Art, asked by like19, 2 months ago

४) 'सामाजिक संरचना' ही संकल्पना स्पष्ट करा.BA/bcom​

Answers

Answered by likefreefire1
1

भौतिक वस्तूंची रचना असते, तसेच समाजाचीदेखील एक विशिष्ट अशी रचना असते, असे समाजशास्त्रात मानले जाते. समाजरचनेचे अध्ययन करण्यासाठीच 'सामाजिक संरचना' या संज्ञेचा उपयोग समाजशास्त्रात केला जातो.

सहजीवनासाठी किंवा विभिन्न गरजांची वा उद्देशांची पूर्ती करण्यासाठी व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यांच्यामध्ये क्रिया प्रतिक्रिया होऊन त्यातून आंतरक्रियांची साखळी निर्माण होते. पुन्हापुन्हा निर्माण होणाऱ्या आंतरक्रियांमधून त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध निर्माण होतात. हे सामाजिक संबंध सुव्यवस्थित व स्थिर स्वरूपाचे असतात. कारण आंतरक्रिया करणाऱ्या व्यक्ती विशिष्ट स्वरूपाच्या स्थायी बंधनांनी बद्ध झालेल्या असतात. व्यक्ती व्यक्तींमधील परस्परसंबंधांच्या स्थिर प्रतिमानास ''सामाजिक संरचना" असे म्हणतात.

"सुव्यवस्थित, स्थिर व पुन्हापुन्हा निर्माण होणाऱ्या परस्परसंबंधांनी सामजिक संरचना निर्माण होते," असे विल्यम डॅब्रिनर यांनी म्हटले आहे.

सामाजिक संरचना या संकल्पनेला संरचनात्मक प्रकार्यवाद या समाजशास्त्रीय सिद्धांताचा (अथवा दृष्टिकोनाचा असेदेखील म्हटले जाते) आधार आहे. समाजशास्त्राच्या प्रारंभाच्या काळातील एमिल दुरखिम, कॉम्त या समाजशास्त्रज्ञांच्या विचारांमध्ये संरचनात्मक प्रकार्यवाद या सिद्धांताचे मूळ असल्याचे दिसते. अलीकडच्या काळातील प्रामुख्याने रॉबर्ट मर्टन व टालकट पारसन या समाजशास्त्रज्ञांनी संरचनात्मक प्रकार्यवादाचा सिद्धांत विकसित केला आहे. या सिद्धांताला 'सामाजिक व्यवस्था सिद्धांत' (Social Systems Theory), 'सतुलन सिद्धांत' (Equilibrium Theory), प्रकार्यवाद (Functionalism) अशा नावानेदेखील संबोधिले जाते. थोडक्यात, सामाजिक संरचना ही संकल्पना संरचनात्मक प्रकार्यवाद या समाजशास्त्रीय सैद्धांतिक दृष्टिकोनाशी निगडित आहे.

समाजशास्त्रात सामाजिक संबंधांचा विचार व्यक्तीच्या संदर्भात नव्हे तर सदस्यांच्या संदर्भात केला जातो. कारण समाज जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात वावरताना प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी समूहांची सदस्य असते. उदाहरणार्थ, कुटुंब, जात, खेडे, नगर यांसारख्या समूहाचा किंवा समूहामधील उपसमूहांचा सदस्य म्हणून आपण समाजात वावरत असतो. सामाजिक संरचनेची संकल्पना प्रामुख्याने स्थायी व संघटित असणाऱ्या समूहांच्या संदर्भातच वापरली जाते. कुटुंबाचे उदाहरण घेऊन सामाजिक संरचना या संकल्पनेचा अर्थ पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.

कुटुंब हा पती, पत्नी, मुलगा-मुलगी, भाऊ, बहीण, नात, सून, आजी यांसारखी सामाजिक स्थाने व दर्जा असणाऱ्या सदस्यांचा समूह आहे. गाव, खेडे, नगर यांसारख्या मोठ्या आकाराच्या समूहांच्या संदर्भात कुटुंब हा उपसमूह आहे असे म्हणता येईल. प्रत्येक कुटुंबसदस्याला आपले स्थान व दर्जा यांना अनुसरून स्वत:च्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावी लागतात. यालाच समाजशास्त्रीय परिभाषेत भूमिका (Role) असे म्हटले जाते. अशा प्रकारे भूमिकाधारक या नात्याने (उदाहरणार्थ, पती पत्नी, भाऊ-बहीण, आजी-नातू, पिता-पुत्र) कुटुंबसदस्यांच्या आंतरक्रिया सुरू असतात. समाजव्यवस्थेत पती-पत्नी, आई मुलगा यांसारख्या भूमिकाधारकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या कोणत्या, त्यांनी परस्परांशी कसे वागावे हे स्पष्ट करणारी प्रमाणके व मूल्ये रूढ असतात. कुटुंबसदस्यांच्या आतंरक्रिया प्रमाणके व मूल्ये यांना अनुसरून सुरू असतात. यामुळे त्यांच्यामधील सुव्यवस्थित, स्थिर व पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या सामाजिक संबंधांची रचना निर्माण होते. तिला कुटुंब संरचना असे म्हटले जाते. समूह व उपसमूह, भूमिका, प्रमाणके आणि मूल्ये ही सामाजिक संरचना निर्माण करणारी चार घटकतत्त्वे आहेत.

Similar questions