सुसंवाद काळाची गरज या विषयावर निबंध लिहा
Answers
Answer:
हितकर, आवश्यक तेवढंच, आनंददायी, प्रेमळ, परिणामकारक, गोडमधुर या गुणांनी युक्त असं आपलं बोलणं असावं असं एका सुप्रसिद्ध सुभाषितात म्हटलं आहे. त्या जोडीला सकारात्मकता, सुसंस्कृत, संयमी वाणी, राग-संताप-अपमान यांना वजा करणारं संभाषण हवं असे आणखी तीन गुण श्रुतप्रज्ञ स्वामींनी जोडले आहेत.
सर्वसामान्य माणसाला आपल्या घरात, कुटुंबात शांतता, तणावरहित वातावरण मिळालं तर तो आनंदी राहतो. पण आपलं कुटुंब शांत, समाधानी करायचं तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. आपली भांडणं जिभेमुळे होतात. कसं बोलावं आणि किती बोलावं हे नीट माहीत हवं. शिवाय समोरच्या माणसाचं म्हणणं सहभावाने समजून घेता यायला हवं. कित्येकदा शब्दामागचा नेमका अर्थ आपल्याला उलगडत नाही, कारण आपण समजून घेणं टाळतो. ऐकून घेणं ही क्रिया केवळ शब्दांचं श्रवण एवढय़ापुरती मर्यादित नाही. समोरचा माणूस हे का बोलतोय, त्याच्या शब्दांमागे कोणत्या भावना, विचार, संवेदना, संकल्पना आहेत हे जाणून घेण्याची क्रिया घडत नाही तोवर ऐकणं म्हणजे ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असं घडतं.
ऐकणं हृदयापासून व्हायला हवं. बोलणाऱ्याशी ऐकणाऱ्यानं जोडलं जायला हवं. शब्दांच्या अर्थामागचा अर्थ मनात उलगडता यायला हवा. शब्दांच्या माध्यमातून जी माहिती बोलणारा देऊ करतो, ती समग्रतेने संदर्भासहित समजून घ्यायला हवी. समजा, भर दुपारी आपल्याकडे आलेला एखादा माणूस म्हणाला की, ‘‘आज सकाळपासून मी कामं करीत िहडतो आहे. भावाने हे पुस्तक आजच्या आज तुमच्याकडे पोहोचवायला सांगितलं म्हणून कामे आटोपून लगेच तुमच्याकडे आलो.’’ तर हे बोलणं ऐकल्यावर त्यानं घेतलेल्या कष्टांची जाणीव व्हायला हवी. हा सकाळपासून िहडतो आहे, कदाचित भुकेला असेल, ही समज त्या वाक्यातील माहितीतून यायला हवी. आपण त्याला चहा, जेवणखाण या संदर्भात आपुलकीने विचारायला हवं. या संवादामुळे त्या क्षणी आपल्या आणि त्याच्यामध्ये चांगल्या भावनांचा पूल बांधला जातो. नात्याचा अंकुर उगवतो. या तऱ्हेचा संवाद म्हणजे एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या विचार भावनांचा आदर करीत झालेला कृतिशील संवाद असतो. तो नाती पक्की करीत जातो. भावनांचा ओलावा आपल्यालाही हवा असतो. संवादातून तो रुजतो. श्रुतप्रज्ञ स्वामी म्हणतात की, बोलणं किंवा न बोलणं यापेक्षा तुम्ही काय ऐकता, ते किती हृदयापासून ऐकता, त्यावर प्रतिसाद कसा आणि कोणत्या शब्दात देता हे महत्त्वाचं असतं. आपलं बोलणं कसं असावं या संदर्भात श्रुतप्रज्ञ स्वामी एक संस्कृत श्लोकाचा दाखला देतात.