India Languages, asked by TransitionState, 1 year ago

सुदृढ शरीर हाच खरा दागिना, अलंकार मराठी निबंध, भाषण, लेख, माहिती

Answers

Answered by fistshelter
31

Answer: लहान असताना शुभंकरोती म्हणताना 'आरोग्यम् धनसंपदा' अशी ओळ आपण म्हणायचो. तेव्हा फारसं काही समजायचं नाही. पण जसजसे आपण मोठे होऊ लागतो तसतसे आपल्याला समजते की 'आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.'

आपल्याकडे खूप पैसे आणि संपत्ती असेल पण आपले शरीर रोगट असेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग? आपल्याला तिचा नीट वापर सुद्धा करता येणार नाही. आपले शरीर आणि मन निरोगी असेल तरच आपण उत्साहाने काम करू शकतो. याउलट आपण आजारी असलो तर उपचारासाठी पैसा जातोच परंतु शरीराची हानी होते ती वेगळीच.

त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम यांची सांगड घालून आपले शरीर सुदृढ ठेवले पाहिजे. सुदृढ शरीर हाच खरा अलंकार असतो आणि हा अलंकार कोणत्याही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ असतो.

Explanation:

Answered by ItsShree44
16

Answer:

लोकमान्य टिळक यांचे चरित्र वाचताना एक गोष्ट माझ्या मनावर विशेष ठसली. महाविदयालयाच्या पहिल्या वर्षी त्यांनी शरीर सुदृढ करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याचे ठरवले. तसा निश्चयपूर्वक प्रयत्न केला व सुदृढ शरीरसौष्ठव मिळवले. या सुदृढ शरीराचा उपयोग त्यांना त्यांच्या भावी काळात खूप झाला.

सुदृढ शरीराचे महत्त्व पुराणकाळापासूनच मान्य केले गेले आहे. त्या काळी माणूस हा सतत निसर्गाच्या सहवासात होता. यंत्रांचा शोध लागलेला नसल्यामुळे तो स्वावलंबी होता, कष्टार्जित असे त्याचे जीवन होते. गुरुगृही राहणाऱ्या शिष्यांना नित्य कष्ट करावे लागत. महाभारतकाळात दंड, जोडी, कुस्ती, गदायुद्ध हे प्रकार होते. रामायणकाळातील मारुती ही पराक्रमाची, शरीरसुदृढतेची प्रतीक अशी देवता होती. बलोपासना हीच मारुतीची उपासना! समर्थ रामदासांनी तरुणांना याच शक्ति-उपासनेचा मार्ग दाखवला. रामदास सांगतात -

"शक्तिने पावती सुखे। शक्ति नसता विटंबना।।

शक्तिने नेटका प्राणी। वैभव भोगता दिसे॥"

शरीर सुदृढ नसेल; तर व्यक्तीच्या विद्वत्तेचा वा ज्ञानाचा त्याला किंवा समाजाला काही उपयोग होत नाही. गोपाळ गणेश आगरकर यांना तरुण वयापासून दम्याचा विकार होता. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. माधवराव पेशवे यांना उत्तम आरोग्य लाभले असते, तर कदाचित पेशवाईचा इतिहास बदलला असता. विदेशात जाऊन वैदयकीय पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी किंवा तरुण वयात गणितात चमत्कार घडवणारे रामानुजन यांना उत्तम आरोग्य लाभले असते, तर ते भारताचे भाग्यविधाते ठरले असते.

शरीरसंपत्ती ही धनसंपत्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण धनसंपत्ती पुन:पुन्हा संपादन के करता येते; पण शारीरिक संपदा ढासळली तर परत मिळवणे फार जिकिरीचे. म्हणून व्यायामाची आवड लहानपणापासूनच लागायला हवी. 'शरीरम् आदयं खलु धर्मसाधनम्' हे सुभाषित सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. शरीररूपी संपत्ती आपली आपल्यालाच मिळवावी लागते आणि प्राप्त केलेली ही संपत्ती प्रयत्नाने टिकवावी लागते. शरीरसंपदा उत्तम असेल, तर आयुर्वृद्धी, बलवृद्धी होतेच; शिवाय मनाचेही सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली व्यक्तीच जीवनातील कोणत्याही संघर्षाला तोंड देऊ शकते.

सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास्तव्य करते. स्वामी विवेकानंद तरुणांना सांगत, 'खचलेली शरीरे व पिचलेली मनगटे असलेल्या तरुणांच्या हातून काहीच होणार नाही.' आज विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आयुर्मर्यादा वाढवली आहे. पण निरामय आरोग्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेतच; कारण शेवटी सुदृढ शरीर हाच खरा अलंकार आहे !

Similar questions