संकटात मदत करतो तोच खरा मित्र या शीर्षकावरून कथा लिहा
Answers
Answer:
एक घनदाट जंगल होतं. तिथं वाघ, सिंह, हत्ती, घोडे, ससे, हरीण, कुत्रे, मोर, लांडोर, पोपट, मैना असे विविध प्रकारचे पशु पक्षी रहात होते. प्राणी, पक्षी आपापले खाद्य मिळवण्याकरता इकडून तिकडे फिरत असत. एकदा एक ससा जंगलातून तुरु-तुरु धावत होता. तेव्हा त्याच्यामागे काही जंगली कुत्री लागली. ससा म्हणजे छोटा व भित्रा प्राणी. तो आपला जीव मुठीत घेऊन धावत सुटला. धावताना त्याला एक घोडा भेटला. त्याने घोड्याला विनंती केली की, मला तुझ्या पाठीवर घे व मला या जंगली कुत्र्यांपासून वाचव. घोडा म्हणाला मला तुला वाचवायला अजिबात वेळ नाही व तो घोडा निघून गेला.
पुढे गेल्यावर त्याला हरीण, बकरी असे बरेच प्राणी भेटले. पण सर्वांनी आम्हाला वेळ नाही असंच उत्तर दिलं. शेवटी ससा खूप थकला. तेव्हा त्याला समोरून एक हत्ती डोलत डोलत येत असताना दिसला.
त्याने हत्तीला म्हटलं, हत्ती दादा माझ्यामागे कुत्री लागलेत. त्या कुत्र्यांपासून मला वाचवा. हत्तीला ससोबाची दया आली. त्याने आपल्या सोंडेने सशाला वर उचललं व आपल्या पाठीवर घेतलं. ससोबाला हायसं वाटलं व त्याने हत्तीचे आभार मानले. मागून येणाऱ्या कुत्र्यांना ससोबा कुठे दिसलाच नाही. काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं की, ससा हत्तीच्या पाठीवर बसला आहे व ते तेथून पळून गेले. अशा प्रकारे हत्तीने सशाचे प्राण वाचवले. सशाला कळून चुकलं की बाकीचे प्राणी आपले नुसतेच मित्र आहेत. आपला खरा मित्र हत्तीच आहे. तेंव्हापासून त्या दोघांची छान गट्टी झाली.
तात्पर्य- जो संकट समयी कामा येतो तोच खरा मित्र असतो हे सर्वांनी लक्षात ठेवावं.