृणभक्षक हे उत्पादकांनाच म्हणजे वनस्पती खाऊन आपली उपजीविका करतात. नैसर्गिक पर्यावरणाच्या अन्नसाखळीत त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. हरिण, हत्ती, ससे, गायी, म्हशी इत्यादी प्राथमिक भक्षक आहेत.

(आ) तृणभक्षकांना खाऊन आपली उपजीविका करणाऱ्या सजीवांना मांसभक्षक किंवा द्वितीय भक्षक म्हणतात. या गटात वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, गरूड इत्यादींचा समावेश होतो.

(इ) झुरळ, उंदीर, डुक्कर, मानव इत्यादी प्राणी तृण व मांस दोन्हींचे सेवन करतात. त्यांना सर्वभक्षक म्हणतात.

सूक्ष्मजीव, बुरशी, कवके इत्यादी सजीव मृत सेंद्रिय घटकातील पदार्थांचे असेंद्रिय संयुगात रूपांतर करतात. त्यांना अपघटक म्हणतात.

परिसंस्थेतील विविध घटक परस्परांवर अवलंबून असतात. अन्न, निवारा, प्रजनन अशा उद्देशाने या घटकांत निरंतर आंतरक्रिया होत असते. परिसंस्था व त्यातील आंतरक्रिया कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेचा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचे चक्रीभवन या प्रक्रिया आवश्यक असतात. सूर्य हा सर्व परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचलेल्या ऊर्जेपैकी केवळ एक टक्का ऊर्जा वनस्पतींकडून शोषली जाते आणि तिचे रूपांतर अन्नरूपातील ऊर्जेत केले जाते. ही ऊर्जा परिसंस्थेतील इतर सजीवांपर्यंत पोहोचते. प्रत्येक जिवंत अथवा मृत घटक दुसऱ्या सजीवांचे अन्न असतो.

परिसंस्थेतील स्वयंपोषक स्तरांकडून विविध प्रकारचे भक्ष्य आणि भक्षकाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण होते. या प्रक्रियेद्वारे परिसंस्थांतील ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे जात असते. अन्नसाखळीतील सर्व सजीव अन्न आणि पर्यायाने ऊर्जा मिळविण्यासाठी परस्परांवर अवलंबून असतात. निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या आहेत. त्या एकमेकांमध्ये गुंफल्या जाऊन अन्नजाळे तयार होते.

सजीवांना जगण्यासाठी, वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी पोषकद्रव्यांची गरज असते. पर्यावरणात ही पोषक द्रव्ये आणि त्यांची संयुगे अजैविक घटकाकडे जात असतात. खनिजद्रव्यांच्या मूळ स्रोतांपासून ते सजीवांपर्यंत आणि पुन्हा सजीवांपासून ते मूळ खनिज द्रव्ये असे पोषकद्रव्यांचे चक्र घडून येते. याला पोषक द्रव्य चक्र म्हणतात. पोषक द्रव्य चक्राचे नियमन सौर ऊर्जा व गुरुत्वाकर्षण यांमार्फत होत असते. कार्बन चक्र, ऑॅक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, फॉस्फरस चक्र, सल्फर (गंधक) चक्र आणि जलचक्र इत्यादी पोषक द्रव्य चक्रांची उदाहरणे आहेत.

परिसंस्थेतील घटकांची संरचना व त्यातील आंतरक्रिया यांच्या विविध स्वरूपांमुळे पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था विकसित होतात. या परिसंस्थांचे (अ) भूमी परिसंस्था, (आ) जल परिसंस्था असे मुख्य गट केले जातात. भूमी परिसंस्थेने पृथ्वीवरील एकूण सु. १,४५० लाख चौ.किमी. क्षेत्र तर जल परिसंस्थेने सु. ३,६५० लाख चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे.

भूमी परिसंस्थेत उष्ण प्रदेशीय वर्षावने, उष्ण प्रदेशीय मान्सून वने, समशीतोष्ण सदाहरित वने किंवा तैगा, समशीतोष्ण पानझडी वने, बोरियल (उत्तर रशिया) वने, झुडपी वने, सॅव्हाना गवताळ प्रदेश, समशीतोष्ण गवताळ प्रदेश, टंड्रा, वालुकामय प्रदेश, वाळवंटी खडकाळ प्रदेश, नागरी लागवडीखालील जमीन किंवा कृषि परिसंस्था इत्यादींचा समावेश होतो. जल परिसंस्थेत दलदल, तलाव व नद्या, महासागर, समुद्रतळ जमीन, प्रवाळ बेटे, शैवाल पट्टे, नदीमुख इत्यादी परिसंस्थांचा समावेश होतो.

भारतात प्राकृतिक रचना व हवामान यांत विविधता असल्याने कमी अधिक विस्ताराच्या अनेक परिसंस्था आहेत. भारतात पर्वतीय, पठारी, वन, वाळवंटी, नदी, पाणथळ, किनारी इत्यादी प्रमुख परिसंस्था आहेत.

कोणत्याही परिसंस्थेत दिवसागणिक, वर्षांगणिक किंवा ऋतुमानानुसार लहानमोठे बदल होत असतात. काही वेळा हे बदल तीव्र आणि पटकन घडून येतात. उदा., एखाद्या वनात वणवा पेटला तर तेथील परिसंस्था नष्ट होतात किंवा चक्रीवादळ आल्यास तेथील समुद्रकिनाऱ्याच्या भागातील परिसंस्था विसकळित होतात. परंतु दिवसागणिक होणारे बदल, जसे पोषक द्रव्य चक्रात होणारे बदल एवढे सूक्ष्म असतात की परिसंस्था स्थिर आहेत असे वाटते. या बदलांखेरीज परिसंस्थेच्या जैविक आणि अजैविक पर्यावरणांत बदल घडून येत असतात. उदा., दुष्काळ, कडक हिवाळा किंवा एखाद्या रोगाची साथ इत्यादींमुळे पर्यावरणाच्या स्थितीत बदल होतात. ज्या परिसंस्थेत अन्नपुरवठा मुबलक असतो तेथील प्राण्यांची संख्या वाढते आणि जेथे अन्नपुरवठा कमी असतो तेथील प्राण्यांची संख्या घटते.

Similar questions