संत तुकाराम यांच्या ओव्या
Answers
Answer:
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
२
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
३
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
४
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
५
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
६
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥
॥६॥
विराण्या - अभंग २५
७
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥
सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥
८
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
९
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
१०
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥
न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥
११
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥
मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥
१२
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥
सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥
१३
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥१॥
बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥
१४
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥
१५
आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥
१६
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥
१७
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥
नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥
१८
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
१९
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥
न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥
तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥
२०
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥
प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अन
Explanation:
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांंचा जन्म देेेहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. 'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.