सामाजिक सबधाचा जाळ्यास काय म्हणतात
Answers
Answer:
( सोशल रिलेशन्स ). दोन अथवा अधिक व्यक्तींत प्रस्थापित होणारे संबंध. हे संबंध अनेक प्रकारचे, भिन्न स्वरूपाचे आणि परिस्थित्यनुसार प्रसंगोपात्त बदलणारे, कधी सौहार्दपूर्ण तर कधी संघर्षमय असतात. व्यक्तीला सामाजिक संबंधांची गरज नेहमीच भासते. सामाजिक संबंधांच्या माध्यमातूनच व्यक्ती आपल्या अडी-अडचणी सोडवीत असतात आणि गरजा पूर्ण करतात; कारण कोणतीही व्यक्ती ही मूलतः स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी जीवन व्यतीत करू शकत नाही. सामाजिक संबंध व्यक्तिव्यक्तींमधील परस्परसंबंधांची नानाविध रूपे दर्शवितात. समाजातील माणसांमध्ये वर्षानुवर्षे कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आदी व्यवहार चालू असतात. समाजात जन्माला येणाऱ्या नवजात बालकांवर कुटुंबाच्या संस्कारांबरोबरच हळूहळू शेजारपाजाऱ्यांचे संस्कारही होत असतात. कालांतराने या मुलाचे/मुलीचे समाजातील अनेक व्यक्तींशी संबंध येतात. त्याचे आपाततः परिवर्तन ‘माणूस’ या क्रियाशील सामाजिक प्राण्यामध्ये होते. माणूस एक सामाजिक प्राणी आहे, या उक्तीनुसार तो समाजाबाहेर राहू शकत नाही. माणूस आणि इतर माणसे यांच्यातील परस्परसंबंध म्हणजेच सामाजिक संबंध होय.
समाजात राहिल्याशिवाय माणूस माणूस होणार नाही आणि अनेक माणसे एकत्रितपणे आल्याशिवाय समाज अस्तित्वात येणार नाही. समाज ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारी संकल्पना असून व्यक्ती आणि व्यक्तींचे समूह यांत परस्परसंबंधांचे एक अतूट नाते निर्माण होते. अर्थात ही संकल्पना व्यापक असून तिच्या चिकित्सक अभ्यासाला समाजशास्त्रज्ञ मॅकायव्हर‘समाजशास्त्र’ म्हणतात. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध/संपर्क आला की, त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध निर्माण होतात. हे सामाजिक संबंध दृढतर होण्यासाठी संवाद व परस्परांतील देवाण-घेवाण ही प्रधान माध्यमे असून हळूहळू ओळखीचे रूपांतर घनिष्ठ मैत्रित होते आणि कालांतराने मित्रवर्ग हा समूह तयार होतो.
सामाजिक संबंध व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आढळतात. उदा., हावभाव, शिष्टाचार, भाषेतील चढउतार, किया-प्रतिक्रिया, देव-घेव, शिवीगाळ, मारामारी इत्यादी. यांपैकी जे वर्तन घडते, ते परस्परांच्या स्वभाव व प्रवृत्तींवर, पार्श्वभूमीवर आणि कधीकधी भविष्यातील हितसंबंधांवर अवलंबून असते. समोर आलेल्या व्यक्तीला आनंद होऊ शकतो, जर ती चांगली ओळखीची व हितसंबंधांना पूरक असेल तर; त्या व्यक्तीकडून काही स्वार्थ साधावयाचा असेल, तर हस्तांदोलन, स्तुती या मार्गांनी सलगी केली जाते. उलट एखाद्या व्यक्तीविषयी नाराजी असेल, तर ओळख न दाखविणे, अबोला धरणे वा राग व्यक्त करणे असे वर्तन घडते.
कार्ल मार्क्स ने उत्पादन-प्रक्रियेशी संबंधित असलेल्या मालक-कामगार व त्यांच्यातील वस्तुनिर्मिती, लागणारा वेळ, श्रममूल्य, भांडवली तरतूद इत्यादींसाठी होणाऱ्या व्यवहारांना उत्पादनाचे संबंध म्हटले आहे. ते एका दृष्टीने आर्थिक, सामाजिक संबंधच होत.
राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार यांचे वारंवार संबंध येतात. ते स्थलकालानुरुप तात्पुरते वा दीर्घकालीन असतात. हे राजकीय-सामाजिक संबंध होत. शिक्षणासाठी एकत्र आलेले विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालक, परीक्षक इत्यादींशी संबंधित सर्व व्यवहार हे शैक्षणिक-सामाजिक संबंध दर्शवितात. धर्मगुरू, भक्तगण, धर्मस्थाने आणि समाजात रूढ झालेले धार्मिक समारंभ-उत्सव आदींशी संबंधित असणारे सर्व व्यवहार धार्मिक-सामाजिक संबंध होत.
सामाजिक संबंध सुरुवातीस प्राथमिक स्वरूपात असतात. पुढे ते वारंवार भेटीतून परस्परांशी सहाय्यभूत आणि दीर्घकाल टिकणारे होतात. हे प्रामुख्याने कौटुंबिक स्तरावर, पालक-पाल्य, गुरु-शिष्य, मित्र-मैत्रिणी, पति-पत्नी यांच्यात आढळतात. तसेच आर्थिक व्यवहारात, व्यावसायिक वर्तुळात, अध्यापन-अध्ययनक्षेत्रांत दृष्टोत्पत्तीस येतात. परस्परांवरील विश्वास अशा संबंधांचा मूलभूत आधार असतो. मात्र असे संबंध मर्यादित व थोड्या प्रमाणात आढळतात.
सामाजिक संबंध कधी कधी तात्कालिक स्वरूपात मोठ्या (उदा., जमाव, सभा, आकाशवाणीचा श्रोतृवृंद, सामना पाहणारे प्रेक्षक, सहप्रवासी) समूहांमधील वा संघटनांमधील व्यक्तींमध्ये आढळतात. एका विशिष्ट लक्ष्याभोवती ते केंद्रित असतात. त्या लक्ष्याभोवती समान प्रतिक्रिया व्यक्त होतात, वरवरचे सहकार्य दिसून येते. वैयक्तिक परिचय नसला, तरी सामूहिक एकमत असते. असे संबंध प्रामुख्याने असंघटित समूहात किंवा संघटित सभासदांमध्ये–विशेषतः कामगार संघटना, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये, बँका आदींतून–दिसून येतात.
सामाजिक संबंधांचे स्वरूप कसे आहे, याचे ज्ञान सामाजिक क्रियाप्रक्रियांमार्फत होते. ते कटू वा ताणले गेले असतील, तर ते स्पर्धा, संघर्ष, उठाव, भेदभाव यांमार्फत सामाजिक विघटन घडवून आणतात. संबंध सौहार्दपूर्ण असतील, तर ते सहकार, सहभाग, एकजूट आणि आपुलकीची देवघेव यांद्वारे समाजजीवन सुरळीत चालू आहे, याचे द्योतक ठरतात.