सुसंगती सदा घडो या विषयावर वैचारीक लेखन करा
सुसंगती अर्थ- संगतीचा परिणाम - सूसंगतीमुळे होणारे
लाभ आणि महत्व
Answers
Answer:
जीवनात यशस्वी होण्यासाठी जशी उच्च शिक्षणाची गरज असते, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांला चांगल्या संगतीची सुद्धा गरज असते, हे नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांने लक्षात ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षक नेहमी सांगत असतात, ‘आम्ही बि-घडलो, तुम्ही बि-घडावे’ या वाक्याचा खरा अर्थ जाणून, जो विद्यार्थी स्वत:ला घडविण्याचे नेहमी प्रयत्न करतो तोच शेवटी यशस्वी ठरतो बरं का बाल मित्रांनो! ज्यांना ज्यांना वाटतं आपले शिक्षक आपल्याला बिघडण्याचे धडे देत आहेत, त्यांची प्रगती कधीच होत नाही. शिक्षणाबरोबर मुलांना संगत ही निरनिराळ्या पद्धतीने घडवत असते; परंतु त्या संगतीतली माणसं किंवा मुलं कोणत्या गुणांची आहेत, हे आधी प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. बाळांनो, तुम्ही मुलं म्हणजे देवाघरची फुलंच रे! तुम्हाला जसं घडवावं, ज्या वातावरणात रुळवावं तसं तुम्ही घडता आणि रुळता. कुठल्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवता. परंतु चांगल्या वाईटाचाही पारख करणे आपण शिकले पाहिजे.
तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. श्रीरंगचे वडील त्याच्या बालपणातच देवाघरी गेले. परंतु, जाण्याआधी त्यांनी श्रीरंगला अनेक छान छान गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संगत कुणाची केली पाहिजे आणि संगतीतले कोणते गुण अंगिकारले पाहिजेत. श्रीरंगला लहानपणापासून देवाच्या पूजेची आणि भजनाची खूप आवड होती. तो नेहमी सकाळ आणि संध्याकाळचा काही वेळ देवाच्या भक्तीत घालवायचा. शाळेतील त्याचे मित्रही काही टवाळखोर तर काही अभ्यासू होते. पण त्यांच्या संगतीत राहूनही त्याने आपल्या मनावर चांगलाच ताबा ठेवला होता. टवाळखोर पोरांमध्ये वेळ घालवूनही त्याने स्वत: कधी टवाळखोरपणा केला नाही. दुस-याने आपल्या मार्गावर काटे पसरले की, आपण त्याच्या मार्गावर फुले पसरावी या वडिलांच्या शिकवणीने प्रेरित झालेला नेहमी दुस-यांना मदत करण्यातच आपला आनंद शोधत असायचा. त्याला नेहमी पराक्रमी योद्धय़ांचे चारित्र्य वाचायला आवडे, छत्रपती शिवाजी, झाशीची राणी, महाराणा प्रताप तर, श्रीराम, कृष्ण यांच्याही पराक्रमाच्या कथा तो नेहमी वाचायचा. तुकारामांचे अभंग, कीर्तनं तो आनंदाने ऐकायचा, भारुडं बघायला त्याला जाम आवडत असत. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, प्रीतीलता वाडेकर, भगतसिंग अशा अनेक देशभक्तांचे चारित्र्य वाचत वाचत तो लहानाचा मोठा झाला. नेहमी हुशार आणि आचरणाने चांगल्या माणसांची संगत केल्यामुळे, रोज चांगले विचार वाचल्याने, चांगली पुस्तके वाचल्याने आज तोच चांगला विचारवंत झाला आहे.
आपल्या ज्ञानाच्या जोरावर आज तो अनेक लोकांना आपल्या मुलांना कशी घडवली पाहिजे, कोणते संस्कार कशा पद्धतीने केले पाहिजेत हे सांगतो. पण, बाळांनो! तुम्ही म्हणाल शिक्षणाचा त्याग करून फक्त चांगल्या संगतीनं तुम्ही हे सर्व साध्य कराल तर तुमचा समज खोटा ठरेल बरं का. कुठल्याही गोष्टीच्या अगदी टोकावर चढायचं असेल तर शिक्षणाचा पाया हा उभारलाच पाहिजे. जसे घर बांधताना मूळ पायाची गरज असते तसे, आयुष्यात मोठे होण्यासाठी शिक्षण हे गरजेचे आहे. आज तो एक मोठा विचारवंत झाला आहे. तशीच तुमचीसुद्धा काही स्वप्ने असतील ती सध्या करण्यासाठी बाळांनो, खूप शिक्षण घ्या पण, ते शिक्षण घेत असताना आजूबाजूचे वातावरण, तुमचे मित्र, मैत्रिणी यांच्यासोबत संगत करत असताना त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही याचा विचार मनापासून करा.
उज्ज्वल भविष्याच्या पूर्तीसाठी अशी कोणती वाईट सवय मनाला लावून न घेता स्वत:ला आयुष्याचा विद्यार्थी समजून शिकत राहा आणि ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चांगलं शिकता येईल अशांची संगत करा किंवा संगत केली असेल तर ती कधीच सोडू नका. चांगले ऐका, चांगले बघा, चांगले वाचा, चांगले वागा, वाईटाकडे दुर्लक्ष करा, अन्यायाला वाचा फोडा, सुशिक्षितांच्या, विद्वानांच्या, हुशार विद्यार्थ्यांच्या, थोर समाजसेवकांच्या संपर्कात सानिध्यात राहून स्वत:च्या मनावर सुविचारांची पेरणी करून घ्या. हे सर्व करत असताना तुमच्याकडे नम्रता असली पाहिजे हे मात्र विसरू नका. यश तुमचा पत्ता शोधत शोधत एक दिवस नक्कीच तुमच्या दारावर येऊन धडकेल.