शिक्षणाची उद्दिष्टे
Answers
१) ज्ञानवृद्धी-
मित्रांनो, शिक्षणामुळे आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते. मानवी जीवनाबद्दल, निसर्गाबद्दल, एकूणच जगण्याबद्दल आपली समज, आकलन वाढते. ही समज-आकलन कशी वाढते? तर त्यासाठी अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भाषा, विज्ञान, गणित इत्यादी विषयांचा समावेश केला गेलेला असतो. आपल्या जगण्याशी संबंधित जवळपास सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणात समावेश केला गेलेला असतो. आपले विविध विषयांचे, शास्त्रांचे ज्ञान वाढले तर त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होतो. त्यामुळे आपल्यामध्ये संशोधकवृत्ती, नाविन्यपूर्णता, अभ्यासूवृत्ती, अचूक व तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता, विवेकी दृष्टिकोण अशा अनेक गुणांची वाढ होते. आपल्यातील न्यूनगंड, मागासलेपणा कमी होऊन आत्मविश्वास, काळाबरोबर चालण्याची वृत्ती निर्माण होते. ही सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण होण्यासाठो मात्र दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवश्यकता असते. फक्त पदवी व नोकरीसाठी शिक्षण घेतले तर मात्र काहीच साध्य होत नाही.
२) कौशल्यवृद्धी, कौशल्यनिर्मिती, कौशल्यविकास :-
जगण्यासाठी नुसते ज्ञान असून उपयोगाचे नसते. तर माणसाकडे अनेक कौशल्य देखील असायला हवीत. त्यामध्ये विविध वस्तू निर्माण करण्याचे, त्यावर प्रक्रिया करण्याचे, त्या वस्तू विकण्याचे कौशल्य असायला हवे. प्रत्यक्ष जगण्यामध्ये संभाषण, वक्तृत्त्व, संवाद कौशल्य असणे किती गरजेचे आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही! आपल्याकडे असे म्हटले जाते की, बोलणार्याचे खराब गहू (बोंडे) पण विकली जातात. तर न बोलणार्याचे बंसी (उत्कृष्ट दर्ज्याचे) गहूही विकले जात नाहीत. म्हणून आपल्याकडे बोलण्याची कला असणे खूप आवश्यक असते. शिक्षणातून त्याचा विकास व्हायला हवा.
आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या क्षेत्राशी संबंधित असंख्य कौशल्ये आत्मसात करून त्यांचा वापर करता येणे, ही काळाची गरज बनलेली आहे. त्याशिवाय आपण आपली बरीचशी (जवळपास सर्वच) कामे बिनचूक व वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. मोबाईल, कॉम्प्युटर यांचे ज्ञान असणे, ते सहज व सराईतपणे वापरता येणे, ही एक आवश्यक गरज बनून बसली आहे.
याशिवाय अजून अशी असंख्य कौशल्य आहेत. ही सर्व कौशल्ये औपचारिक किंवा अनौपचारिक अशा कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाशिवाय साध्य होऊ शकत नाहीत आणि या कौशल्यांशिवाय आपले जगणे, स्वत:चा, कुटुंबाचा, समाजाचा व एकूणच देशाचा विकास साधणे कठीण होऊन बसू शकते आणि म्हणून शिक्षणाचे हे दुसरे उद्दिष्ट असते, असे मला वाटते.
३) मानवी वर्तनात बदल/ परिवर्तन :-
मित्रांनो, तुमच्याकडे अनेक विषयांचे खूप सारे ज्ञान आहे. असंख्य कौशल्येदेखील तुमच्यामध्ये आहेत. मात्र तुमच्या वर्तनात जर परिवर्तन झालेले नसेल, शिक्षणामुळे तुम्ही अधिक चांगले, अधिक विवेकी, अधिक समजूतदार, अधिक विज्ञाननिष्ठ, अधिक प्रेमळ, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद इ. मानवी मूल्यांवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करणारे बनत नसणार तर तुमच्या शिक्षणाला काहीही अर्थ उरत नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कवितेतून असे म्हटलेले आहे की,
‘शिक्षणाने मनुष्यत्व
पशुत्त्व हाटते पहा’
म्हणजे शिक्षणामुळे माणसातील पशुत्त्व कमी होऊन त्याच्यात मनुष्यत्त्व निर्माण होते, असे त्यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, प्राणी आणि मनुष्य यांच्यात हाच फरक आहे ना, की त्याचे लाखो वर्षांपूर्वी पशुपातळीवरचे जे वर्तन होते त्यात हळूहळू परिवर्तन, बदल घडत येऊन तो आजच्या या टप्प्यावर येवून पोहचलेला आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणामुळे जर माणसाला ज्ञान व कौशल्य प्राप्त होत असतील तर त्याच्या वागण्यात एक प्रकारचा धाडसीपणा यायला हवा. समाजात घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींना त्याने विरोध करायला हवा. अन्याय, अत्याचार याविरूद्ध संघर्ष करायला हवा. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एके ठिकाणी असे म्हटलेले आहे की, “इंग्रजी भाषा (पाश्चात्त्य ज्ञान) ही वाघिणीचे दूध आहे आणि ती प्राशन केलेली व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’. त्याचप्रमाणे ज्ञान-विज्ञान-कौशल्य आत्मसात केलेली व्यक्ती अन्याय, अत्याचार, शोषण तसेच चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणार नाही तर मग कोण उठवणार?
मला तर अलीकडे याच्याविरुद्ध चित्र दिसत आहे. नोकरीसाठी अगदी चांगल्या उच्चशिक्षित व अनेक पदव्या घेतलेल्या व्यक्तींना मी लाचार होताना बघत आहे. तसेच चांगले उच्चशिक्षित व मोठ्या हुद्द्यांवर काम करणारेसुद्धा प्रचंड भ्रष्टाचार, शोषण करताना दिसून येत आहेत. माणसातील माणूसपण, संवेदनशीलता संपून त्याचे अशा भ्रष्ट व शोषक पशूंमध्ये रूपांतर व्हावे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट खचितच नाहीये! तेव्हा एक चांगला माणूस घडविणे, हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असायला हवे. तरच मानवजातीत सौख्य व शांतता नांदेल, अन्यथा नाही.
बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा संदेश सर्वांना ठाऊक आहे. शिका म्हणजे विविध विषयांचे ज्ञान घ्या, अनेक कौशल्य आत्मसात करा. त्यानंतर संघटित व्हा व माणसाला माणूस म्हणून जगता येईल, अशा प्रकारचा समाज निर्मितीसाठी संघर्ष करा. शिक्षणामुळे आपल्या वर्तनामध्ये या प्रकारच्या विधायक व सकारात्मक परिवर्तनाची आवश्यकता आहे.