उत्तमलक्षण प्रस्तुत कवितेचे रसग्रहण करा
Answers
उत्तमलक्षण
श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।
रसग्रहण:-
उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात - श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. । १ ।।
पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. । २ ।। लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करुन पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये ।।३।। जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ॥४ ॥। काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्या बद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये ) ।।५ ॥ सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये कुणाशीही स्पर्धा करू नये ॥६॥ कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ॥७ ॥ स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये कुणावरी आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये. ॥८।। सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे. असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान, व्यर्थ गर्व करू नये. ॥ ९ ॥ अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी टाळावी. चांगली कीती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे. सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्करावा. ।।१०।।