तुमच्या आजोलचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answer:
मुळात ‘आजी’ हे रसायनच वेगळे असते. बालपणी आपल्याला आजी गोड गोड गोष्टी सांगणारी आजी, गाणे गात व पाठ थोपटीत झोपवणारी आजी, कुठे दुखले – खुपले तर हळदीचा लेप लावणारी आजी, कुणी आमच्यावर रागावले तर आमची बाजू घेऊन भांडणारी आजी, परीक्षेत पास झाल्यावर कौतुक करीत रुपया हातावर ठेवणारी आजी, आजारपणात जागरण करीत उशाशी बसून राहणारी आजी ! आजीची किती रूपे आठवावीत ? प्रत्येकाची आजी अशी असतेच ; पण माझी आजी वेगळीच होती. बाकी आज्या करतात ते ती करायची, शिवाय तिच्यात आणखी वेगळेपण होते.
ही माझी आजी म्हणजे आईची आई. आम्ही सर्व भावंडे आजीच्याच कुशीत वाढलो. त्याचे कारण असे, की घरातल्या बायका गर्भारपण – बाळंतपण – गर्भारपण या चक्रात व्यस्त असायच्या. कुटुंब नियोजनाच्या पूर्वी घराघरात हीच परिस्थिती असायची. अशावेळी मदतीला हवी असायची स्त्रीची आई ; म्हणजे आमची आजी.
माझी आजी ठेंगणी – ठुसकी होती. दिसायला सावळी. शिक्षण तर अजिबात नव्हते. त्या उलट माझे आजोबा पाच फूट दहा इंच. गोरेपान ! शिक्षण इंटर नापास. त्याकाळी इतके शिक्षण म्हणजे खूप झाले. ते फाडफाड इंग्रजी बोलत. घरात बोलतांनाही दोन चार वाक्ये इंग्रजीत फेकीत असत. शिव्याही इंग्रजीत देत. नातवाचे नाव घालायला शाळेत नातवाला घेऊन गेले. तेथल्या हेडमास्तरांशी विनाकारण भांडले. ” ब्लडी डॅम फूल, यू नो हू आय अॅम ? फादर ऑफ डॉ. संजीव राव एम. डी. ” त्यांच्या तार सप्तकातल्या आवाजाला हेडमास्तर नरमले. दुस-या दिवशी नातवाला अॅडमिशन मिळाली ! तो जमानाच वेगळा होता. माणसाला प्रतिष्ठा होती. वयाचा, पदाचा, विद्वत्तेचा आदर केला जायचा. अशा आजोबांनी आमच्या आजीला पत्नी म्हणून कसे स्वीकारले याचे आजही आम्हाला आश्चर्य वाटते. तिचे लग्न झाले तेव्हा तिचे वय होते दहा वर्षांचे ! पुढे तिला पाच मुले झाली. तीन मुलगे व दोन मुली. याशिवाय किती मुले गेली, किती वेळा गर्भपात झाला याची गणती तिनेही कधी केली नव्हती. बाई म्हणजे मुलांना जन्म देणारे यंत्र, अशी इतर बायकांप्रमाणे तिचीही समजूत असावी.
आजोबा इंटर नापास झाल्यावर नोकरीच्या शोधात मुंबईला आले. मंदीचे ते दिवस. कधी क्लार्कची नोकरी मिळायची ; पण ती टिकत नसे. मालकाची गरज व आजोबांचा तापट स्वभाव या कारणांमुळे आजोबांनी अनेक नोक-या केल्या. अनेक वेळा बेकारही राहिले. अधूनमधून आजीला दहा रुपये मनीऑर्डरने पाठवीत. त्यात संसार सांभाळणे आजीला जड जात असे. मग रानात जाऊन लाकडे गोळा करायची, ती फोडायची व विकायची : पापड, लोणचे करून विकायची. याला आजी कंटाळली आणि एके दिवशी ती तडक मुंबईला निघाली. आपल्या नव-याच्या शोधात !
त्याकाळी मुंबई आजच्यासारखे बकाल शहर झालेले नव्हते. ओळख नसली तरी माणसामाणसाला मदत करण्याची ईर्षा होती. अडीअडचणीला शेजारी, नातेवाईक, परिचयातली माणसे, मित्रमंडळी धावून येत. आजी भाऊच्या धक्क्यावर उतरली. आपली ट्रंक हातगाडीवर ठेवली, एक पोर कडेवर व दुस-याचा हात घेऊन चालत निघाली. ‘टोपीवाला चाळ, लालबाग’ एवढ्या तुटपुंज्या पत्त्यावर लोकांना विचारीत विचारीत आजोबांना शोधून काढले. एकाएकी आलेल्या आजीला पाहून आजोबाही आश्चर्यचकित झाले. आजीत ही हिंमत आली कुठून, याचे आम्हालाही नवल वाटले.
