संतांची कामगिरी निबंध
Answers
Answer:
संतांचे कार्य-
संतांच्या कामगिरीविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे. आजही त्याविषयी चर्चा झडतच आहेत. यावरून संतप्रभाव चांगल्या प्रकारे प्रत्ययास येतो,असे वाटते.
कोणताही पूर्वग्रह न ठेवता संतांच्या कामगिरीविषयी पुढीलप्रमाणे सांगता येईल, असे मला वाटते. संतांचे मुख्य लक्ष्य हे पारलौकिक हित हेच होते. आणि याच लक्ष्याचा त्यांनी समाजात प्रचार केला.ऐहिक सुख हे त्यांचे मुख्य लक्ष्य कधीच नव्हते. ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ अशी काही वचणे पुढे करून विचारवंतांनी वाचकांची दिशाभूल करू नये. संसार, स्त्री, ऐहिक सुखोपभोग या बाबतीत संतांनी टोकाचे नकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. आणि तेही अनेकवेळा. त्यामुळे ‘संसार हा असार आहे’ हेच संतविचाराचे सार आहे, हे मान्य करण्यात अडचण येऊ नये.
वरीलप्रमाणे विचार करताना संतांनी बऱ्याच प्रमाणात परंपरेच्या विरुद्ध विचार आणि कृती केल्या.आध्यात्मिक पातळीवर का होईना समता,बंधुता,भूतदया, औदार्य अशा तत्त्वांचा पुरस्कार केला. त्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष व्यावहारिक जीवनावरही प्रभाव पडला असणारच. लोक आध्यात्मिक मार्गाद्वारे जागृत झाले. त्यामुळेच या संत मंडळीत अठरापगड जातींचा समावेश होऊ शकला. जनसामान्यांत अशी चेतना निर्माण करणे ही त्या काळाची गरजच होती. आणि संतांनी आपल्या कार्याद्वारे ती पूर्ण केली.
जरी विठ्ठलप्राप्ती हे संतांचे मुख्य गंतव्य असले तरी त्याकडे जाणारी संतांची वाट ही समता, भूतदया, करुणा,परोपकार,औदार्य या मैदानातूनच जात होती. या मार्गाने विठ्ठलप्रप्ती जरी झाली नाही तरी त्या वाटेने जाताना समाजाचे एकंदर हितच झाले, हे आपण मान्य करायला हरकत नाही.
ऐहिक सुखाचे आपण फार कौतुक करीत असलो तरी या ऐहिक सुखाच्या अभिलाषेने माणूस आपले माणूसपण विसरत चालला आहे. आपल्या या सुखासाठी तो वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे समाजात अशांती, अविश्वास, संघर्ष, मानसिक तणाव निर्माण होत आहेत. तसेच निसर्गाचे शोषण व पर्यावरणाची हानी झाल्याशिवाय आपल्याला तथाकथित सुख देणारा विकासही होऊ शकत नाही.
मानवजातीला या संकटातून वाचविण्यासाठी आपल्या गरजा नियंत्रित करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा संयमित उपयोग करणे, आपापसातील विश्वास व प्रेम वाढविणे या बाबींची गरज आहे. या साठी संत विचार आणि कार्य प्रेरक ठरतील. या अर्थाने संतांची प्रासंगिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. संतांच्या विचार व कार्यावर अपेक्षांचे अवाजवी ओझे टाकणे आणि आधुनिक ओझे त्यांना पेलता येणार नाहीत, अशी टीका करण्याची आपणास काहीही आवश्यकता नाही