सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्कीरी कायदा जाहीर केला, :
Answers
Answer:
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापुरला‘मार्शल लॉ’चे महाभारत घडून आले. त्याआधी तेथे चक्क चार दिवस स्वराज्य होते. त्याला सोलापूरकर ‘गांधीराज’ म्हणत होते. अर्थात ते अचानक, एकाएकी घडले नाही. त्या पाठीमागे सोलापूरच्या राष्ट्रीय चळवळीची चार दशकांची परंपरा होती. सोलापूरची राष्ट्रीय चळवळ ही प्रामुख्याने उच्चशिक्षित वर्गापुरती मर्यादित पहिल्या तीन दशकांत होती. त्या चळवळीचा नूर गांधीयुग सुरू झाल्यावर पालटला. त्यानंतर, त्या चळवळीत युवकांचा व सामान्य जनतेचा सहभाग वाढतच गेला. त्याचे प्रत्यंतर 1930 साली मोठ्या प्रमाणावर आले. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव रावीच्या तीरावर पास झाला. युवक संघाची स्थापना ही महत्त्वाची घटना होती. साऱ्या देशभर युवक संघाच्या शाखा निर्माण झाल्या. सोलापूरातही शाखा स्थापन झाली. युवक संघाने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मोलाची कामगिरी बजावली आहे. भारतातील तरुण वर्ग राष्ट्रीय प्रवाहात आणणाऱ्या युवक संघाचा अध्यक्ष होता, युवकांचा कंठमणी जवाहरलाल ! म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच जवाहरलालने रावी नदीच्या काठी लाहोरात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केलेली होती आणि तेव्हापासून या देशामधील प्रत्येक तरुण राष्ट्रीय चळवळीतील त्याचा भार नेटाने उचलू लागला होता. स्वातंत्र्य अगदी हाकेवर आले आहे असे तरुणांना वाटत होते. सोलापूर शहरामधील युवकदेखील त्याला अपवाद नव्हता. सोलापूरकरांनी 26 जानेवारी 1930 चा पहिला ‘स्वातंत्र्यदिन’ दीपोत्सवाने साजरा केला. त्या सालच्या यात्रेच्या कुस्त्यांमधील विजयी पैलवान भरजरी फेट्यांऐवजी गांधी टोपी घालून मिरवले गेले ! तसेच, गुढीपाडव्याला घराघरांवर गुढ्यांऐवजी राष्ट्रीय निशाण उभारले गेले. महात्माजी मिठाचा सत्याग्रह 6 एप्रिलला करणार होते. सोलापूरकरांनी त्यावेळी सोलापूरच्या म्युनिसिपालटीवर राष्ट्रीय निशाण फडकावले. कायदेभंगाची चळवळ टिपेला पोचली. सरकारने महात्माजींना अटक केली. देशभर हरताळ, निषेध मोर्चे, मिरवणुका यांचा आगडोंब उसळला. सोलापुरातही निषेध मिरवणुका, सभा होतच होत्या.
Explanation:
नरीमन व बजाज यांच्या अटकेची बातमी सोलापुरात 8 मे रोजी पोचली आणि युवक संघाने मोठ्या मिरवणुकीचे आयोजन केले. मिरवणुकीत सोलापूरच्या राजकारणातील साऱ्या गटातटांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ती मिरवणूक शांततेत पार पडली. मिरवणुकीचे विसर्जन झाल्यानंतर त्यामधील काही कार्यकर्ते रुपाभवानी मंदिराकडे शिंदीची झाडे तोडण्याकरता धावले. मद्यपान बंदी हा त्या कार्यक्रमाचा एक भाग होता. सशस्त्र पोलिसांची तुकडी त्या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी तेथे पोचली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांनीदेखील अटक करून घेतली. बघ्यांचा मोठा जमाव त्या ठिकाणी होता. त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. त्यांनी कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली. त्या साऱ्या गदारोळात दगडफेकीस सुरुवात झाली. तेव्हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हेन्री नाईट यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबारात शंकर शिवदारे हा मरण पावला. त्यामुळे खवळलेल्या जमावाने पोलिसांच्या गाड्या वेढल्या. अधिकारी प्राणसंकटात सापडले. तेव्हा मल्लप्पा धनशेट्टी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जमावाला काबूत आणले. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी पकडलेल्या लोकांची नावे टिपून घेऊन त्यांना सोडण्यात यावे अशी तोड काढली. त्याप्रमाणे पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. मल्लप्पा धनशेट्टी यांनी पोलिस गाड्यांना रस्ता मोकळा करून दिला. पोलिसांच्या गाड्या निघाल्या, पण जाता जाता, त्यांनी पुन्हा एकदा गोळीबाराच्या फैरी झाडल्या. त्यात बरेच जण जखमी झाले. हा विश्वासघात होता. त्यामुळे जमाव जास्तच संतप्त झाला. खवळलेला तो जमाव मल्लप्पा धनशेट्टी यांनाही आवरेना. जमावाने जवळ असणाऱ्या पोलिस चौकीवर हल्ला चढवला. त्यावेळी जमावाच्या मारहाणीत दोन पोलिस मरण पावले. जमावाने पोलिस चौकीला आग लावली. जमावाने जवळच असणाऱ्या कोर्टाच्या इमारतीसदेखील आग लावली. नंतर जमाव पांगला. सोलापुरात 8 मे रोजी घडला तो प्रकार एवढाच होता. सरकारने मात्र त्याची दंगा, जातीय दंगा व बंड अशी वेळोवेळी संभावना केली.