शाळा कधीही न पाहिलेल्या आजीला शिक्षणाचे खूप वेड होते. पैशांचे बळ नसले तरी महत्वाकांक्षा अफाट ! मोठ्या मुलाला डॉक्टरी शिक्षण घेण्यासाठी मद्रासला ठेवून तिथे शिक्षणाची सोय केली. आपल्या दोन्ही मुलींना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातले. सुनेने लग्नावेळी शाळा सोडलेली म्हणून तिलाही शिक्षण पूर्ण करण्यासाठी शाळेत घातले. मुंबईला आल्यावरदेखील मुलींनी मॅट्रिक व्हावे या महत्वाकांक्षेपोटी गिरगावातील कमळाबाई शाळेत त्यांचे नाव घातले. त्या काळी मुलींचे शिक्षण हा चेष्टेचा विषय असे. आई व मावशी शाळेत जायला लालबागहून ट्रामने निघायच्या. मुली नऊवारी नेसत. पुस्तकेपदर सांभाळत व चारचौघांची कुत्सित दृष्टी चुकवीत शाळेत पोहोचेपर्यंत जीव मेटाकुटीला येई ; पण त्यांनी शिक्षण सोडले नाही.
शाळेची परीक्षा पास झाल्याचा दाखला हातात पडला, की आम्ही मुले आजीकडे धाव घेत असू. कारण आमच्यापेक्षा अधिक आनंद आमच्या आजीला होत असे. खाऊचा पुडा व रुपया मिळायचा. कुणी नापास झाले तर ती त्याला / तिला नाउमेद होऊ देत नसे. ती म्हणायची, “अरे, तुला फोर्थ क्लास मिळालाय, कशाला रडतेस ? पुढच्या खेपेला फर्स्ट क्लास मिळेल. हे घे तुला बक्षीस. ” असे म्हणून तिलाही बक्षीस द्यायची. कुणाचे लग्न किंवा मुंज झाली, की सर्वात मोठी भेट आजीकडून असायची. आमचे लग्न झाले तेव्हा आजीने आम्हाला गोदरेजचे मोठे कपाट भेट म्हणून दिले. अशी ही दानशूर आजी !
आमच्या आईचे लग्न झाल्यावर ती मध्यप्रदेशात रीवा संस्थानात गेली. बाबा इंजिनियर होते. रीवा संस्थानात नोकरी करीत होते. आईच्या प्रत्येक बाळंतपणासाठी आजी आवर्जून यायची. संस्थानात त्यावेळी वैद्यकीय सुविधांची सोय नव्हती. काही मुले जगायची तर काही जायची. आईची सात बाळंतपणे झाली. शेवटच्या गर्भारपणावेळची गोष्ट. एके सकाळी उठल्यावर ती बाबांना म्हणाली, ” स्वप्नात मला माझे बाबा दिसले. ते मला भेटायला बोलवत आहेत, असे स्वप्न पडले. मला आता मुंबईला जायलाच हवे. नाहीतर बाबांची अखेरची भेटही होणार नाही. “
“अगं, पण तुला हा सातवा महिना ; दोन दिवसांचा आगगाडीचा प्रवास, पुन्हा सटनाला गाडी बदलायची. हा त्रास तुला कसा सोसणार ? वाटेत काही अवचित घडलं तर ? ” इति बाबा.
आई मुंबईला जाण्याचा हट्टच धरून बसली. आम्ही मुंबईला निघालोसुद्धा …
मुंबईला आई पोचली तेव्हा आजोबा खरेच खूप आजारी होते. दहा दिवसांनंतर ते हा इहलोक सोडून गेले.
आईचे महिने भरत आले, त्यामुळे रीवाला परत जाणे मुश्कील होऊन बसले. आजोबा नुकतेच गेलेले असल्यामुळे आजी दुःखसागरात बुडालेली. मग आईने बाळंतपणासाठी धारवाडला मावशीकडे जाण्याचे सर्वानुमते ठरले ; पण मावशीला एवढी जबाबदारी झेपणारी नव्हती. अशावेळी आजी पाठीशी उभी राहिली. तिने आपले सारे दुःख बाजूला सारले व ती आपल्या मुलीबरोबर म्हणजे माझ्या आईसह धारवाडला जायला निघाली.
गर्दीना फुललेल्या स्टेशन