शालीचे आत्मकथा निबंध
Answers
Answer:
मित्रांनो, तसं पाहिलं तर मी एक दगड-विटांनी बनलेली निर्जीव वास्तू. मला तुमच्यामुळेच सजीवत्व प्राप्त होते. तुम्ही माझ्या अंगा-खांदयावर खेळता, बागडता, नाचता, पडता ना ते मला खूप खूप आवडतं.
शाळा भरण्यापूर्वी एवढा दंगा करणारी तुम्ही मुले शाळा भरल्याची घंटा ऐकताच कसे आपापल्या वर्गाच्या ओळी करून, रांगेत शिस्तीने उभे राहून प्रार्थना म्हणता. प्रत्येक तासाला त्या-त्या शिक्षकांनी शिकवलेले मनापासून ऐकता आणि मा. मुख्याध्यापकांची चाहूल जरी लागली तरी कसे सावध होता, हे मी या चार भिंतींच्या आत अनुभवते ना!
राष्ट्रीय सण, नेत्यांची जयंती-पुण्यतिथी आणि शालेय तपासणी असली की, तुमचा उत्साह तर पाहण्यासारखा असतो.
वर्गखोल्या झाडून, कागद-कचरा उचलून 'माझा खाऊ मला दया' असं सांगणाऱ्या केराच्या टोपल्यांमध्ये टाकता ना, ते मला खूप आवडतं. माझी किती काळजी घेता तुम्ही.
आणि हो, शाळेच्या स्वच्छतेबरोबरच सुविचारांनी फळे, तर तुम्ही काढलेल्या चित्रांनी काचपेट्या सजवता, वर्गा-वर्गामध्ये रंगीत पताका, अभ्यासपूर्ण तक्ते, कार्यानुभवाच्या तासाला कुंडीत लावलेल्या रोपांमुळे आणि रांगोळीच्या सड्यामुळे माझ्या सौंदर्यात भर पाडता ना, तेव्हा तर मी एकदम बहरूनच जाते.
इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मी तुमच्या जीवनातील अविभाज्य अंगच होऊन जाते. जेव्हा तुमच्या उंचावणाऱ्या प्रगतीचा आलेख मी पाहते तेव्हा माझे डोळे भरून येतात.
तुम्ही मुलं आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये विजयी होऊन येता तेव्हा माझा रोम रोम पुलकीत होतो. आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे शिक्षक आपल्या शाळेत आहेत, हे पाहून माझा ऊर भरून येतो.
तुम्ही केलेली हस्तलिखिते, तुम्ही सहलींचे केलेले नियोजन, तुमची स्नेहसंमेलने, त्यासाठी घेतलेले श्रम या साऱ्याची मी साक्षीदार आहे बरं!
मा. मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये ठेवलेली, तुम्ही मिळवलेली बक्षिसे, ढाली, प्रशस्तिपत्रके आणि शाळेच्या प्रगतीचा आलेख, दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे असलेला फलक अंगावर मिरवताना 'माझ्यासारखी भाग्यवान मीच' हा विचार मनात डोकावतो.
पण तुमचे काही मित्र मात्र मला अजिबातच आवडत नाहीत. बघा ना, गेल्याच वर्षी छानसा रंग देऊन मला आकर्षक रूप दिलं; पण तुमच्या काही मित्रांनी जिन्यातून येता-जाता माझ्या अंगावर खडूने, पेन्सिलनेच नाही तर ब्लेड, कर्कटकनेही रेघोट्या मारल्या. किती वेदना मला झाल्या म्हणून सांगू?
परीक्षा संपल्यावर सुट्टी लागणार, या कल्पनेनं तुम्ही खूश असता आणि मी मात्र एकाकीपणाच्या कल्पनेनं उदास होते. हे मैदानही तुमच्याविना सुन-सुन होतं.
तसं अधूनमधून लग्नकार्य, सभा काही ना काही निमित्ताने थोडी फार वर्दळ असते म्हणा! पण एक बरं आहे, आपल्या आवारातच रखवालदाराचं घर आहे ते! तेवढीच जाग असते. शिवाय त्याची दोन मुले या दोन महिन्यात मोकळेपणानं, पोटभर हुंदडून घेतात तेव्हा मीही त्यांच्या आनंदात आनंदी होते.
तुम्ही सुट्टीहून परत येईपर्यंत आपल्या आवारातील हे जांभळाचं झाड टपोऱ्या जांभळांनी अगदी लगडून गेलेलं असतं; पण तुम्हाला त्याची चव चाखायला मिळतेच कुठे? बरोबर ना?
मला माहीत आहे, गेल्या चार-पाच वर्षांपासून तिथं, त्या झाडावर कावळ्याच्या एका जोडप्यानं आपला संसार थाटलाय. तुम्ही जांभळासाठी झाडावर दगड भिरकावलात की, काव-काव असा कल्ला करीत ते तुमच्या अंगावर धावून येतात. तुमची फजिती पाहून मी गालातल्या गालात हसते; पण.
दहावीच्या निरोप समारंभाच्या वेळी मात्र तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी गहिवरते; पण क्षणभरच! कारण दहावीच्या परीक्षेनंतर एका नव्या विश्वात तुम्ही प्रवेश करणार आहात. ते जग तुम्हाला खुणावतंय. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली ताटातूट अपरिहार्यच आहे ना!