India Languages, asked by omkarcbsa501, 1 year ago

श्रावण महिना माहिती, भाषण, निबंध

Answers

Answered by ItsShree44
5

Answer:

चैत्रापासून सुरू होणाऱ्या मराठी महिन्यांचे रंगरूप आगळेवेगळे असते. कुणाला चैत्राच्या पालवीची मोहिनी पडते; तर कुणाला वैशाखवणवा आवडतो. कुणाला मेघश्याम आषाढ हवाहवासा वाटतो; तर कुणी सोनेरी आश्विनासाठी झुरतात. मला स्वत:ला मात्र हवाहवासा वाटतो तो, 'हिरवा श्रावण.

श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली आढळते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात ! कुठे गर्द हिरवा, तर कुठे प्रसन्न हिरवा; तर कुठे पोपटी ! या सर्व रंगछटांतून चैतन्याचा, सर्जनतेचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडत असतो. श्रावण हा मराठी महिन्यांतील पाचवा महिना. उकाड्याने हैराण करणारे चैत्र-वैशाख गेल्यावर ज्येष्ठ-आषाढात पावसाचा धुवांधार वर्षाव सुरू होतो, वातावरण कुंद आणि ढगाळलेले अंसते. घराबाहेर पडणे देखील पुष्कळदा अवघड होते. अशा वेळी माणसाला दिलासा लाभतो तो श्रावणात ! श्रावणातील पावसाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात-

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे।

श्रावणातील ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहून मन हरखून जाते. अवचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण नभोमंडपाला आगळी शोभा आणते. या सुंदर श्रावणमासाचे वर्णन करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला।

श्रावणाचे हे चैतन्य मुला-माणसांत, पशु-पक्ष्यांत, पाना-फुलांत सर्वत्र ओसंडून जाताना आढळते. श्रावणात फुलणारा तेरडा रंगीबेरंगी गुच्छांचा नजराणा घेऊन आलेला असतो. शेतात डोलणाऱ्या तुऱ्यांवर श्रावणाचे सोनेरी ऊन पडते आणि त्यांचा तजेला नव्या उत्साहाने डोलत राहतो. श्रावणसरींच्या स्पर्शाने उल्हसित झालेली पिके भावी सुबत्तेची आशा पालवू लागतात. दरम्यान शिवारात राबणाऱ्या शेतकऱ्यांना जरासा विसावा मिळतो. अशा या प्रसन्न श्रावण महिन्यात सर्वत्र उत्साह ओसंडत असतो.

श्रावणमास म्हणजे व्रत-वैकल्यांचा, सणावारांचा काळ. श्रावणातील सोमवारांचे केवढे माहात्म्य ! मंगळवारी मंगळागौरीची पूजा, शुक्रवारी जिवतीमातेचे व्रत; तर शनिवारी मारुतीची आराधना. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्गबांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर पिकांचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते; तर नारळीपौर्णिमेला सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो. असा हा श्रावणमास ! सर्वांच्या मनात आनंदाची हिरवळ फुलवणारा आणि आगामी समृद्ध जीवनाचे ओझरते दर्शन घडवणारा ! मला वाटते, माझ्याप्रमाणे आपणा सर्वांनाही तो खूप खूप आवडत असावा !!

Similar questions