'शाळेचा निरोप सभारंभ' essay In marathi
pls answer ASAP.
Answers
Answer:
पूर्वपरीक्षेचा निर्णय जाहीर झाल्यावरच शाळेने हा समारंभ आयोजित केला होता. त्यामुळे "प्रत्येकाला अभ्यासात आपण कोठे आहोत?" हे उमगले होते. “उरलेल्या एका महिन्यात आपण काय करणे आवश्यक आहे" हेच विचार सर्वांच्या मनात गर्दी करून होते. निरोपसमारंभाच्या दिवशी आम्हांला सुटी दिली गेली होती आणि ठीक पाच वाजता शाळेत बोलाविले होते. गणवेषाचीही सक्ती नव्हती. किंबहुना आज कोणत्याही नियमाचे बंधन आमच्यावर नव्हते. कारण आजच्या समारंभाचे आम्ही पाहुणे होतो.
सवयीप्रमाणे पंधरा मिनिटे आधी, म्हणजे पावणेपाचला शाळेत गेलो. रोजची परिचयाची शाळा आज वेगळीच भासत होती. प्रवेशद्वारात भलीमोठी रांगोळी काढली होती आणि सारे गुरुजन आमच्या स्वागतासाठी उभे होते. या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. सभागृहात पाऊल टाकले तर ते सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेस उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा विदयार्थ्यांची छायाचित्रे मुख्याध्यापकांनी सभोवताली स्टँडवर लावून ठेवली होती.
केवढी कल्पकता होती यांत! या साऱ्या प्रतिमा आम्हांला प्रेरणा देत होत्या तुम्हांलाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे, असेच जणू त्या आम्हांला सांगत होत्या. निशिगंधाची व गुलाबाची फूले जागोजागी लावल्याने सारे वातावरण कसे सुगंंधित झाले होते. समोरच्या फलकावर एक अर्थपूर्ण कविता लिहिली होती, ती आमच्याच एका शिक्षिकेने केलेली होती. कविता वाचताच आठवले ते त्या बाई शाळेत नवीन आल्या होत्या तो दिवस. किती त्रास दिला होता त्यांना आम्ही! उगाचच, अगदी वाहयातपणा म्हणून. पण पुढे त्यांनी आपल्या उत्कृष्ट शिकविण्याने आम्हांला जिंकून घेतले होते.
ठरल्यावेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी समारंभाचे अध्यक्ष होते. पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापकांनी करून दिली तेव्हा एक सुखद धक्का बसला. कारण ते अधिकारी आमच्याच शाळेचे 'माजी विदयार्थी' होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विदयार्थ्यांत झळकत होते.
निरोपसमारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आजच्या समारंभात भाषणांची आतिषबाजी नव्हती. मोजक्या शब्दांत मुख्याध्यापकांनी आमच्या बॅचने मिळविलेल्या गेल्या दहा वर्षांतील यशाचा आढावा घेतला. इतिहासाच्या सरांनी चटकदार शैलीत मागच्या काही सुखद आठवणींची उजळणी केली, तर संस्कृतच्या गुरुजींनी आम्हांला परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दांत आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते हे विनम्रपणे सांगितले.
नंतर विदयार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विदयार्थ्यांचा सत्कार पाहण्यांतर्फे करण्यात आला. नंतर विदयार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी सभा गाजविणारे सारे वीर आज गप्प झाले होते. भारावलेल्या कंठांतून शब्द फुटेनात. सारेच वातावरण गंभीर झाले. म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होऊन समारंभ संपला..
समारंभ संपला तरी आज आमचे पाय शाळेतून बाहेर पडत नव्हते. त्या वास्तूत अनेक आठवणी दडलेल्या होत्या. नेहमी अगदी वायातपणे वागणारे विदयार्थीही गुरुजनांना वाकून वंदन करीत होते, कोणताही निरोपसमारंभ हा असा हेलावून टाकणाराच असतो.
Explanation: