Sanskar Manje Kai Marathi nibandh
Answers
Answer:१. संस्काराची व्याख्या
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प (कमी) करायचे.
मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारयुक्त असली पाहिजे. प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे, उदा. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.
२. संस्काराचे प्रकार
मुलांनो, तुम्हाला चांगली व्यक्ती बनायचे असल्याने स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा. चांगले संस्कार आणि वाईट संस्कार यांची काही उदाहरणे पुढे देत आहोत.
२ अ. चांगले संस्कार : सकाळी लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशी नम्रतेने अन् प्रेमाने वागणे, स्वच्छता राखणे, नीटनेटके रहाणे, प्रतिदिन शाळेत जाणे, गृहपाठ वेळच्या वेळी करणे, आईला घरकामात साहाय्य करणे इत्यादी.
२ आ. वाईट संस्कार : सकाळी उशिरा उठणे, सतत दूरचित्रवाणी (टी.व्ही.) पहात बसणे, अभ्यास न करणे, उलट बोलणे, अस्वच्छ रहाणे, पुस्तकांचा खण व्यवस्थित न ठेवणे, खोटे बोलणे इत्यादी.
संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करावयाचे म्हणजे त्याला 'आई-वडिलांना रोज नमस्कार कर', 'दुसऱ्याची निंदा करू नको' इत्यादी शिकवावयाचे; पण ते कसे शिकवावयाचे – तर तत्त्वज्ञान सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट, आईस्क्रिमची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने. आठ वर्षांच्या मुलांना रोज मोठ्या मंडळींना नमस्कार करावयाची आज्ञा दिलीत, तर ४ दिवस करील. पाचव्या दिवशी सांगेल ''मी नाही करणार.'' त्याला नमस्कार करण्याच्या फायद्यांबद्दल तत्त्वज्ञान सांगितले, तरी उपयोग होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या मुलाने मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, तर एकच उपाय आहे. आजपासून तुम्ही घरातील सर्व वडील मंडळींना रोज फक्त एकदाच नमस्कार करा. मुलाला एकदापण नमस्कार करावयास सांगू नका. चार दिवसांच्या आत मुलगा तुमच्या पाठीमागे येऊन घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करू लागेल. त्याला लाज वाटेल, की माझे आई-बाबा रोज आजी-आजोबांना नमस्कार करतात. मी मात्र बेशरमासारखा उभा आहे. संस्कार करणे म्हणजे तोंड बंद कृती चालू !
३. लहान वयातच चांगले संस्कार करण्याची आवश्यकता
३ अ. चांगले संस्कार झाल्याने जीवन आदर्श बनते : पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत, त्यांना प्रतिदिन (दररोज) वंदन करत. जेवण्यापूर्वी श्लोक म्हणत. सायंकाळ होताच हात-पाय धुऊन देवासमोर दिवा लागल्यावर स्तोत्रे म्हणत. रात्री लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत. अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असत. मुलांनो, तुम्हाला आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वांनी ओळखावे, असे वाटत नाही का ? आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्ही गुणी व्हायला हवे. चांगले संस्कार झाल्यावर तुम्ही गुणी आणि म्हणून आदर्श व्हाल.
३ आ. चांगले संस्कार झाल्याने जीवन आनंदी बनते : आई-वडिलांचे ऐकणे, मोठ्यांचा आदर करणे, देवाची भक्ती करणे इत्यादी संस्कारांमुळे देवाचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदी बनते. याउलट दुसर्यांची टिंगलटवाळी करणे, मोठ्यांशी उद्धटपणे बोलणे, खोटे बोलणे इत्यादी कुसंस्कारांमुळे पाप लागत असल्याने जीवन दुःखी बनते.
३ इ. आदर्श पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो : छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे हिंदवी स्वराज्य स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही आदर्श बनलो, तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल.